पुनरुत्थान विद्यापीठ : पुरस्कार भारतीय बौद्धिक संपदेचा

28 Nov 2024 21:30:56
educationist prof Indumati Katadare
 
‘महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थे’च्या वतीने देण्यात येणारा ‘बाया कर्वे पुरस्कार’ यावर्षी अहमदाबाद, गुजरात येथील व भारतभर कार्यरत अशा ‘पुनरुत्थान विद्यापीठ’ या संस्थेच्या संस्थापक व शिक्षणतज्ज्ञ प्रा. इंदुमती काटदरे यांना आज, दि. 29 नोव्हेंबर रोजी विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पद्मश्री डॉ. निवेदिता भिडे यांच्या हस्ते पुण्यात प्रदान करण्यात येणार आहे. भारतीय प्राचीन बौद्धिक संपदेच्या पुनरुत्थानाकरिता पाच दशकांहून अधिक कालावधी प्रा. इंदुमती काटदरे कार्यरत आहेत. सद्यस्थितीतील शिक्षणपद्धतीत भारतीय दृष्टिकोनातून बदल घडवून आणण्याच्या त्यांच्या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन, त्यांना ‘बाया कर्वे पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येत आहे. एक लाख, एक हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यानिमित्ताने प्रा. इंदुमती काटदरे यांच्या समग्र कार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...

128 वर्षांपूर्वी भारतरत्न महर्षी कर्वे यांनी पुण्यात स्थापन केलेल्या ‘महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थे’च्या वतीने संस्थेच्या शताब्दी वर्षापासून म्हणजेच 1996 सालापासून सामाजिक वा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांना ‘बाया कर्वे पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येते. समाजाच्या उत्थानाकरिता प्रेरणादायी कार्य उभ्या करणार्‍या महिलांचा सन्मान यानिमित्ताने संस्थेमार्फत केला जातो. यासोबतच या महिलांनी या कार्य उभारणीत पेललेली आव्हाने व अडचणींचीही विशेष ओळख समाजाला करून दिली जाते.


शिक्षणतज्ज्ञ प्रा. इंदुमती काटदरे यांच्या कार्याची ओळख

इंदुमतीताईंचा जन्म 1949 रोजी व शिक्षण कलोल, गुजरात येथे झाले असून, त्यांचे मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत व इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व आहे. लेखिका म्हणून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून, त्यापैकी ‘चिती से विराट की ओर’, ‘एकात्मक मानव दर्शन व शिशुवाटिका:’, ‘तत्त्व एवं व्यवहार:’ ही पुस्तके अभ्यासक, संशोधक, समाज व मानववंश शास्त्रज्ञ याच्याकरिता खास बौद्धिक मेजवानी ठरत आहेत. ‘इंदुबेन’ म्हणून स्वयंसेवी क्षेत्रात सर्वपरिचित अशा इंदुमतीताई अत्यंत शांत व मृदू स्वभावाच्या असून, त्यांचे विचार, स्वत:च्या कामावरील विश्वास व निष्ठा या त्यांच्याशी संवाद साधताना, खूप ठळकपणे अधोरेखित होतात. ‘शिशुवाटिका प्रकल्प’ उभा करून आज तो देशभर चालू करण्यामागील विचार व प्रेरणा म्हणजे ‘इंदुबेन’!

संस्कृत आणि इंग्रजी या विषयात एम. ए.पर्यंत शिक्षण घेतलेल्या इंदुमतीताईंनी 1971 साली इंग्रजी अध्यापनास सुरुवात केली. ‘भारतीय मूल्ये आणि संस्कृती अनुसार युवा पिढीस शिक्षित करणे’ हे प्रमुख लक्ष्य असलेल्या ‘विद्याभारती’ या संस्थेशी पुढे त्यांचा संपर्क आला आणि आपल्या जीवनाचे खरे उद्दिष्ट त्यांना सापडले. इंदुमतीताईंनी ‘विद्याभारती’च्या माध्यमातून महिला नेतृत्वाला सक्षम करणे, पालकांमधील शिक्षकास घडविणे आणि शिशूच्या प्रगतीमध्ये कुटुंबाचे महत्त्व समजावून सांगणे, याकामात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.

