महिषासुरमर्दिनि स्तोत्रातील तिसर्या श्लोकात आचार्यांनी देवीमाहात्म्य कथन करताना, निसर्गाशी समरस असलेल्या जगदंबेचे साद्यंत वर्णन केले आहे. यामध्ये देवीचा निवास, देवीला आवडणारे पुष्प, देवीचा केशसंभार यांचे यथार्थ चित्रण, तर चौथ्या श्लोकात महिषासुरमर्दिनीच्या रणचंडी रुपाचे वर्णन करत, महिषासूरवधाचा प्रसंग शब्दबद्ध केला आहे. अशा या जगदंबेच्या शौर्यपराक्रमाची गाथा कथन करणार्या श्लोकांचा उलगडलेला हा भावार्थ...
श्लोक क्रमांक 3
अयि जगदम्ब मदम्बकदम्ब वनप्रियवासिनि हासरते
शिखरि शिरोमणि तुङ्गहिमालय शृङ्गनिजालय मध्यगते।
मधुमधुरे मधुकैटभगञ्जिनि कैटभभञ्जिनि रासरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते॥3॥
पदच्छेद
अयि = हे, जगदम्ब = जगतजननी, मदंब = कदम्बवन = कदंबवृक्षांचे वन, प्रियवासिनि = जिथे तिला निवास करणे अत्यंत आवडते, हासरते = जिला हास्यविनोदाची आवड आहे. शिखरि = पर्वताचे शिखर, शिरोमणि = सर्वात उंच, तुङ्ग = उन्नत, हिमालय = हिमालय पर्वत,शृङ्ग = सर्वोच्च, निज = स्वतःचे, आलय = घर, मध्यगते = मधोमध. मधुमधुरे = मधाच्या पेक्षा अधिक मधुर, मधु = एक दैत्य, कैटभ = एक दैत्य, गञ्जिनि = जिंकणारी, मारणारी, कैटभभञ्जिनि = कैटभाचा नाश करणारी, रासरते = युद्धाच्या कोलाहलात रममाण होणारी. जय जय हे = तुझा विजय असो, महिषासुरमर्दिनि = महिषासुर नामक दैत्याचा संहार करणारी, रम्य = सुंदर, कपर्दिनि = जटाधारी, शैलसुते = हिमालयाची कन्या.
शब्दार्थ
जगदंबा अर्थात जगद्जननी, जिला कदंब वनांच्या वृक्षात निवास करणे आवडते. कदंबवृक्ष आणि त्याची फुले जिला अत्यंत प्रिय आहेत, कदंबाच्या वनात विहार करण्याने ती प्रसन्न होते, जी हिमालय पर्वतरांगातील सर्वोत्तुंग शिखरावर निवास करते. अर्थात, जी कैलासावर निवास करते, (कैलास पर्वत हा हिमालय पर्वत रांगांच्या मधोमध स्थित आहे), जी मधाहून मधुर भाष्य करते, जिने मधु आणि कैटभ या दैत्यांचा पराभव केला आहे, कैटभारी या दैत्याचा वध केला आहे. जिला युद्धभूमी आणि तेथील कोलाहल रम्य भासतो, अशा हे महिषासुराचे निर्दालन करणार्या आणि रम्य केशसंभार असणार्या देवी, तुझा सतत विजय असो.
भावार्थ
हे महिषासुरमर्दिनी देवी, तुला कदंबाच्या वनामध्ये विहार करणे अत्यंत आवडते. कदंबवृक्ष हा मुख्यत्वे हिमालयाच्या पायथ्याशी आढळतो. अत्यंत वेगाने वाढणारा, पुष्ट परंतु उंच खोड असणारा हा वृक्ष एखाद्या सैनिकाप्रमाणे भासतो. या वृक्षाच्या फुलांचा सुगंध अत्यंत मोहक, मादक आणि चित्ताला आकृष्ट करून घेणारा असतो. या वृक्षाचा जो चिक पाझरतो, त्याला ‘कदंब मधु’ किंवा ‘नीरा’ म्हणतात. या वृक्षापासून अत्तर बनवले जाते आणि कादंबरी नावाची वारुणीसुद्धा तयार करतात. या वृक्षाच्या मादक गंधामुळे हा वृक्ष कामदेवाचे प्रतीक मानला जातो. या सुगंधामुळेच या वृक्षांचे वन, हे गंधर्वांचेही निवासस्थान असते. याचा उल्लेख कालिदासाच्या ‘कुमारसंभवम्’मध्ये सुद्धा दिसून येतो. रात्री या वनातून गंधर्वांनी वाजवलेली बासरी ऐकू येते, असे मानतात. श्रीकृष्णालाही कदंब वृक्ष अत्यंत प्रिय होता. श्रीकृष्णसुद्धा नदीच्या किनारी असलेल्या कदंब वृक्षाला टेकून बासरीवादन करत असे.
