पुन्हा उठणार! कशासाठी?

27 Nov 2024 21:48:17
uddhav thackeray after election result
 

देवेंद्र फडणवीस ‘मी पुन्हा येईन’ म्हणाले, तर यांनीच त्यानंतर त्यावर प्रचंड निंदा-टवाळी केली होती. पण, आता विधानसभा निवडणुकीत केवळ 20 जागा जिंकल्यावर ते म्हणतात, ‘पुन्हा उठेन, पुन्हा लढेन.’ थोडं शांत घ्या साहेब. पुन्हा तुम्हाला उठायचे कशाला, तर लढायला. पण, महाराष्ट्राला आता ‘फेसबुक’वरची आणि लुटपुटीच्या मुलाखतीमधली टोमण्यांची लढाई नको, तर महायुतीचा विकासच हवा आहे. त्यामुळे ‘पुन्हा उठेन’ वगैरे नको साहेब! साहेब, तुम्ही म्हणालात, महाराष्ट्र माझ्यासोबत ‘असा’ वागेल असे तुम्हाला वाटले नव्हते. ‘असा’ म्हणजे कसा हो साहेब? अनेक दशके तुम्ही ‘कमळ’वाल्यांसोबत होतात. तेव्हा तुम्ही ‘मोठा भाऊ, मोठा भाऊ’ म्हणत कायम वरिष्ठाची भूमिका घेतली. भाजप सोबत असताना तुमच्या पक्षाला कायमच यश मिळाले. क्वचित पराभव चाखावा लागला. पण, तो पराभव आता इतका दारुण म्हणण्याइतका भीषण नव्हता. पण, 2019 साली तो ‘चमत्कार’ तुम्ही केलात. (विनाशकाले विपरित बुद्धी, असे त्या चमत्काराबद्दल लोक म्हणत असतात.) तर तुम्ही तुमच्या लाडक्या काकांसोबत गेलात. असंगाशी संग, प्राणाशी गाठ किंवा ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला, या म्हणी लोकांना प्रत्यक्षात दिसल्या. आम्ही करू ती पूर्व दिशा, अशा नादात त्या महाविकासाच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात महाराष्ट्राची दशा दशा झाली. खरे तर, ‘आई बसली’ म्हणणारी हिंदू धर्म समाजद्वेष्टी महिला तुमच्या कंपूत आली, तेव्हाच तुमचे प्राक्तन ठरले होते. ‘बेस्ट सीएम’ म्हणत दररोज सकाळी भयंकर बोलणारे राऊत तुमचे दिशादर्शक झाले, तेव्हाच तुमचे प्राक्तन ठरले होते. आता तुम्ही उठलात तरी भगव्या ध्वजाला ‘फडकं’ म्हणणे, जानवे-शेंडीचे हिंदुत्व म्हणणे, मराठी-मुसलमान, मराठी-मुसलमान म्हणून लांगूलचालन करणे हे सगळ बदलणार आहे का? महाराष्ट्राचा मराठी माणूस तुमच्यासोबत स्वाभिमानासाठी उभा होता. पण, त्याला काय मिळाले? मुख्य म्हणजे, तुमचा वैयक्तिक सत्तासंघर्ष हा महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष नाही, हे सत्य सगळ्या महाराष्ट्राने ओळखले; ते सत्य तुम्ही मान्य कधी करणार? तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, हे देवेंद्र फडणवीसांचे वाक्य जीवनाचे अटळ सत्य म्हणून समजून घ्या. मग कळेल की, तुम्ही उठला नाहीत, लढला नाहीत, तरीसुद्धा महाराष्ट्र जिंदाबाद होता, जिंदाबाद आहे आणि राहणार आहे साहेब!

रा. स्व. संघ तिथेच आहे!


निवडणुकीदरम्यान विदर्भामध्ये एक निवडणूक प्रचाराचे गीत ऐकले होते. ते गीत होते, ‘आला आला आला आला पंजा आला!’ लावणीच्या ग्रामीण बाजाच्या ठेक्यातले गाणे गल्लीबोळातून चौकातून दिवसभर फिरत्या गाडीतून सगळ्या गावाला ऐकवले जात होते. ‘आला आला आला पंजा?’ कशाला? हा प्रश्न तेव्हा मी लोकांना विचारला होता, तर एकजण हसत म्हणाली होती, “काय की बाई गळा दाबायला येतू की काय हाव ना बाय.” तर खेड्यातल्या त्या आयाबायांचा तो विनोद ऐकून त्यावेळी हसायला आले होते. पण, नंतर निवडणुकीचा निकाल पाहता वाटले की, लोकांना ‘आला आला आला पंजा आला’ म्हटल्यावर असेच तर वाटले नाही ना? लोकसभा निवडणुकीमध्ये या ‘पंजा’ने करामती दाखवल्या होत्या. संविधानाबद्दल लोकांमध्ये भ्रम निर्माण केले होते. आरक्षणाबद्दल भीती घालून दिली होती. भोळ्या, गरीब समाजाला खोटेच सांगितले होते की, ‘भाजप 400 पार झाली, तर पुन्हा मनुस्मृतीचे राज्य येईल,’ तुम्हाला पुन्हा अस्पृश्यता भोगावी लागेल. (खरे तर या लोकांना मनुस्मृतीमध्ये काय लिहिले हे माहीत असण्याची सुतराम शक्यता नाही!) याच ‘पंजा’ने खटाखट खटाखट 8 हजार, 500 रुपयेही मोजले होते. त्यामुळे पुन्हा ‘पंजा’ला उभारी आली. मग ’पंजा’ आणि समर्थकांना वाटले की, जनतेला दिलेला संविधानविषयक भ्रमाचा डोस उतरणार नाही. ते महायुती सरकारला आव्हान देत राहिले, तत्काळ विधानसभा निवडणूक घ्या. संजय राऊत तर सातत्याने म्हणत होते की, कधीही निवडणूक घेतली तरी महाविकास आघाडीच जिंकणार. पण, सत्य किती काळ लपणार? त्यातही महाराष्ट्राची जनता राजहंस आहे.नीरक्षीरविवेकबुद्धी जनतेत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस यश मिळाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘ऑल इंडिया उलेमा बोर्डा’च्या त्या सतरा मागण्या मात्र विसरता येत नाहीत. ‘मौलांना 15 हजार रु. द्या’पासून ‘2012 ते 2024 मध्ये महाराष्ट्राच्या दंगलीत आरोपी असलेल्या मुसलमानांना सोडा’पासून ‘रा. स्व. संघावर बंदी आणा’पर्यंत! रा. स्व. संघावर बंदी आणण्याचे समर्थन महाराष्ट्र ‘पंजा’चे अध्यक्ष पटोले यांनी केले होते. आज ‘पंजा’, ‘मशाल’, ‘तुतारी’ शोधावी लागते. मात्र, संघ आहे तिथे आहे. तोही ठामपणे. ‘चरैवेति चरैवेति’ म्हणत ‘आओ जलाए दीप वहा जहा अभी अंधेरा हैं’च्या भूमिकेत!

9594969638
Powered By Sangraha 9.0