सन 2004 मध्ये त्यांनी ‘पुनरुत्थान ट्रस्ट’च्या माध्यमातून ‘पुनरुत्थान विद्यापीठा’ची स्थापना केली. सदर विद्यापीठाचे काम शिक्षणव्यवस्थेचे भारतीयकरण करणे व शासन संचालित शिक्षण व्यवस्थेपेक्षा समाज, सज्जनशक्ती संचालित शिक्षणव्यवस्था निर्माण करणे व त्याला समाजमान्यता प्राप्त करून देणे, असे आहे.

कुटुंबातील सदस्य संघकार्यात सक्रिय असल्यामुळे, कुटुंबात संघाचे वातावरण व संघ संस्कार होतेच. त्यामुळे अगदी लहान वयापासून संघ परिवारातील अनेक ज्येष्ठांचे विचार, भेटी व ‘भारतीयत्वाची व प्राचीन बौद्धिक संपदेची संकल्पना’ ऐकत मोठ्या झालेल्या इंदुमतीताईंना भारतीय बौद्धिक संपदेचे बाळकडू अगदी लहान वयातच मिळाले. संघसंस्कारांनी त्यांच्या मनाची मशागत झाली व कालांतराने याच सुपीक मनातून एक आव्हानात्मक व विधायक कार्य त्यांनी स्वतःवरील विश्वास, कामावरील निष्ठा व समाजाप्रतीचे उत्तरदायित्व जपत उभे केले आहे.

‘पुनरुत्थान विद्यापीठ’ ही शिक्षणाचा ‘समग्र विकास’ करणारी एक आगळीवेगळी शिक्षणसंस्था. शिक्षण म्हणजे केवळ उच्चशिक्षण नव्हे, खरे शिक्षण जन्मापासूनच सुरु होते आणि जीवन संपेपर्यंत ते चालू असते. ‘पुनरुत्थान विद्यापीठ’ हे गर्भावस्था ते वृद्धावस्थेपर्यंतच्या आजीवन शिक्षणाचा विचार करते. भारताची शिक्षणपरंपरा सर्वांत प्राचीन आणि श्रेष्ठ आहे. गुरुकुल, आश्रम विद्यापीठ आणि छोट्या-छोट्या प्राथमिक विद्यालयांमध्ये जीवनाचा विकास होता होता आणि व्यक्ती तसेच, राष्ट्राचे जीवन सुख, समृद्धी आणि संस्कार परिपूर्ण होता, संपूर्ण विश्व याचा लाभ घेत होते. परंतु, ब्रिटिशांनी ही परंपरा तोडून ‘युरो-अमेरिकन शिक्षणपद्धती’ भारतात आणली. या ‘युरो-अमेरिकन शिक्षणपद्धती’चे पुन्हा भारतीय शिक्षणपद्धतीमध्ये रुपांतरण करुन नवीन आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न पुनरुत्थान करीत आहे.

“शिक्षणाचे बाजारीकरण, ढासळलेली कुटुंबव्यवस्था, वाढलेले परावलंबित्व आणि मूल्यांचा होत असलेला र्‍हास या सगळ्यांमागे ‘कुटुंब आणि शाळां’चा खालावलेला स्तर कारणीभूत आहे,” असे इंदुमतीताई यांचे ठाम मत आहे. व्यक्ती, समाज आणि देशाचे पुनरूत्थान करून परत एकदा मूल्यशिक्षण, कर्मशिक्षण आणि शास्त्रशिक्षण स्थापित करण्याचे आणि ‘कुटुंब व शाळा’ या समाजाच्या दोन मुख्य केंद्रांना सशक्त करण्याचे कार्य इंदुमतीताई ‘पुनरूत्थान’मार्फत भारतभर करीत आहेत.