देवी महिषासुरमर्दिनी ही हिमकन्या असल्याने तिच्या बाल आणि पौगंड वयात तिने या कदंबांच्या वनात क्रीडा केल्या आहेत, त्यामुळे तिला कदंबवन प्रिय आहे. देवी-देवतांना सुगंध प्रिय असतो. पर्वत प्रदेशातील फुलांचा, औषधी वनस्पतींचा, कदंब वृक्षांचा गंध त्यांना अत्यंत आवडतो. म्हणूनच महिषासुरमर्दिनी देवीला या सुगंधी वृक्षाचे, उंच पर्वतांचे सान्निध्य म्हणून तिला ‘शिखरशिरोमणी’ म्हणतात. शिखर म्हणजे पर्वत आणि त्यातील शिरोमणी पर्वत हिमालय आहे. त्याच्या उंचावरील भागात निवास करणे देवीला अत्यंत आवडते. या पर्वतांवर वाहणारी हवा ही सुगंधाने युक्त आणि शीतल असते. चित्तवृत्तीला उल्हसित करणारे हे निवासस्थान देवीला प्रिय आहे. हा हास-उल्हास करण्यात ती मग्न असते. म्हणून तिचा उल्लेख ‘हासरते’ असा केला आहे.
सर्व ईश्वरी शक्तींचा चेतना अंश धारण करून देवी ज्यावेळी पूर्ण रुपात प्रकट झाली, त्यावेळी तिने सर्व देवांची आभूषणे आणि अस्त्रे धारण केली आणि प्रचंड अट्टहास केला. तो अट्टहास ध्वनी ऐकून महिषासुराने आपल्या दूतांना ध्वनीचा शोध करण्यास पाठवले. दूतांनी पाहिले की, एक देवी जिचे अष्टादश भुजा स्वरूप आहे, तिने आपल्या हाती विविध शस्त्रे धारण केलेली आहेत. तिच्या देहावर अत्यंत मौल्यवान आभूषणे आहेत आणि ती अत्यंत दिव्य आणि सुंदर दिसत आहे. दूतांकडे देवीची दृष्टी जाताच तिने परत एकदा प्रचंड अट्टहास केला. तिच्या या अत्यंत रौद्र, परंतु तितक्याच मनोहर रुपाला पाहून दूत भयभीत होऊन महिषासुराकडे गेले व त्यांनी त्याला सर्व घटनाक्रम सांगितला. या स्वरुपाचे वर्णन ऐकल्यावर दैत्यराज महिषासुर कामातुर झाला आणि तिचे मन वळवण्याच्यासाठी त्याने भिन्न भिन्न दूत पाठवले.
अट्टहास करून देवीने त्या दूतांना पळवून लावले आणि प्रत्येक दूताच्या मार्फत तिने महिषासुराला युद्धाचे आव्हान दिले. या अर्थाने देवीचा उल्लेख ‘हासरते’ असा केला जातो. देवीचा उल्लेख मधु आणि कैटभाचा नाश करणारी आणि स्वतः अत्यंत मधुर असणारी असा केला आहे. यापुढील देवीचा उल्लेख ‘रासरते’ असा आहे. ‘रास’ हा शब्द आपल्याला श्रीकृष्णाची रासलीला या स्वरुपात माहीत आहे. परंतु, ‘रास’ या शब्दाचा अजून एक अर्थ आहे-कोलाहल, आरडाओरडा, उंच स्वर, गोंधळ. युद्धभूमीवर देवी राक्षसांशी युद्ध करते, तेव्हा तिथे प्रचंड कोलाहल असतो. देवी या कोलाहलाने विचलित होत नाही, तर ती निर्धारपूर्वक आपले कार्य पार पाडते आणि सर्व राक्षसांचा संहार करते. या अर्थाने देवीचे नाम ‘रासरते’ आहे, म्हणजे जिला कोलाहल प्रिय आहे.
‘रम्यकपर्दिनि’ अर्थात तिच्या मस्तकी असलेला केशसंभार हा जटास्वरुप आहे. जटारुप शिवाचेसुद्धा आहे. त्या अर्थाने या पतीपत्नींचे ऐक्य दाखवले आहे. हा केशसंभार अत्यंत रमणीय आहे. उन्मत्त अशा महिषासुराचे जिने निर्दालन केले आणि आपल्या या सर्व विशेषणांना सार्थ केले, अशा जगदंबे, तुझा सतत जय असो.
