मुंबई : (PM Narendra Modi) मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बुधवारी २७ नोव्हेंबरला रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला. हा फोन आल्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षात एकच खळबळ उडाली. या फोनकॉलची मुंबई पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली असून मुंबई पोलिसांकडून धमकी देणाऱ्याचा कसून शोध घेतला गेला.
याबाबत अधिक माहिती अशी की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याचा कट सुरू असून वेपनची तयारी झाल्याची माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीने दिली. यामध्ये कॉल करणारी व्यक्ती एक महिला असल्याचा दावा करण्यात येत आहे. याधमकी प्रकरणात आंबोली पोलिसांनी शितल चव्हाण नावाच्या एका महिलेला ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी मुंबईच्या आंबोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात या महिलेचे वय ३४ वर्ष असून ती मानसिक दृष्ट्या अस्थिर असल्याचे समोर आले आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सत्तास्थापनेसंदर्भात हालचाली सुरु आहेत. या दरम्यान थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देणारा हा फोन कॉल आल्याने एकच खळबळ उडाली आहे.