भारतीय दुग्धव्यवसायाने गेल्या दशकांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 2022-23 सालच्या आर्थिक वर्षात भारतात 230.58 दशलक्ष टन दुधाचे उत्पादन नोंदवण्यात आले. मागील पाच वर्षांत दूध उत्पादनात तब्बल 22.81 टक्के वाढ झाली असून, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात ही राज्ये दुग्धोत्पादनात अग्रेसर आहेत. भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश असून, जागतिक पातळीवरील दूध उत्पादनात भारताचा वाटा 24 टक्के इतका आहे. मुंबईत डिसेंबर महिन्यात आयोजित ‘इंटर डेअरी एक्स्पो’च्या निमित्ताने दुग्धोत्पादन क्षेत्रातील भारताच्या या श्वेतभरारीचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख...
इंटर डेअरी एक्स्पो
दूध उत्पादनाच्या प्रगतीचा हा आलेख असा सुरु राहावा, यासाठी ‘व्हीए एक्झिबिशन्स’ आणि ‘इंडिया डेअरी असोसिएशन’ पश्चिम विभाग यांनी दि. 5 ते दि. 7 डिसेंबर 2024 या कालावधीत मुंबईतील ‘बॉम्बे एक्झिबिशन सेंटर’ येथे ‘इंटर डेअरी एक्स्पो 2024’ या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. दुग्ध व्यवसायातील नवकल्पना, तंत्रज्ञान आणि संधी जाणून घेण्यासाठी हे प्रदर्शन उपयोगी ठरु शकते. टिकाऊ तंत्रज्ञान, आधुनिक पॅकेजिंग, प्रक्रियेतील नवीन उपाय आणि प्रगत ऑटोमेशन अशा अनेक गोष्टी या प्रदर्शनात पाहण्यास उपलब्ध असतील. या प्रदर्शनात 120 हून अधिक भारतीय आणि जागतिक कंपन्या सहभागी होणार आहेत.
चीनच्या तुलनेत भारतात दुग्ध उत्पादने तीनपट जास्त होतात. भारतीय दुग्धक्षेत्र बाजारपेठेची उलाढाल सध्या अंदाजे 125 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी असून, यात वार्षिक नऊ टक्के वाढ होऊन 2030 सालापर्यंत ही बाजारपेठ 230 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. दुग्धोत्पादनापासून ते दुग्ध प्रकिया व पॅकेजिंगमध्ये स्वीकारण्यात आलेले तंत्रज्ञान, त्याचप्रमाणे भारत सरकारने भारतीय दुग्धव्यवसायाला दिलेले सक्रिय पाठबळ यामुळे हे शक्य झाले आहे. काही वर्षांपूर्वी दुधाला व्यवसाय म्हणून स्थान नव्हते. तो घरगुती उद्योग होता. शहरांपलीकडे राहणारे लोक गाई, म्हशी पाळत, त्यांचे दूध काढत त्यांची स्वतःची गरज भागून जे दूध शिल्लक राहत असे, ते गावात त्यांना हवे आहे त्यांना विकत. आता दुग्धोत्पादन क्षेत्राने 80 दशलक्ष कुटुंबांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून दिले आहे. यात प्रामुख्याने भूमिहीन आणि अल्पभूधारक शेतकर्यांचा समावेश आहे. दुग्धोत्पादन क्षेत्र हे विशेषतः महिलांना रोजगार उपलब्ध करून देणारे क्षेत्र आहे आणि देशभरातील महिला सबलीकरणामध्ये या उद्योगाची महत्त्वाची भूमिका आहे.
दूध व दुग्धजन्य उत्पादने, दुग्धोत्पादन व कृषी साहित्य, पशुवैद्यकीय उपाय, प्रक्रिया व पॅकेजिंगची साधने, ऑटोमेशन व डेटा प्रक्रिया घटक आणि अॅडिटिव्हज, कोल्ड चेन व्यवस्थापन, वितरण व लॉजिस्टिक, आर्थिक साहाय्य संस्थांनी दिलेले पर्याय, हाय प्रीसिजन लेबलिंग मशीन, डेअरी तपासणी उपकरणे, टिकाऊपणा, कार्यक्षमता, आकर्षक पॅकेजिंग, दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता टिकवण्यासाठी नवकल्पना या सर्व बाबींची माहिती प्रदर्शनात मिळू शकते. या प्रदर्शनात ‘बी टू बी एक्स्पो’सोबतच ‘इंडियन डेअरी असोसिएशन’तर्फे ‘भारतातील दुग्धोत्पादन क्षेत्रासाठी जागतिक पातळीवर असलेल्या संधी’ या विषयावर दोन दिवसांचे चर्चासत्रही आयोजित करण्यात आले आहे. दि. 5 डिसेंबर रोजी ‘इंटर डेअरी अवॉडर्स 2024’ या पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार आहे. 1970 साली भारतात दररोज सुमारे सहा कोटी लीटर दूध उत्पादित होत असे व त्यावेळी भारत हा दुधाची कमतरता असलेला देश होता, तर 2022 साली हे उत्पादन 58 कोटी लीटरपर्यंत पोहोचले. उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वाधिक दूध उत्पादक राज्य आहे. भारतातील एकूण उत्पादनात उत्तर प्रदेशचा हिस्सा 18 टक्के आहे. गुजरातनेही दूध व दुग्धजन्य उत्पादनात आघाडी घेतली. गुजरातने हा उद्योग सहकार तत्त्वावर राबविला. ‘अमूल’ची उत्पादने गुजरातमध्ये उत्पादित होतात. ‘अमूल’ हा एक फार मोठा लोकप्रिय ब्रॅण्ड आहे. महाराष्ट्रात तर जसे राजकारणी साखरसम्राट झाले, तसे दूधसम्राटही झाले.
