पोंभुर्णा येथील आर्सेलर मित्तलचा प्रस्तावित पोलाद कारखाना लवकर सुरू करण्यासंदर्भात मुनगंटीवारांचे प्रशासनास निर्देश
28-Nov-2024
Total Views |
मुंबई : (Lakshmi Mittal Group) चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा येथे लक्ष्मी मित्तल समुहाच्या प्रस्तावित पोलाद कारखान्याच्या स्थापनेचा मार्ग अधिक प्रशस्त झाला असून कारखाना प्रशासनासमोरच्या अडचणी वेगाने सोडवून हा कारखाना लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी वेगाने पावले उचलण्याचे निर्देश दि. २८ नोव्हेंबर रोजी सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाच्या विविध विभागांना दिले आहेत. लक्ष्मी मित्तल समुहाचा हा प्रस्तावित पोलाद कारखाना आशियातील सर्वात मोठा पोलाद प्रकल्प ठरणार असून पोंभुर्ण्यातील पाच हजार एकर जमिनीवर या पोलाद प्रकल्पाची उभारणी होणार आहे. या कारखान्याच्या उभारणीच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींसंदर्भात मुंबईत झालेल्या एका बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांनी हे निर्देश दिले.
लक्ष्मी मित्तल समुहाने पोंभुर्णा येथील या पोलाद प्रकल्पात चाळीस हजार कोटींची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले असून मार्च २०२४ मधेच "ॲेडव्हांटेज चंद्रपूर" या गुंतवणूक परिषदेत जिल्हा परिषदेसोबत तसा सामंजस्य करार केला आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे मिळून एकूण साठ हजार रोजगार या पोलाद प्रकल्पातून निर्माण होतील असा विश्वास आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
मोठा रोजगार उपलब्ध करून देणारा हा कारखाना लवकरात लवकर सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. या बैठकीत वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी तसेच आर्सेलर मित्तल उद्योग समुहाचे कंपनी सल्लागार राजेंद्रजी तोंडापूरकर हे देखील उपस्थित होते.