मूल्याधारित शिक्षण केंद्रस्थानी असलेले हे शुद्ध भारतीय विद्याकेंद्र असून, भारतीय पारंपरिक दृष्टिकोनातून शिक्षणपद्धतीवर कार्य या संस्थेमार्फत केले जाते. आज आपल्या देशात शास्त्रशिक्षणावर अधिक भर दिला जातोय. मात्र, प्रथम मूल्यशिक्षण देऊन चांगला माणूस घडवणे, कर्मशिक्षणातून मुलांना स्वावलंबन शिकवणे आणि नंतर शास्त्रशिक्षणाद्वारे बुद्धीचा विकास करण्याचे असे तीन टप्पे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत करून इंदुमतीताई हे काम करीत आहेत. या कामाचे हेच ठळक वेगळेपण व सौंदर्य आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

इंदुमतीताईंच्या नेतृत्वात संस्थेमार्फत अनेक पथदर्शी उपक्रम राबविण्यात येत असून, त्यांचा अभ्यास व प्राप्त फलितांचे संशोधन करीत एक ‘समग्र मॉडेल’ म्हणून काही शाळांमध्ये बालवाडीपासून सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असून, विद्यार्थी, पालक व शिक्षणांवर होणार्‍या परिणामांचे निरीक्षण अभ्यास ही करण्यात येत आहे. हे मॉडेल यशस्वी झाल्यास मोठ्या प्रमाणावर इच्छुक शाळांमध्ये ते राबविण्यात येईल या दृष्टीने इंदुमतीताई सूक्ष्म नियोजन व दस्तावेजीकरण करीत आहेत.

‘कुटुंबव्यवस्थेचे सशक्तीकरण’ हे उद्दिष्ट या अभ्यासक्रमाच्या केंद्रस्थानी ठेवत संबंधित संस्थेमार्फत ‘अधिजनन’ शास्त्राचा अभ्यासक्रम नवविवाहित जोडप्यांसाठी चालविला जातो. त्यात ‘विवाह संस्कार, गर्भसंस्कार, एकनिष्ठता आदी सामाजिक सांस्कृतिक मूल्यांचे शिक्षण’ असे विषय कौटुंबिक/वैवाहिक जीवनात दूरगामी सकारात्मक परिणामकारकता साधण्याकरिता जाणीवपूर्वकरीत्या हाताळले जातात.

तसेच संशोधन, अध्ययन, ग्रंथनिर्मिती (भाषांतर, पुनर्लेखन), अभ्यासक्रम निर्माण, शिक्षक निर्माण असे कार्य ‘पुनरूत्थान विद्यापीठा’द्वारे केले जाते. ‘ज्ञानसागर महाप्रकल्पां’तर्गत 2019 साली इंदुमतीताईंच्या पुढाकारातून, एकाचवेळी विविध विषय व भाषांमधील 1 हजार, 051 पुस्तकांची निर्मिती व प्रकाशन करण्यात आले होते. देशातील अनेक भागांत असे काम सुरु करून इंदुमतीताईंनी विद्यापीठाच्या कार्याला गती व दिशा देण्यात मोलाची भूमिका बजाविली आहे.

या कामाचे चिंतन, मनन, त्यावर सारासार विचार करणे, हे विचार प्रत्यक्ष कृतीत आणताना त्याचे नेमकेपणाने नियोजन करणे, अनेक गोष्टींची उपलब्धता व मुख्य म्हणजे, या कार्यातील मर्यादा याचा स्वीकार त्या अत्यंत सहजतेने करीत, आपले काम मार्गी लावत असतात. त्यांच्या स्वभावातील हीच लवचिकता व संयम अनेक उपक्रम मार्गी लावण्यात मोलाची ठरत आहे.

