जयपुर : अजमेर मध्ये जिथे मोईनुद्दीन चिश्ती दर्गा जिथे स्थित आहे तिथे काही काळापूर्वी संकटमोचन महादेव मंदिर असल्याचा दावा करण्यात आला आहे. या संर्दभातील याचिका नुकतीच राजस्थानच्या अजमेर दिवाणी न्यायालयाने स्विकारली. यावर आता पुढची सुनावणी २० डिेसेंबर रोजी होणार आहे. न्यायालयाने या संदर्भात, अल्पसंख्याक मंत्रालय, दर्गाह समिती आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) यांना नोटीस बजावली आहे. याचिकेत दर्ग्याच्या जागी हिंदू मंदिर उभारण्यासाठी तीन कारणे देण्यात आली आहेत.
या याचिकेत हिंदू सेनेचा प्रमुख विष्णु गुप्ता यांनी दावा केला आहे की, मोईनुद्दीन चिश्तीच्या दर्ग्यातील दरवाजांचे बांधकाम आणि कोरीव काम हे हिंदू मंदिर असल्याची पुष्टी करते. दर्ग्यात असलेल्या बुलंद दरवाजाची रचना हिंदू मंदिरांच्या दरवाजांसारखी आहे. गुप्ता यांनी दिलेले दुसरे कारण म्हणजे दर्ग्याची वरची रचना. दर्ग्याच्या छताच्या रचनेत हिंदू मंदिरांच्या अवशेषांसारख्या गोष्टीही दिसतात. गुप्ता यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, त्याचे घुमट पाहून असा अंदाज लावता येतो की हे पूर्वीचे मंदिर असावे आणि ते पाडल्यानंतर त्याच्या अवशेषांवर हा दर्गा बांधण्यात आला असावा. गुप्ता यांनी यात दिलेले तीसरे कारण म्हणजे जिथे शिवाचे मंदिर असते तिथे विशिष्ठ ठिकाणी पाण्याचा धबधबा असणे गरजेचे आहे. या दर्गयात सुद्धा हेच साम्य आहे. याशिवाय त्यांनी आपल्या याचिकेत हरबिलास शारदा यांच्या 'अजमेर: हिस्टोरिकल अँड डिस्क्रिप्टिव्ह' या पुस्तकाचाही संदर्भ दिला आहे.
गुप्ता यांचा दावा आहे की या पुस्तकात मोईनुद्दीनचा दर्गा असलेल्या ठिकाणी पूर्वी हिंदू मंदिर होते असे म्हटले आहे. पुस्तकात असा दावाही करण्यात आला आहे की येथे एक हिंदू जोडपे राहत होते आणि दर्गाहच्या ठिकाणी बांधलेल्या महादेव मंदिरात पूजा करत होते. ते सकाळी महादेवाला चंदनाचे टिळक लावीत व जलाभिषेक करीत असे. शारदा यांनी हे पुस्तक १९११ मध्ये लिहिले. विष्णू गुप्ता यांचे वकील रामस्वरूप बिश्नोई यांनी सांगितले की, दिवाणी न्यायाधीश मनमोहन चंदेल यांच्या खंडपीठाने या प्रकरणाच्या सुनावणीस मान्यता दिली आहे. हे प्रकरण भगवान श्री संकटमोचन महादेव विराजमान विरुद्ध दर्गा समिती यांच्यातील आहे. बिष्णोई म्हणाले की, यापूर्वी ७५०पानांचा अहवाल सादर करण्यात आले असून त्यातील ३८ पानांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.