हिंदूंचे ‘वसुधैव कुटुंब’ कोठे आहे?

28 Nov 2024 21:03:55
editorial on bangladesh hindu harassment


जगाच्या कोणत्याही भागात मुस्लीमविरोधी दंगे झाले, तर जगभरातील मुस्लीम देशांकडून त्याविरोधात एकसूराने आवाज उठविला जातो. अनेकदा संयुक्त राष्ट्रांमध्येही त्याचा निषेध नोंदवला जातो. भारतातील धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आल्याचे तद्दन बोगस अहवाल वेळोवेळी जारी करणार्‍या संयुक्त राष्ट्रांच्या कथित समित्यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांविरोधात मात्र पूर्ण मौन धारण केले आहे. भारताला म्हणूनच बांगलादेशातील हिंदूंच्या हक्कांवर बोलण्याचा आणि गरज भासल्यास त्या देशात हस्तक्षेप करण्याचा हक्क आहे.

बांगलादेशातील हिंदूंविरोधी हल्ले आणि हत्याकांड यात खंड पडलेला नाही. ऑगस्टमध्ये तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांच्याविरोधात बंड करण्यात आले आणि त्या देशात इस्लामी कट्टरवादाने सत्ता हस्तगत केली. त्यानंतर शेख हसीना यांच्याविरोधातील या आंदोलनाने चक्क हिंदूविरोधी जिहादचे रूप घेतले. आतापर्यंत शेकडो हिंदूंची सर्रास हत्या करण्यात आली असून, हजारो हिंदू महिलांवर अत्याचार करण्यात आले आहेत. शक्य तितकी मंदिरेही पाडण्यात आली आहेत. आता तर त्या देशातील ‘इस्कॉन’ या संघटनेला दहशतवादी ठरविण्याचा विचार तेथील अंतरिम सरकार करीत आहे. ‘इस्कॉन’ या संघटनेचे एक धर्मगुरू चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना नुकतीच अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संघटना दहशतवादी असल्याचा महान शोध त्या देशाच्या ‘नोबेल’ सरकारने लावला. त्यामुळे या संघटनेवर बंदी आणण्याचा विचारही केला जात आहे. सुदैवाने तेथील उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्यामुळे अशी बंदी घालण्याचा निर्णय सध्या तरी टळला आहे.

‘इस्कॉन’ ही प्रामुख्याने अमेरिकास्थित धार्मिक संघटना असून, ती जगभर भगवद्गीतेचा आणि कृष्णलीलांचा प्रचार व प्रसार करते. अमेरिकेपासून रशियापर्यंत आणि युरोपपासून आफ्रिकेपर्यंत तब्बल 177 देशांमध्ये या संघटनेचे कार्य सुरू असते. किंबहुना, काही आखाती देशांमध्येही ही संघटना कार्यरत आहे. या मुस्लीम देशांना ही संघटना दहशतवादी आहे, असा शोध लागलेला नाही. जो दरिद्री आणि भुकेकंगाल बांगलादेशाला लागला आहे. पण, ‘इस्कॉन’ ही धर्मादाय संस्था असून, तिच्यातर्फे अनेक प्रकारची मोफत मदत दिली जाते. ही संस्था हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करीत असली, तरी ती कोठेही धर्मपरिवर्तनाच्या कामात गुंतलेली नाही. यंदा बांगलादेशात आलेल्या पूरस्थितीत याच चिन्मय कृष्णदासांनी स्वत: अनेक ठिकाणी होड्यांमधून मदत पोहोचविली होती. पाश्चिमात्य देशांमधील असंख्य नागरिकांनी या संस्थेच्या माध्यमातून हिंदू तत्त्वज्ञान आणि धार्मिक परंपरा जाणून घेतल्या आहेत. या संस्थेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे.

बांगलादेशातील विद्यमान राजवट ही कट्टरपंथीय असून, ती तालिबान्यांपेक्षाही जुलमी आहे. त्या देशात नगण्य म्हणता येतील, इतकेच हिंदू शिल्लक आहेत. पण, तितकेसुद्धा तेथील राज्यकर्त्यांच्या नजरेत सलत आहेत. ऑगस्टपासून शेकडो हिंदू जिवानिशी गेले आहेत. जी काही मोजकी मंदिरे अजून तगली आहेत, ती पाडण्यासाठी कट्टरपंथीयांच्या टोळ्या रस्त्यावरून फिरत असतात. अनेक हिंदू विद्यार्थ्यांनाही महाविद्यालयांमध्ये जाणे आता अशक्य बनले आहे. पण, यापैकी कशाचीच दखल जगाने घेतलेली नाही, ही आश्चर्याइतकीच दुर्दैवी बाब आहे. ख्रिश्चन आणि इस्लामी धर्मप्रसारक जगाच्या अनेक भागांमध्ये आजही जमेल त्या पद्धतीने आपल्या धर्माचा प्रसार करीत आहेत. त्यांना या धर्माच्या प्रमुख केंद्रांकडून अब्जावधी रुपयांचा निधी मिळत असतो. जगातील गरीब देशांतील जनतेला त्यांच्या गरजेच्या वस्तू आणि सेवा पुरवून आपल्या धर्माकडे वळविले जाते. ईशान्य भारताचे ख्रिस्तीकरण अशाचप्रकारे पार पाडण्यात आले असून, अजूनही तेथे धर्मप्रसारक कार्यरत आहेत. या दोन धर्मांच्या लोकांवर कोठेही अन्याय-अत्याचार झाला, तर त्या त्या धर्माचे देश लगेच जागतिक स्तरावर त्याचा उल्लेख करतात.