या सर्व कामांकरिता प्रशिक्षित, अनुभवी व समविचारी मनुष्यबळ वाढविण्याचे कामही त्या कौशल्याने व संबंधितांना आपल्या कामाविषयीच्या चिंतनास उद्युक्त करणारे अवकाश देत करतात, हे विशेष. त्यांनी घडविलेले अनेक स्वयंसेवक त्यांचा विचार घेऊन आज भारतभर अत्यंत उत्तम कार्य करीत आहेत.

विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात शिक्षक, शिक्षण, स्वविकास व शिक्षक ते आचार्य रुपांतर प्रक्रिया राष्ट्रीयता व राष्ट्रदर्शन कुटुंब शिक्षण, वर-वधू चयन व विवाह संस्कार गृहअर्थशास्त्र व गृहस्थाश्रमाचा समाजधर्म, लोकशिक्षण, पालकांची बालकांप्रती शिक्षक म्हणून भूमिका मूल्यशिक्षण आणि कर्मशिक्षण’ असे अनेक महत्त्वाचे विषय अंतर्भूत असून, या प्रकारच्या अभ्यासक्रमाकडे समाज पुनरुत्थानाची एक संधी म्हणून पाहू लागला आहे.

या कार्यास मिळू लागलेली ही समाजमान्यता आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एखादा विचार समाजात पुढे नेण्याकरिता अनेकदा त्यास शासनमान्यता लाभणेही महत्त्वाचे असते. मात्र, एका विशिष्ट विचाराने हाती घेतलेले कार्य केवळ आर्थिक व शासनमान्यतेकरिता, स्वत:च्या मनाला मुरड घालत करणे त्यांना अजिबात मान्य नाही. स्वत:च्या विचारांना कुठेही पातळ करून केवळ प्रसिद्धी व मान्यतेकरिता इंदुमतीताई या सगळ्यापासून जाणीवपूर्वक दूर राहिल्या आहेत. हे त्यांच्या कार्याचे एक ठळक वैशिष्ट्यच. किंबहुना, गुरुकुल पद्धतीतील ‘गुरु दक्षिणा’ संकल्पना त्या आपल्या सर्व उपक्रमात राबविताना दिसतात.

“शिक्षण सक्तीचे नव्हे, तर आवडीचे असावे,” असे स्पष्ट मत इंदुमतीताई मांडतात. आधुनिक शिक्षणपद्धतीत वयाच्या अडीच वर्षांपासून मुलांवर शाळेचे ओझे लादले जाते. मात्र, वयाच्या पाच वर्षांपर्यंत मुलांचा खरा विकास हा कुटुंबात होत असतो, हे आज आपण विसरलो आहोत, अशी खंत त्या व्यक्त करतात. या काळात आईने संस्कार करायचे असतात, शिष्टाचार शिकवायचे असतात. पण, अतिरेकी हव्यासापोटी आपण मुलांना स्पर्धेत धावण्यासाठी भाग पाडतो. त्यांची इच्छा, आवड यांचा विचार केला जात नाही.

‘सार्वत्रिक शिक्षण’ हे प्रामुख्याने कुटुंबात, शाळेत व मंदिरात मिळते व ते आवडीचे शिक्षण ठरते, या दृष्टीने त्या आपल्या कार्याची नेहमीच आखणी करताना दिसत आहेत. समाज हे ज्ञानाचे स्रोत आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवहारात उपयोगी पडेल, अशा शिक्षणाची आज गरज निर्माण झाली आहे. आज मुलांना व्यावहारिक, दैनंदिन जीवनातील शिक्षण मिळत नाही. दुर्दैवाने मुलांजवळ आपली संस्कृती, शिष्टाचार शिकायला वेळच राहिला नाही. शिक्षित व्यक्तीने सज्जन असावे, हे समीकरण चुकले आहे. त्याचा परिणाम आजच्या शिक्षणपद्धतीमुळे जाणवतो व नेमका या गोष्टीचा संदर्भ घेत, मुळात भारतीय जीवनपद्धतीचा गाभा हा ज्ञान आहे, हे समजून उमजून त्या आपल्या बौद्धिक संपदेचे पुनरुत्थान होणे महत्त्वाचे काम असल्याचे त्या विश्वासाने सांगतात. म्हणूनच ‘भविष्य घडवणारी शाळा’ म्हणजेच ‘वात्सल्य वाटिका’ उपक्रम या संस्थेमार्फत अनेक राज्यात चालवितात.

