अध्यात्म आणि विज्ञान परस्परविरोधी नाही : सरसंघचालक

    27-Nov-2024
Total Views |
RSS

नवी दिल्ली : “अध्यात्म आणि विज्ञान यात कोणताही परस्परविरोध नाही. विज्ञानाबरोबरच अध्यात्मातही श्रद्धा असलेल्या व्यक्तीलाच न्याय मिळतो. त्याचवेळी ज्याला आपल्या ज्ञानाचा अहंकार आहे, त्याला तो मिळत नाही. श्रद्धेमध्ये अंधत्वाला स्थान नाही,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) ( RSS ) सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मंगळवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी केले.

मुकुल कानिटकर लिखित जीवनमूल्यांवर आधारित ‘बनाए जीवन प्राण’ या पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले की, “गेली दोन हजार वर्षे जग अहंकाराच्या प्रभावाखाली चालले आहे. मला माझ्या इंद्रियांकडून मिळणारे ज्ञानच बरोबर आहे आणि दुसरे काही नाही, असा विचार प्रबळ आहे. विज्ञानाच्या आगमनापासून माणूस याच विचाराने जगत आहे. मात्र, हेच अंतिम नाही. विज्ञानालाही एक व्याप्ती आणि मर्यादा असते. त्यापलीकडे काहीही नाही, असे मानणे चुकीचे आहे.

भारतीय संस्कृती यासाठीची दृष्टी प्रदान करते,” असे सरसंघचालकांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “भारतीय सनातन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे की, बाहेरून पाहण्याबरोबरच आपण आतही पाहू शकतो. सखोल विचार करून जीवनाचे सत्य जाणून घेण्याची संधी भारतीय संस्कृती देते. याचा अर्थ विज्ञानाला विरोध असा होत नाही. जाणून घ्या आणि मग विश्वास ठेवा, असे विज्ञान सांगते. अध्यात्मातही हीच पद्धत आहे.