पुणे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर या राज्यांत महाराष्ट्रात दूध प्रकल्प उभे राहिले. युएई, सौदी अरेबिया, अमेरिका, सिंगापूर, भूतान व अन्य काही देशांना भारतातून दूध निर्यात केले जाते. दुधाचा सर्वात मोठा निर्यातदार देश म्हणजे न्यूझीलंड. उत्तर प्रदेशात म्हशींची संख्या देशात सर्वाधिक आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या म्हशींच्या तुलनेत उत्तर प्रदेशातील म्हशी जास्त जाडजूड असतात व त्यांची लांबीही जास्त असते. इतर गुरांच्या संख्येत उत्तर प्रदेश दुसर्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशातील बहुसंख्य ग्रामीण लोक पशुधन आणि दुग्धव्यवसायात कार्यरत आहेत. भारतात 765 डेअरी कंपन्या आहेत, तर जगात 45 हजार डेअरी कंपन्या आहेत. ‘गुजरात सहकारी मिल्क मार्केटिंग फेडरेशन-अमूल’ हा भारतातील सर्वोत्कृष्ट दुधाचा व आईस्क्रीमचा ब्रॅण्ड आहे. या फेडरेशनने स्थानिक शेतकर्यांच्या मदतीने सहकारी उद्योग उभारण्याचे सर्वोत्तम मॉडेल जगाला दाखविले आहे. गुजरातचे हे उदाहरण बर्याच राज्यांनी अमलात आणण्याचा प्रयत्न केला. न्यूझीलंडच्या गवताळ गायी जगातील सर्वोत्तम दर्जाचे दूध तयार करतात. दुधाळ गायींच्या गुणवत्तेचा थेट संबंध त्यांच्या आहार आणि वातावरणाशी असतो.
भारतातील शेतकर्यांकडून, दूध उत्पादकांकडून दुधाचे सर्वात जास्त वार्षिक उत्पादन 230 दशलक्ष टन घेतले जाते. त्या खालोखाल भात 129 दशलक्ष टन, गहू 110 दशलक्ष टन, मका 35.91 दशलक्ष टन, साखर 34 दशलक्ष टन इत्यादी उत्पादने आहेत. जगातील एकूण दूध उत्पादनापैकी 24 टक्के उत्पादन करणारा भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. 2014 सालापासून युरोपीय महासंघ आणि अमेरिकेला मागे सारुन भारत दुग्धोत्पादनात प्रथम क्रमांकाचा देश बनला. दुग्ध व्यवसायाचा एकूणच भारतीय अर्थकारणाला हातभार लागला आहे. सहकारी तत्त्वावर गावोगावी सुरु झालेल्या या व्यवसायाला आता मोठ्या उद्योगाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. वार्षिक 15.04 दशलक्ष टन उत्पादनासह महाराष्ट्र दुग्धोत्पादनात भारतात पाचव्या क्रमांकावर आहे.
दूध उद्योगासोबत पशुखाद्य, सप्लिमेंट्स, चारा, औषधे, दूध उद्योगाला लागणारी यंत्रणा अशा अनेक उद्योगांना चालना मिळाली. परंतु, दूध उत्पादन वाढीला शासनाकडून आधारभूत विक्री किंमत न मिळाल्यामुळे आणि हे नाशिवंत उत्पादन असल्याने मिळेल त्या किमतीला विकणे, याशिवाय उत्पादकांकडे पर्याय नाही. कोरोना काळात दूध उत्पादनाला सर्वाधिक फटका बसला. यावेळी गायीच्या दुधाचा खरेदी दर 17 ते 18 रुपये प्रति लीटर इतका कमी झाला. त्यानंतर लंपी रोग आणि अन्य विषाणूजन्य आजारांमुळे दुग्धव्यवसायाला आर्थिक फटका बसला. जगातील मोठ्या प्रमाणावर दूध उत्पादित करणारे देश त्यांच्या दुग्धजन्य उत्पादनांना भारतीय बाजारपेठ कधी उपलब्ध होणार, याची वाट पाहत आहेत. अशावेळी भारतातील दुग्ध व्यवसाय टिकविण्यासाठी आधारभूत किंमत मिळणार का? आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा सामना करण्यासाठी भारतीय दूध उत्पादक दुधाचा उत्पादन दर्जा सुधारणा का? हे प्रमुख प्रश्न आहेत.