इंदुमतीताई आपल्या सर्व कार्यात अखंडपणे ’खघड’ च्या काळातीत ‘व्यावहारिक शहाणपण’ या संकल्पनेस मुख्य अभ्यासक्रमात अंतर्भूत करीत आहेत. मुख्य म्हणजे, सांस्कृतिक मुळांची सखोल माहिती देऊन संबंधितांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहित केले जाते. तंत्रज्ञान आणि वेगवान बदलांचे वर्चस्व असलेल्या जगात, हजारो वर्षांपासून मानवतेला मार्गदर्शन करणारे व्यावहारिक शहाणपण पुन्हा शोधण्यासाठी, आपल्या मुळांशी पुन्हा जोडण्याची गरज यानिमित्ताने समोर आणली जाते. भारतातील प्राचीन ज्ञानप्रणाली, जीवनाच्या विविध पैलूंमध्ये, तत्त्वज्ञान आणि नैतिकतेपासून विज्ञान आणि कलेपर्यंत अंतर्दृष्टीचा खजिना आपली प्राचीन बौद्धिक संपदा देते, हे मात्र त्या वारंवार नमूद करतात. जगाच्या सर्वसमावेशक आकलनासह सुसज्ज होणे इतपतच पुरेसे नाही, तर गंभीर विचार, सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याची कौशल्येदेखील आज शिक्षण घेताना वाढणे आवश्यक असल्याचे मत त्या व्यक्त करतात.

मुळात विद्यार्थी सिद्धांत आणि सराव जोडण्यास शिकतात. जगाला अनेक दृष्टिकोनातून पाहतात आणि त्यांचे ज्ञान वास्तविक-जगातील आव्हानांना लागू करतात. या पुनरुत्थानाच्या केंद्रस्थानी एका अनोख्या शाळेची दृष्टी आहे. तथापि, ही सुरुवातीची पायरी केवळ एका भव्य मोहिमेची सुरुवात दर्शवते.

‘पुनरुत्थान विद्यापीठा’मार्फत चालविल्या जाणार्‍या ‘चैतन्यशील’ शाळांमध्ये तरुणांच्या मनात केवळ ज्ञानच नाही, तर देशभक्ती आणि पर्यावरणीय जाणिवेची बीजे रुजवली जातात. गाण्यांच्या मनमोहक सुरांमधून, स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रेरणादायी कथा आणि त्यांना त्यांच्या परंपरेशी जोडणार्‍या आकर्षक उपक्रमांतून त्यांच्या राष्ट्राप्रती अथांग प्रेम त्यांच्या हृदयात रुजते.

ज्ञान, संस्कार, शिस्त, दैनंदिन जीवनमूल्ये, अर्थभान, समर्पण, व्यक्तिनिर्माण, देशभक्ती, परंपरा, संस्कृती आणि व्यावहारिक शहाणपणाची शिकवण देणार्‍या इंदुबेन कर्वे संस्थेच्या ‘बाया कर्वे पुरस्कारा’ने सन्मानित झाल्या असून, त्यांची माहिती वाचणार्‍या, त्यांना भेटणार्‍या अनेक मुली-स्त्रिया उद्या असेच कार्य उभे करण्याची उर्मी व प्रेरणा घेतील, त्यांचे काम अधिक गतीने पुढे नेतील, समाजात व कुटुंबात पुनरुत्थानाचे कार्य उभे करतील, हे नक्की! प्रा. इंदुमती काटदरे यांच्या कार्यास विनम्र अभिवादन!

स्मिता कुलकर्णी
(लेखिका महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था, पुणेच्या उपाध्यक्षा आहेत.)


Powered By Sangraha 9.0