मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Bageshwar Baba Padayatra) बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या नेतृत्वात निघालेल्या सनातन हिंदू एकता पदयात्रेचा आज समारोप होतो आहे. नऊ दिवस चाललेली ही पदयात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत ओरछाधाम येथे समाप्त होत आहे. दरम्यान सर्वप्रथम संत-महंत उपस्थितांना संबोधित करतील, त्यानंतर हजारो सनातन भक्त एकत्रितपणे हनुमान चालिसाचे पठण करतील. तत्पश्चात धीरेंद्र कृष्ण शास्त्री सर्व भाविकांसह प्रभू रामाचे दर्शन घेऊन बागेश्वर धामकडे रवाना होतील.
हे वाचलंत का? : चितगावच्या लोकनाथ मंदिरावर इस्लामिक कट्टरपंथींचा हल्ला!
सनातन हिंदू एकता पदयात्रेला सुरुवात करताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, हिंदूंवर अत्याचार होत असून ते थांबवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. बजरंगबलीच्या आशीर्वादावर आमची श्रद्धा आहे. आज आपणही हिंदूंवरचा विश्वास वाढवत आहोत, जेव्हा एक दिवस हिंदू धर्म विरोधकांच्या विरोधात रस्त्यावर उतरतील, त्याच दिवशी या देशात हिंदूंवरील अत्याचार थांबतील.
कसा होता प्रवास?
बागेश्वरधाम येथून सुरू झालेली ही पदयात्रा पहिल्या दिवशी १५ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून कादरी येथे पोहोचली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १७ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून ती छतरपूरच्या पेप्टेक शहरात पोहोचली. तिसऱ्या दिवशी २१ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून नौगाव येथे त्यानंतर चौथ्या दिवशी २२ किलोमीटरचे अंतर कापून ती देवरी विश्रामगृहावर पोहोचली. पाचव्या दिवशी ही यात्रा २२ किलोमीटरचे अंतर कापून मौरानीपूरला पोहोचली. येथून पदयात्रा १७ किलोमीटरचे अंतर कापून गुघसी येथे पोहोचली. सातव्या दिवशी १७ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून यात्रा निवारीत पोहोचली. त्यानंतर पुढे १५.५ किलोमीटरचा प्रवास करून ओरछा तिगाईचा येथे पोहोचली. येथे रात्रीचा विसावा घेतल्यानंतर पदयात्रा ओरछाधाम येथे पोहोचली.
धीरेंद्र शास्त्री यांनी २१ नोव्हेंबरपासून हिंदू एकतेसाठी सनातन हिंदू एकता पदयात्रा सुरू केली होती. बागेश्वर धाम ते ओरछा हे १६० किमीचे अंतर ९ दिवसांत कापण्यात आले. हिंदूंना एकत्र आणण्यासाठी आणि सनातन धर्माचा प्रचार करण्यासाठी ही पदयात्रा काढत असल्याचे धीरेंद्र शास्त्रींनी सांगितले.