हिंदुत्वद्रोहाचा फटका

28 Nov 2024 20:52:30
devendra fadnavis assembly election game changer


मेरा पानी उतरता देख, मेरे किनारेपर घर मत बसा लेना...
मै समंदर हूँ, लौटकर वापस आऊंगा!
आठवताहेत का देवेंद्र फडणवीसांचे शब्द? ते म्हणाले होते, “मी पुन्हा येईन...” विरोधकांनी त्याची खिल्ली उडवली. पण, सर्वांना पुरून उरत ते पुन्हा आले. 2014 साली ते मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून 2024 पर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास हा प्रचंड संघर्षांचा राहिला. अनेकांनी त्यांना चक्रव्युहात अडकवण्याचा प्रयत्न केला. महाभारतातला अभिमन्यू चक्रव्यूह भेदण्यात अपयशी ठरला होता. पण, महाराष्ट्रातील या आधुनिक अभिमन्यूने चक्रव्यूह अचूक भेदला आणि भल्याभल्यांना गारद केले. उद्धव ठाकरे हे त्यातील एक. ‘फडतूस’ म्हणत देवेंद्रांचा अपमान करणार्‍या उद्धवरावांना फडणवीसांनी ‘काडतूस’ बनून उत्तर दिले. उबाठा गटाचा सुपडा साफ झाला. असंगाशी संग केला, की काय स्थिती उद्भवते, हे उद्धव यांना एव्हाना कळून चुकले असेल. म्हणूनच त्यांनी पुन्हा हिंदुत्वाकडे वळण्याची भाषा सुरू केली असावा. परवा ‘मातोश्री’वर उबाठा गटातील पराभूत उमेदवारांची बैठक झाली. त्यात बहुतांश उमेदवारांनी पराभवाचे खापर मित्रपक्षांवर फोडले. काँग्रेस आणि शरद पवारांनी जाणिवपूर्वक सहकार्य केले नाही, काही ठिकाणी आपले उमेदवार पाडण्यासाठी बंडखोरांना ताकद देण्यात आली, असा तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. भविष्यात पक्ष टिकवण्यासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडा आणि हिंदुत्वासाठी स्वतंत्रपणे लढा, अशी आग्रही मागणी उद्धवरावांसमोर करण्यात आली. लांगूलचालन करून लोकसभेत यश मिळाले खरे. पण, विधानसभेत हक्काचे (मूळ शिवसैनिक) मतदार दुरावले. त्यामुळे काँग्रेस-पवारांसोबत फार काळ राहिल्यास दुकान बंद करावे लागेल, याची जाणीव उद्धवरावांनाही झाली असेल. म्हणूनच त्यांनी याबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले. पण, या उशिरा सुचलेल्या शहाणपणाचा उद्धवरावांना खरंच काही उपयोग होईल का? तर त्याचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल. एकतर हिंदुत्वाची राजकीय ‘स्पेस’ भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी व्यापक प्रमाणात व्यापली आहे. तेथे राज ठाकरेंच्या आक्रमक हिंदुत्वाचाही निभाव लागला नाही. त्यामुळे स्वतःहून स्पर्धेबाहेर गेलेल्या उद्धव ठाकरेंना पुन्हा हिंदुत्वाकडे यायचे झाल्यास ‘स्पेस’ शिल्लक राहिलेली नाही. आता त्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी हिंदुत्वद्रोहाचा शिक्का पुसला जाणार नाही, हे निश्चिच!

मुंबई पालिकेतही दणका

25 वर्षे मुंबई महानगरपालिकेवर अधिराज्य गाजवणार्‍या ’उबाठा’ला विधानसभा निवडणुकीत दणका मिळाल्यामुळे माजी नगरसेवकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरल्याचे दिसते. त्यामुळेच हिंदुत्वाची कास धरून स्वबळावर लढण्याची मागणी ‘मातोश्री’वरील प्रत्येक बैठकीत होऊ लागली आहे. विधानसभेला 21 जागा लढवून ’उबाठा’ला केवळ दहाच जिंकता आल्या. नगरसेवकांची सहज उपलब्धता आणि शाखांमधून होणारी सामान्यांची कामे, हे शिवसेनेच्या यशाचे गमक. परंतु, शिवसेनेतील फुटीनंतर त्यात खंड पडला. शाखांमध्येच दोन गट पडले. एकनाथ शिंदे यांच्या मागे निम्म्याहून अधिक पक्ष राहिल्याने उद्धव ठाकरेंसमोर आव्हान निर्माण झाले. ठाकरे गटातील जवळपास 45 माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंसोबत जाणे पसंत केले. त्याचा फायदा विधानसभेत झाला. शिंदे समर्थक आमदारांनी मुंबईतील आपल्या जागा राखल्याच, शिवाय अंधेरी पूर्व, भांडूप आणि चेंबूरची अतिरिक्त जागा निवडून आणण्यातही त्यांना यश मिळाले. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत त्यांचा प्रभाव नाकारून चालणार नाही. विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी करणार्‍या भाजपकडे मुंबईत 82 माजी नगरसेवकांचे बळ आहे. शिवाय अन्य पक्षातील 13हून अधिक माजी नगरसेवकांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. मुंबईत 50 हजार मतदारांचा एक प्रभाग असल्यामुळे प्रभावी संघटनशक्तीशिवाय विजय जवळपास अशक्य. ही बाब हेरून उबाठा गटातील काठावरचे नगरसेवक पक्षांतराच्या तयारीत दिसतात. त्यामुळे नवी ’गळती’ रोखण्याचे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. दुसरे म्हणजे, काँग्रेससह शरद पवार गटाची मुंबईत फारशी ताकद नाही. तरीदेखील अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी ते दबावतंत्राचा अवलंब करतील, हा पूर्वानुभव. एकेका प्रभागात महाविकास आघाडीचे तीन ते चार उमेदवार भावी नगरसेवक म्हणून बाशिंग बांधून तयार आहेत. ही बाब जागावाटपाच्या दृष्टीने डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळेच बहुदा ’उबाठा’कडून स्वबळाच्या हालचाली सुरू झालेल्या असाव्यात. परंतु, सत्तेचा भक्कम आधार आणि फडणवीसांच्या चाणक्यनीतीपुढे ’उबाठा’चा निभाव लागेल, अशी शक्यता सध्यातरी नाही. त्यामुळे मुंबई पालिकेत यावेळेस भाजपचा महापौर बसेल, हे नक्की!

सुहास शेलार 
Powered By Sangraha 9.0