संतांच्या अटकेनंतर आता 'इस्कॉन' वर बंदीची मागणी!

28 Nov 2024 19:28:41

iskcon

धाका : बांगलादेशच्या युनूस सरकारने उच्च न्यायालयात इस्कॉन या हिंदू संघटनेचे 'मूलतत्त्ववादी' असे वर्णन केले आहे. इस्कॉनवर बंदी घालण्याची कारवाई आधीच सुरू असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले आहे. इस्कॉनच्या एका संताच्या अटकेनंतर युनूस सरकार ने कारवाईचा बडगा उगारला आहे. इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका एका मुस्लिम वकिलाने हायकोर्टात दाखल केली आहे.
 
इस्कॉनवर बंदी घालण्यात यावी कारण ती देशद्रोहाच्या कारवायांमध्ये गुंतलेली आहे, अशी सबब बांगलादेशी सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना बांगलादेश उच्च न्यायालयाने देशाचे ऍटर्नी जनरल मोहम्मद असदुझमान यांच्याकडून उत्तर मागितले. असदुझझमान यांनी न्यायालयाला सांगितले की, सरकार या 'कट्टरपंथी' संघटनेवर कारवाई करण्याचा विचार करत आहे. त्यावर बंदी घालण्याचे काम सुरू असल्याचे असदुझमान यांनी सांगितले. इस्कॉनचे संत चिन्मय कृष्ण दास यांना बांगलादेशच्या सुरक्षा यंत्रणांनी सोमवारी दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ रोजी अटक केली होती. त्यानंतर मंगळवारी त्यांना जामीनही नाकारण्यात आला. यावेळी न्यायाधीश काझी नजरुल इस्लाम यांनी त्यास प्रथमदर्शनीच दोषी ठरवले. चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेनंतर चितगाव न्यायालय संकुलात खळबळ उडाली होती. हिंदूंनी येथे निदर्शने करत चिन्मय कृष्ण दासच्या सुटकेची मागणी केली. बांगलादेशी पोलीस आणि कट्टरतावाद्यांनी या हिंदूंवर विटा, दगडफेक आणि लाठीचार्ज केला. यावेळी निशस्त्र आंदोलनकर्तयांवर गोळीबार सुद्धा करण्यात आला.

Powered By Sangraha 9.0