गोर - गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती : श्रीकांत शिंदे

    28-Nov-2024
Total Views |

shinde
 
मुंबई : ( Shrikant Shinde ) महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २६ नोव्हेंबर रोजी राज्यपालांकडे त्यांच्या पदाचा राजीनामा सुपुर्द केला. यानंतर त्यांनी ठाण्यामध्ये २७ नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत “कुठल्याही पदापेक्षा लाडक्या बहिणींचा लाडका सख्खा भाऊ ही माझी ओळख सर्वाधिक मोठी आहे.” असे वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केले. तसेच मोदी आणि शाहांचा निर्णय आपल्याला मान्य असल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी वडिलांसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.
 
 
काय आहे श्रीकांत शिंदेंची पोस्ट ?
 
मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्य नेते मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली. ते स्वतःला 'सीएम' म्हणजे 'कॉमन मॅन समजत. त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला.
 
कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येते. आज त्यांनी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी आणि माननीय श्री. अमित शहाजी यांच्यावर विश्वास ठेवून, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवले आहे.
 
सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले. त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गोर - गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे. खूप अभिमान वाटतो बाबा!, अश्या शब्दांत श्रीकांत शिंदेंनी ही पोस्ट लिहिली आहे.