मुंबई (अक्षय मांडवकर) - 'भारतीय वन्यजीव संस्थान'ने (डब्लूआयआय) मणिपूरमध्ये 'सॅटेलाईट टॅग' लावलेल्या 'चिऊलुआन-२' नामक अमूर ससाणा पक्ष्याने महाराष्ट्रामार्गे केनियापर्यंतचे स्थलांतर पूर्ण केले आहे (amur falcon migration). स्थलांतरादरम्यान त्याने सांगलीत थांबा घेतला आणि त्यानंतर गुहागरमार्गे अरबी समुद्रात प्रवेश करुन आफ्रिकेतील सोमालिया गाठले (amur falcon migration). १४ ते २७ नोव्हेंबर अशा १३ दिवासांमध्ये या पक्ष्याने ७ हजार ३०० किलोमीटरचा प्रवास केला असून सध्या तो केनियामध्ये आहे. (amur falcon migration)
दरवर्षी अमूर ससाणा हे पक्षी उत्तर चीन ते आफ्रिका, असे दूरवरचे स्थलांतर करतात. उत्तर चीनमध्ये प्रजनन करुन हे पक्षी हिवाळ्यासाठी आफ्रिकेत जातात. यादरम्यान ते भारतातील नागालॅंड आणि मणिपूर या राज्यांमध्ये आरामासाठी थांबतात. यावेळी 'डब्लूआयआय'च्या शास्त्रज्ञांकडून या पक्ष्यांना 'सॅटलाईट टॅग' लावण्यात येतात. लांब पल्ल्याचे स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचे उड्डाण मार्ग आणि या मार्गावरील पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास करण्यासाठी २०१६ सालापासून 'डब्लूआयआय'चे शास्त्रज्ञ 'केंद्रीय पर्यावरण मंत्रालया'च्या परवानगीने ससाणा पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करत आहेत. या अभ्यासाअंतर्गत 'डब्लूआयआय'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. आर. सुरेश कुमार यांनी आठ नोव्हेंबर रोजी मणिपूरमध्ये दोन अमूर ससाणा पक्ष्यावर 'सॅटलाईट टॅग' बसवले आणि त्यांना सोडून दिले. त्यामधील नर पक्ष्याचे नाव 'चिऊलुआन-२' आणि मादीचे नाव 'गुआनग्राम' ठेवण्यात आली. स्थानिक गावांच्या नावावरुन ही नावे ठेवण्यात आली. त्यामधील 'चिऊलुआन-२' या नर अमूर ससाण्याने १४ नोव्हेंबर रोजी आपला प्रवास सुरू केला आणि २७ नोव्हेंबर रोजी तो आफ्रिकेतील केनिया प्रातांमध्ये पोहोचला.
१४ नोव्हेंबर रोजी उड्डाण केलेल्या 'चिऊलुआन-२'ने न थांबता १५ नोव्हेंबर रोजी ओडिशामधील किनारी प्रदेश गाठला. त्यानंतर त्याने तिथून उड्डाण करुन न थांबता तेलंगणमार्गे महाराष्ट्रात प्रवेश केला. महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर त्याने सांगलीमध्ये थांबा घेतला आणि दुसऱ्या दिवशी उडून गुहागरमार्गे त्याने अरबी समुद्रात प्रवेश केला. अरबी समुद्रावरुन कुठेही न थांबता त्याने सोकोट्रा हे बेट गाठले. या बेटावरुन त्याने पूर्व आफ्रिकेतील सोमालिया प्रांतामध्ये प्रवेश केला आणि २७ नोव्हेंबर रोजी तो केनियामध्ये असल्याची माहिती कुमार यांना मिळाली आहे. एप्रिल-मे महिन्यात हा पक्षी आफ्रिकेतून परतीचे स्थलांतर सुरू करेल.
मणिपूरमधून १४ नोव्हेंबर रोजी उड्डाण केल्यानंतर 'चिऊलुआन-२'ने १६ नोव्हेंबर रोजी सांगली गाठले. सांगलीतील कडेगावजवळ तो रात्रभर थांबला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच १७ नोव्हेंबर रोजी कडेगावमधून उड्डाण करुन त्याने गुहागरमधील गोपाळगडावरुन अरबी समुद्रात प्रवेश केला. सध्या तो केनियामध्ये असून त्याने आजवर ७ हजार ३०० किलोमीटरचा प्रवास केला आहे. - डाॅ. आर. सुरेश कुमार, वरिष्ठ शास्त्रज्ञ, डब्लूआयआय