मुंबई : (Ajit Pawar) महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीच्या सत्तास्थापनेबाबत भाजपचे केंद्रातील वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असेही म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांनीही संख्याबळावर भाष्य करत मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नसल्याचे सूचक विधान केले. अशातच "अजित पवारांना मुख्यमंत्री केले तर आम्ही त्यांचं स्वागतच करू", अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली होती. रोहित पवारांच्या या वक्तव्यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते २७ नोव्हेंबर रोजी माध्यमांशी बोलत असताना रोहित पवारांना “फुकटचा सल्ला नको”, असा टोला लगावला.
“बाकीच्यांनी फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही. आम्ही, आमचा पक्ष, आमचे कार्यकर्ते, सर्व आमदार, सर्व पक्षाचे अध्यक्ष खंबीर आहेत. ज्याने त्याने आपआपलं पाहावं”, अशी बोचरी टीका अजित पवारांनी केली.
रोहित पवार नेमकं काय म्हणाले होते?
“मुख्यमंत्रीपद अजित पवारांना दिलं तर चांगली गोष्ट आहे. आम्हीही त्या गोष्टीचं स्वागतच करू. अभिनंदन करू. पण भाजपला तुम्ही चांगल्या पद्धतीने ओळखत असाल तर भाजप अजित पवारांना सहजपणे मुख्यमंत्री बनवणार नाही”, असं रोहित पवार म्हणाले होते.