‘अखंड वाचनयज्ञ’

29 Nov 2024 23:20:13
 
 
Reading
 
 
मनुजा वाचनेनैव बोधन्ते विषयान् बहून्।
दक्षा भवन्ति कार्येषु वाचनेन बहुश्रुताः॥
वाचनाने माणसाला विविध विषयांचे ज्ञान होते आणि माणूस सर्वश्रुत होतो. वाचनाचे हेच महत्त्व लक्षात घेऊन ‘अक्षरमंच प्रतिष्ठान’तर्फे दि. 29 नोव्हेंबर ते दि. 1 डिसेंबर या कालावधीत ‘बालक मंदिर, कल्याण’ ‘अखंड वाचनयज्ञ 2024’ आयोजित करण्यात आला आहे. याच ‘वाचनयज्ञा’चा हा थोडक्यात घेतलेला आढावा.

नकारात्मक गोष्टींवर मात करून सकारात्मकता प्राप्त करण्यासाठी ‘यज्ञ’ करण्याची पद्धत आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली. कल्याणमध्ये सुरू असलेला ‘वाचनयज्ञ’सुद्धा असाच नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे नेणारा. या ‘वाचनयज्ञा’त सहभागी झालेले लोक पुस्तकरुपाने पेटत्या ज्ञानाच्या अग्नीत आपल्या मनातील आणि मेंदूतील नकारात्मक विचारांची आहुती देत आहेत आणि वाचल्या जाणार्‍या, ऐकल्या जाणार्‍या प्रत्येक शब्दासोबत एक सकारात्मक, मार्गदर्शक ऊर्जा आपल्यामध्ये सामावून घेत आहेत. अशा ‘वाचनयज्ञा’चा घाट घालण्याची कल्पनाच मुळी आताच्या काळात अभिनव आणि उल्लेखनीय. या कल्पनेला जन्म दिला ‘अक्षरमंच सामाजिक-सांस्कृतिक प्रतिष्ठान’ आणि डॉ. योगेश जोशी यांनी.
 
‘अक्षरमंच प्रतिष्ठान’ ही संस्था गेली 20 वर्षे विविध उपक्रम राबवत आहे. मुलांसाठी संस्कार स्पर्धा, पुस्तके प्रकाशित करून मुलांना त्या पुस्तकांचा बोध व्हावा, यासाठी विविध स्पर्धा असे अनेक उपक्रम या संस्थेने आजवर राबविले आहेत. 2019 साली या संस्थेने ‘पोएट्री मॅरेथॉन’ हा 85 तासांचा काव्यवाचनाचा उपक्रम राबविला होता. त्या उपक्रमाअंतर्गत सलग 85 तास काव्यवाचन केले गेले होते. त्या उपक्रमाला चांगला प्रतिसादही मिळाला होता. आपण फक्त काव्यवाचनापुरते मर्यादित न राहता, प्रत्येक प्रकारच्या साहित्याच्या वाचनाला पाठिंबा दिला पाहिजे, वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न केले पाहिजेत, असा विचार डॉ. योगेश जोशी यांच्या मनात आला आणि त्यातून ‘वाचनयज्ञ’ हा उपक्रम अस्तित्वात आला.
 
गेल्यावर्षी म्हणजेच 2023 मध्ये ‘वाचनयज्ञ’ हा उपक्रम पहिल्यांदा राबविला गेला. गेल्यावर्षी सलग 36 तास आणि एकत्रित 150 तास ‘बालक मंदिर, कल्याण’ येथे हा ‘वाचनयज्ञ’ सुरू होता. सलग 36 तास दिवसा आणि रात्री-मध्यरात्रीसुद्धा विविध पुस्तकांचे वाचन आणि श्रवण केले गेले. या 36 तासांमध्ये एकाचवेळी विविध वर्गांमध्ये विविध साहित्याचे वाचन आणि श्रवण सुरू होते. त्यामुळे सलग 36 तास आणि एकत्रित 150 तास असा हा ‘वाचनयज्ञ’ सुरू होता. गेल्यावर्षी या ‘वाचनयज्ञा’ला वाचकांनी आणि श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि त्यातून हा ‘यज्ञ’ सुरू ठेवण्याची ऊर्जा आयोजकांना मिळाली.
 