भारतात दुधाच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठ वर्षांत दुधाच्या उत्पादनात 83 मेट्रिक टन वाढ झाली आहे, तर जागतिक दूध उत्पादनात भारताचा 23 टक्के वाटा आहे. या वाढत्या उत्पादनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले आहे. “दुग्ध व्यवसाय हा आपल्या देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या आणखी बळकट करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. आगामी काळात डेअरी क्षेत्र आणखी पुढे जाईल,” असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ‘नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड’ने दिलेल्या माहितीनुसार, दूध उत्पादनात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर, राजस्थान दुसर्या क्रमांकावर, मध्य प्रदेश तिसर्या क्रमांकावर, गुजरात चौथ्या क्रमांकावर, आंध्र प्रदेश पाचव्या क्रमांकावर तर पंजाब सहाव्या क्रमांकावर आहे. अमेरिकेचा दुग्धोत्पादनात 11 टक्के वाटा आहे, तर पाकिस्तानचा वाटा सात टक्के आहे. श्वेतक्रांतीनंतर भारतात दूध उत्पादनात प्रचंड वाढ होत गेली. सहकारी संस्थांच्या जाळ्यामुळे शेतकर्यांना लाभ मिळाला.
पण, सहकारी चळवळीत अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात ‘सहकारी दूध संस्था’ नफ्यात येऊ शकत नाही. शेतीशी निगडित असलेला दुग्धव्यवसाय हा परंपरागत पद्धतीने भारतात सुरू आहे. डॉ. वर्गीस कुरीयन यांनी 1970 साली ‘ऑपरेशन फ्लड’ ही योजना राबवून ‘अमुल’च्या माध्यमातून दूध उत्पादनात श्वेतक्रांती घडवून आणली. त्यानंतर सर्वच राज्यांमध्ये ‘सहकारी दूध संघ’ जोमाने काम करू लागले. देशात विक्रमी दूध उत्पादन होत असले, तरी महाराष्ट्र राज्य मात्र सहा राज्यांत मोडत नाही. एकेकाळी दूध उत्पादनात अग्रेसर असलेला महाराष्ट्र कालांतराने मागे पडला. 2023-24 या आर्थिक वर्षात भारताची दुग्धजन्य पदार्थांची निर्यात 272.64 दक्षलक्ष अमेरिकी डॉलर्स इतकी होती. जगात दूध उत्पादन दोन टक्क्यांनी वाढत आहे, तर भारतात सहा टक्के दराने त्यामध्ये वाढत होत आहे. दुग्धव्यवसायाने देशात आठ कोटींहून अधिक शेतकर्यांना थेट रोजगार उपलब्ध झाला आहे. भारतात 300 दक्षलक्षपेक्षा जास्त गोवंशासह जगातील सर्वात मोठा डेअरी कळप आहे. दुधाचे उत्पादन व वापर या दोन्हींत भारत अग्रेसर आहे. भारतात बहुतेक दुधाचा वापर देशातच केला जातो. त्यामुळे साहजिकच भारतातील डेअरी उद्योगाचा आर्थिक परिणाम मोठा आहे. बहुतेक दूध म्हशीपासून येते. गायीचे दूध दुसर्या क्रमांकावर, तर शेळीचे तिसर्या क्रमांकावर आहे.
एकूणच भारतीय दुग्ध बाजारपेठ ही जगातील सर्वात मोठी आणि वेगाने वाढणारी बाजारपेठ मानली जाते. उत्तर प्रदेशात एकूण दूध उत्पादनाच्या 15.72 टक्के दूध उत्पादित होते, तर राजस्थान 14.44 टक्के, मध्य प्रदेश 8.73 टक्के, गुजरात 7.49 टक्के व आंध्र प्रदेश 6.70 टक्के. द्रव दुधासारखी किंवा द्रव दुधाला पर्याय म्हणून दुधाची पावडरही मिळते व या पावडरीचा खपही अलीकडे वाढत चालला आहे. द्रव दूध तापवावे लागते व परत थंड करावे लागते ते नासू नये म्हणून काळजी घ्यावी लागते. दुधाची पावडर वापरणे सोपे आहे. एका चहा किंवा कॉफीच्या कपाला पुरणारे ‘सॅचे’ मिळतात. ते गरम पाण्यात मिसळले की चहा/कॉफी तयार. जास्त वजनाचे खोके/डबेही मिळतात. एक मात्र नक्की की, दूध उत्पादनात आपण स्वावलंबी आहोत. हा व्यवसाय वाढायला अजून बर्याच संधी उपलब्ध आहेत. यात मागे पडलेल्या महाराष्ट्राला मात्र यात मोठी झेप घेणे आवश्यक आहे.
शशांक गुळगुळे