धारावी पुनर्विकास प्रकल्पाला वेग

२५,०००हून अधिक झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण; ६०,००० हून अधिक झोपड्यांची गणना पूर्ण

    28-Nov-2024
Total Views |
 
DHARAVI
 
मुंबई, दि. २७ : विशेष प्रतिनिधी :  "दोन निवडणुका आणि प्रदीर्घ पावसाळ्यासारखी मोठी आव्हाने पार करत यंदाच्या वर्षी मार्चच्या मध्यापासून धारावीतील २५,००० हून अधिक झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, तर ६० हजारहून अधिक झोपड्यांची गणना निश्चित करण्यात आली आहे.", अशी धारावी पुनर्विकास प्रकल्प- झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील (DRP-SRA) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने, नाव ना सांगण्याच्या अटीवर दिली. धारावीतील पाच सेक्टर आणि ३४ झोनमध्ये या सर्वेक्षणासाठी दररोज ५० हून अधिक चमू तैनात केले जातात . दिवसाला,सरासरी ३०० ते ४०० झोपड्यांची गणना करण्यात येत असून २०० ते २५० घरांची पडताळणी केली जात आहे, अशी माहितीही या अधिकाऱ्यांनी दिली.
 
धारावीतील झोपड्यांचे सर्वेक्षण हे धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या केंद्रस्थानी असलेले एक महत्त्वाचे काम आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेच्या जलद आणि यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वात आव्हानात्मक आहे. या सर्वेक्षणाचा उद्देश धारावीला आधुनिक, राहण्यायोग्य समुदायात बदलणे आणि एकही रहिवासी विस्थापित होणार नाही याची खात्री करणे आहे. "राज्य सरकार धारावीच्या रहिवाशांच्या पात्रता आणि अपात्रतेबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी अजूनही मोठ्या संख्येने झोपड्यांचे सर्वेक्षण करावे लागणार आहे. धारावीतील प्रत्येक रहिवाशासाठी उत्तम जीवन जगण्याचे ते प्रवेशद्वार आहे. सर्वेक्षक चमूंना सहकार्य करूनच धारावीकर अशा पुनर्विकास प्रक्रियेत लाभार्थी ठरतील. सर्वेक्षण पूर्ण होण्यासाठी धारावीकरांनी एक पाऊल पुढे टाकणे आणि सक्रियपणे सहभाग घेणे आवश्यक आहे.” अशी माहितीही डीआरपीतील सूत्रांनी दिली आहे.