श्लोक क्रमांक 4
अयि शतखण्डविखण्डितरुण्डवितुण्डितशुण्ड गजाधिपते
रिपुगजगण्डविदारणचण्डपराक्रमशौण्ड मृगाधिपते
निजभुजदण्डनिपातितचण्डविपाटितमुण्ड भटाधिपते।
जय जय हे महिषासुरमर्दिनी
रम्यकपर्दिनि शैलसुते॥4॥
पदच्छेद :
अयि = हे, शतखण्ड = शंभर तुकडे, विखण्डित = ज्याचे केले आहेत, रुण्ड = मस्तक, वितुण्डित= कापलेली, शुण्ड = सोंड, गजाधिपते = भव्य हत्ती रिपु = शत्रू, गज = हत्ती, गण्ड = गंडस्थळ अर्थात मुख आणि कपाळावरील भाग, विदारण = कापून टाकणे, चण्ड = क्रौर्यपूर्ण कौशल्याने, पराक्रम = शौर्य, शौण्ड = निपुण, कुशल, मृगाधिपते = सिंहाची स्वामिनी. निज = स्वतःच्या, भुज = हातात, दण्ड = त्रिशूळ, निपातित = मारून फेकून दिले, चण्ड = एक राक्षस, विपाटित = तुकडे तुकडे केले, मुण्ड = एक राक्षस, भटाधिपते = रणातील सर्वोत्कृष्ट योद्ध्यांवर विजय मिळवणारी. जय जय हे = तुझा विजय असो, महिषासुरमर्दिनि = महिषासुर नामक दैत्याचा संहार करणारी, रम्य = सुंदर, कपर्दिनि = जटाधारी, शैलसुते = हिमालयाची कन्या.
शब्दार्थ
देवी घनघोर पराक्रम दाखवत शत्रू सैन्यातील श्रेष्ठ हत्तींच्या सोंडी कापून, त्यांच्या देहाचे शत तुकडे करते. देवीचे वाहन असणारा सिंह, अत्यंत पराक्रमी आणि युद्धनिपुण आहे. तो शत्रूसैन्यातील गजराजांवर हल्ला चढवून त्यांचे गंडस्थळ, मुख आणि कान आपल्या पंजाने बोचकारून आणि त्यांचे लचके तोडून, अत्यंत क्रौर्याचे प्रदर्शन करत त्यांचा नाश करतो. देवी आपल्या हातातील त्रिशुळाने वार करून युद्धभूमीवरील उत्कृष्ट योद्धे असणार्या चंडाच्या मस्तकाचे छेदन करते, मुंड या राक्षसावर वार करून ती त्याच्या देहाचे शत तुकडे करते. हे महिषासुराचे निर्दालन करणार्या आणि रम्य केशसंभार असणार्या देवी, तुझा सतत विजय असो.
भावार्थ
या श्लोकात महिषासुरमर्दिनीच्या रणचंडी रुपाचे वर्णन केलेले आहे. महिषासुराच्या सैन्यात उत्तम दर्जाचे हत्ती होते, ज्यांचा उल्लेख ‘गजाधिपती’ असा केला आहे. देवी या गजाधिपतींच्या देहापासून त्यांच्या सोंडी कापून काढते आणि नंतर त्यांच्या देहाचेसुद्धा शेकडो तुकडे करते.
देवीचे वाहन असणारा सिंह हासुद्धा अत्यंत पराक्रमी आणि कुशल योद्धा आहे. तो देवीचे केवळ वाहन नसून युद्धमग्न देवीला लढणे सोपे जाईल, असा साहाय्यक आहे. सिंह शत्रूसैन्यातील हत्तींवर उड्डाण करून झेप घेतो. ज्यावेळी देवी हत्तीवर आरूढ असणार्या राक्षसांशी युद्ध करते, त्यावेळी सिंह त्या हत्तींवर आपल्या पंजाने हल्ला करून त्याच्या डोळ्यांना, सोंडेला बोचकारतो, आपल्या मुखाने त्यांच्या गंडस्थळाचे लचके तोडतो. देवीचा सिंहसुद्धा आपल्या पराक्रमाने या गजराजांचा अंत करून देवीला साहाय्यभूत होतो. देवी अत्यंत रौद्र रुप धारण करते आणि राक्षसांच्या अत्यंत श्रेष्ठ योध्यांशी घनघोर युद्ध करते. चंडाशी युद्ध करताना देवी आपल्या त्रिशुळाने त्याचे मस्तक कापून काढते. मुंड राक्षसाशी लढताना देवी त्याच्या शरीराचे शेकडो तुकडे करते. देवीच्या या घनघोर पराक्रमामुळे तिचा उल्लेख ‘चामुंडा’ असा केला जातो.
‘रम्यकपर्दिनि’ अर्थात तिच्या मस्तकी असलेला केशसंभार हा जटास्वरुप आहे. जटारुप शिवाचेसुद्धा आहे. त्या अर्थाने या पतीपत्नींचे ऐक्य दाखवले आहे. हा केशसंभार अत्यंत रमणीय आहे. उन्मत्त अशा महिषासुराचे जिने अवतार घेऊन निर्दालन केले आणि आपल्या या सर्व विशेषणांना सार्थ केले, अशा जगदंबे, तुझा सतत जय असो.
सुजीत भोगले
9370043901