नाशिक : राज्यभरात सध्या मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती दिली आहे. गुरुवार, २८ नोव्हेंबर रोजी त्यांनी नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधला.
छगन भुजबळ म्हणाले की, "तीन पक्ष एकत्र असताना सगळ्यांशी चर्चा करून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे वेळ लागतो. काही वेळा महिना महिनासुद्धा वेळ लागला आहे. त्यामानाने ही वेळ काहीच नाही. दोन-चार दिवसात शपथविधीचा कार्यक्रम निश्चितपणे उरकला जाईल. भाजपचे १३२ आमदार निवडून आलेत. त्यामुळे साहाजिकच त्यांचे मंत्री जास्त असतील. १३२ आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणे ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. त्यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - घाटकोपरमध्ये लव्ह जिहाद! ब्लॅकमेल करणाऱ्या नौशाद जामदारवर गुन्हा दाखल
ते पुढे म्हणाले की, "शिंदे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री होतील असे वाटत होते. परंतू, फडणवीसांनी सांगितले की, मी बाहेर राहून काम करेन. मात्र, त्यांना दिल्लीवरून उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचा आदेश आला. फडणवीस साहेबांनी पक्षाचा आदेश म्हणून एकप्रकारे अवहेलना सहन केली आणि १०० टक्के कामाला झोकून दिले. महायूतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यासाठी काम केले. सर्व मागासवर्गीय आणि ओबीसींच्या अधिकारावर दगा येऊ नये यासाठी फडणवीस साहेबांनी सहकार्य केले. त्यामुळे काही लोक त्यांना प्रचंड टार्गेट करत आहेत. ओबीसींच्या हक्कावर गदा येऊ नये यासाठी त्यानी काम केले," असेही ते म्हणाले.
जरांगे माझ्या मतदारसंघात फिरले!
विरोधकांनी ईव्हीएम मशीनवर घेतलेल्या आक्षेपाबाबत बोलताना ते म्हणाले की, "२०१९ च्या निवडणूकीत मला ५६ हजार मतांची लीड होती. त्यामुळे माझे मतदान १ लाखांपर्यंत जाईल, अशी मला कल्पना होती. परंतू, माझे मताधिक्य कमी झाले. जरांगे माझ्या मतदारसंघात रात्री २ वाजेपर्यंत फिरत राहिले. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी मला एका मोठ्या वर्गाची मदत मिळाली नाही. लोकसभेला ईव्हीएम मशीन बरोबर होती आता चुकीची आहे, असे ते म्हणातात. ईव्हीएम ही निर्जीव मशीन असल्याने त्यावर खापर फोडणे सोपे आहे," असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.