यावर्षीसुद्धा ‘बालक मंदिर, कल्याण’ येथे हा ‘अखंड वाचनयज्ञ 2024’ आयोजित करण्यात आला आहे. काल या ‘वाचनयज्ञा’चे उद्घाटनसत्र पार पडले. ‘कल्याण-डोंबिवली महानगरपालिके’च्या आयुक्ता इंदु राणी जाखड यांच्या हस्ते या ‘वाचनयज्ञा’चे उद्घाटन झाले. या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे, दिनेश मेहता आणि प्रेरणा रायचूर उपस्थित होते. या उद्घाटनप्रसंगी ग्रंथदिंडीसुद्धा काढण्यात आली. उद्घाटनानंतर पहिलेच सत्र झाले, ते संस्कृत भाषेतील वाचनाचे. संस्कृत ही आपल्या मराठी आणि इतरही भाषांची जननी. म्हणून या ‘वाचनयज्ञा’ची सुरुवात संस्कृत भाषेच्या वाचनाने करण्याचे ठरवण्यात आले. 50 वाचकांनी या यज्ञाच्या पहिल्या सत्रात संस्कृत भाषेचे वाचन केले. काल 4.30 वाजता सुरू झालेला हा ‘अखंड वाचनयज्ञ’ रविवार, दि. 1 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता संपणार आहे. गेल्या वर्षी हा यज्ञ सलग 36 तास सुरू होता. यावर्षी तो अधिक काळ चालवण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. त्यामुळे यावर्षी सलग 50 तास आणि एकत्रित 200 तास हा ‘अखंड वाचनयज्ञ’ सुरूच राहणार आहे. कल्याणमधील बालक मंदिरमध्ये तर ‘वाचनयज्ञ’ सुरूच आहे. पण, या ‘वाचनयज्ञा’चा एक भाग म्हणून सकाळी 8 ते दुपारी 3 या वेळेत 22 शाळांमध्येसुद्धा हा वाचनाचा उपक्रम राबवला जाणार आहे.
 
या ‘वाचनयज्ञा’त आठ वर्षांच्या वाचकांपासून 80 वर्षांच्या वाचकांचा या कार्यक्रमात सहभाग आहे. या उपक्रमाचा केंद्रबिंदू लहान मुले असल्याने या उपक्रमात शालेय वयातील मुलांची संख्या अधिक असणार आहे. इतर मुलांसोबतच दिव्यांग मुलांनाही या उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी त्यांच्यासाठी खास ‘ब्रेल लिपी’ वाचनाचे सत्रसुद्धा या यज्ञात आयोजित करण्यात आले आहे. मराठीसोबतच हिंदी, गुजराती आणि इंग्रजी भाषेतील काही साहित्याचे वाचन या यज्ञात केले जाणार आहे. वाचन करणे किंवा वाचनसंस्कृती वृद्धिंगत करणे, म्हणजे फक्त प्रमाण भाषेचा विचार करून चालत नाही. बोली भाषांमध्ये लिहिल्या जाणार्‍या साहित्याचा त्यासाठी विचार करायला हवा. आपल्या मराठी भाषेला अनेक बोली भाषांनी समृद्ध केले आहे. याच बोली भाषांना स्थान देण्यासाठी आणि बोली भाषेतील साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी अहिराणी, आगरी आणि कोळी साहित्याचे सत्रसुद्धा या ‘वाचनयज्ञा’त आयोजित करण्यात आले आहे. तीन दिवसांत मिळून एक हजारांहून अधिक वाचकांच्या आणि दहा हजारांहून अधिक श्रोत्यांच्या उपस्थितीत हा ‘अखंड वाचनयज्ञ’ होणार आहे. कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, ठाणे, नाशिक, जळगाव, मालेगाव येथून 25 हून अधिक शाळांमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
 
वाचनासाठी वेळ नाही, अशी तक्रार करणार्‍या आताच्या जगात ‘अक्षरमंच प्रतिष्ठान’ने आयोजित केलेला हा 50 तासांचा ‘अखंड वाचनयज्ञ’ म्हणजे एक मोठे धाडसच! ‘अक्षरमंच प्रतिष्ठान’चा हा ‘वाचनयज्ञ’ दरवर्षी असाच सुरू राहील आणि लोप पावत चाललेली वाचनसंस्कृती वृद्धिंगत होईल, ही सकारात्मकता या उपक्रमामुळे निर्माण झाली आहे. हा ‘वाचनयज्ञ’ वाचकांच्या दैनंदिन आयुष्यातही असाच धगधगत राहो आणि त्यातून पेटणार्‍या ज्ञानाग्नीने त्यांचे जीवन उजळून निघो, हीच आशा!
नव्या आणि जुन्या पिढीला वाचनाची गोडी लावण्यासाठी हा यज्ञ
 
नव्या पिढीतील विद्यार्थ्यांचे अभ्यासाव्यतिरिक्तचे वाचन कमी होत चालले आहे. वाचणारी जुनी आणि मध्यम पिढीही विविध डिजिटल माध्यमांच्या आहारी जात असल्याने त्यांचे वाचन कमी झाले आहे. या सर्वांना पुन्हा वाचनाची गोडी लागावी, यासाठी या तीन संस्थांनी एकत्र येऊन या ‘अखंड वाचनयज्ञा’ची तयारी सुरू केली आहे.
हेमंत नेहते, सचिव व संयोजक, अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान
वाचकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी हा ‘वाचनयज्ञ’
 
आताच्या काळात वाचनाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. पुस्तके प्रत्यक्ष विकत घेऊन वाचणारे वाचकांची संख्या सध्या घटत आहे. त्यामुळे वाचकांमध्ये आणि विशेषतः लहान मुलांमध्ये वाचनाची कमी होत चाललेली आवड पुन्हा निर्माण करण्यासाठी आम्ही हा ‘वाचनयज्ञ’ सुरू केलेला आहे.
 
डॉ. योगेश जोशी, वाचनयज्ञ उपक्रमाचे संकल्पनाकार
 
 
दिपाली कानसे 
Powered By Sangraha 9.0