जगात भारत हा हिंदूधर्मीयांचा एकमेव देश असल्याने जगभरातील हिंदूंच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठविण्याचा अधिकार भारताला आहे. या देशात आजही हिंदू बहुसंख्य असले, तरी अन्य धर्मियांच्या लोकसंख्येचे प्रमाण भारतात सातत्याने वाढत आहे. त्यात अर्थातच इस्लामीचे अनुयायी आघाडीवर आहेत. तरीही पूर्वीच्या अखंड भारताचे तुकडे पडून निर्माण झालेल्या देशांमध्ये आजही हिंदू विखुरलेले आहेत. त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठविण्याचा अधिकार भारत सरकारला आहे. कारण, अन्य देशांतील आपल्या धर्मीयांच्या धार्मिक हक्कांसाठी आणि हितांच्या रक्षणासाठी ख्रिश्चन व इस्लामी देश जागरूक असतात. भारताने आजवर कधीच दुसर्‍या देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केलेला नाही. पण, कोणत्याही देशातील हिंदूंच्या जीवित सुरक्षेसाठी भारत नक्कीच आवाज उठवू शकतो.

भारताने नेहमीच संपूर्ण जगाला एक कुटुंब मानले आहे. भारतात पार पडलेल्या ‘जी-20’ देशांच्या परिषदेतही ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना मध्यवर्ती ठेवण्यात आली होती. पण, ही भावना केवळ भारतीयांच्या सुसंस्कृत संस्कारांतून आली असून, ती एकतर्फीच आहे की काय, अशी शंका घेण्यासारखी स्थिती आहे. जगाच्या अनेक भागात इस्लामिक कट्टरवादाने सत्ता हस्तगत केली असून, त्या देशांकडून नेहमी भारताविरोधीच भूमिका घेतली जाते. तुर्कीयेने जागतिक मंचावर काश्मीरप्रश्नात भारतविरोधी भूमिका घेतली होती. तीच बाब युक्रेनची. त्या देशाचा भारत-पाकिस्तान वादाशी काडीचाही संबंध नसताना त्या देशानेही निष्कारण संयुक्त राष्ट्रांमध्ये काश्मीर प्रश्नी पाकिस्तानची बाजू उचलून धरली होती. असे असूनही तुर्कीये या देशाला भारताने भूकंपाच्या आपत्तीत सर्वप्रथम मदत केली होती.

रशियाच्या युद्धातही भारताने प्रत्येक देशाच्या सार्वभौम सरहद्दींचे पावित्र्य राखले गेले पाहिजे, असेच म्हटले होते. तरीही या देशांकडून भारताच्या बाजूने क्वचितच भूमिका घेतली जाते. त्यामुळे भारत ज्या जगाला आपले कुटुंब मानतो, ते कुटुंब भारताच्या हितसंबंधांच्या बाजूने अजूनपर्यंत उभे का राहिलेले नाही? अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारकाळात फक्त रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी उघडपणे बांगलादेशातील हिंदूंच्या नरसंहाराचा उल्लेख केला होता. ज्याप्रमाणे जगभरातील ज्यू लोकांच्या सुरक्षेसाठी इस्रायल देश सदैव सक्रिय असतो, त्याप्रमाणे आता भारतानेही जगभरातील हिंदूंच्या हितासाठी सक्रिय होण्याची वेळ आली आहे. भारत ही महासत्ता नसली, तरी ती आशिया खंडातील एक मोठी सत्ता आहे. भारताने आपल्या आर्थिक आणि लष्करी सामर्थ्याची नुसती चुणूक दाखविल्यास टिचभर बांगलादेश गुडघ्यावर येईल. भारताने त्या देशाला निर्वाणीचा इशारा दिल्यास, तेथील हिंदूंचे प्राण वाचण्याची शक्यता आहे.


Powered By Sangraha 9.0