मुरादाबाद मध्ये 'कमळ' फुलले. रामवीर यांनी संपवला भाजपचा वनवास!

28 Nov 2024 20:28:41

moradabad

लखनौ : महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीच्या दणदणीत विजयानंतर, विधानसभेच्या ज्याजागेबद्दल सर्वात जास्त बोलबोला होत असेल तर ती जागा म्हणजे उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील कुंडरकी जागा. ही जागा उत्तर प्रदेशातील सात जागांपैकी एक होती जिथे पोटनिवडणूक झाली होती. या जागेचे वैशिष्टय़ म्हणजे हा मुस्लिमबहुल भाग असून येथे एका हिंदू उमेदवाराने बाजी मारली आहे.
 
ठाकूर रामवीर सिंह यांनी विजयाचा झेंडा फडकवत भाजपचा ३१ वर्षांचा वनवास संपवला आहे. या जागेची विशेष बाब म्हणजे येथे मुस्लिमांची लोकसंख्या ६४ टक्के आहे.मुस्लिमांची इतकी जास्त लोकसंख्या असलेल्या ठाकूर रामवीर सिंह यांना एकूण १,७०,३७१ मते मिळाली. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी समाजवादी पक्षाचे उमेदवार मोहम्मद रिझवान यांचा १,४४,७९१ मतांनी पराभव केला. रिझवान यांना केवळ २५,५८० मते मिळाली. कुंडरकी जागेवर विरोधकांना मिळालेल्या एकूण मतांची बेरीज केली, तर ती ठाकूर रामवीर सिंह यांना मिळालेल्या मतांच्या निम्म्याही नाहीत. येथे एकूण ११ मुस्लिम उमेदवार उभे होते. ठाकूर रामवीर सिंह हे एकमेव हिंदू उमेदवार होते. ठाकूर रामवीर सिंह यांची सहज उपलब्धता आणि तुर्क विरुद्ध राजपूत मुस्लिम या समीकरणाचा या विजयात मोठा वाटा आहे. हे समीकरण आता भाजपसाठी अत्यंत यशस्वी आणि महत्त्वाचे बनले आहे. बोहरा, पसमांदा आणि मुस्लिम महिलांचा गट आपल्या बाजूने घेतल्यानंतर भाजप आणि आरएसएस हिंदू-धर्मांतरित मुस्लिमांना आपल्या बाजूने घेण्याच्या रणनीतीवर काम करत आहेत. देशातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या धर्मांतरित आहे. त्यातही क्षत्रिय समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. भाजपचे हे नवे समीकरण पुढच्या निवडणुकांमध्ये देखील लागू होते का, हे बघणे औतसुक्याचे ठरेल.

 
Powered By Sangraha 9.0