मुंबई : (Parth Pawar) अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या डिझाईन बॉक्स्डच्या नरेश अरोरा यांनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढून पोस्ट केल्यानंतर मिटकरींनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली होती. याच संदर्भात अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांनी त्यांचा पक्ष अमोल मिटकरींच्या या मतांचे समर्थन करत नसल्याच्या आशयाची पोस्ट करत मिटकरींना चांगलीच समज दिली आहे.
काय म्हणालेत पार्थ पवार?
अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीचे आमदार असूनही पक्षाच्या भूमिकेविरुद्ध भूमिका घेत आहेत, हे दुर्दैवी आहे. नरेश अरोरा आणि DesignBoxed संदर्भातील त्यांच्या वक्तव्याचा माझा पक्ष आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माझे वडील अजित पवार अजिबात समर्थन करत नाहीत. तसेच, मिटकरी यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देऊ नये, अशी भूमिकाही पार्थ यांनी ट्विट करुन मांडली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयानंतर आता पक्षामध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळत आहे. अमोल मिटकरी यांनी नरेश अरोरा यांच्यावर टीका करत थेट तुम्ही पगारी शपाई असल्याचं म्हटलं. तर, एका वर्तमानपत्रात लेख लिहित यशाचे डिझाईन राष्ट्रवादीचेच असा टोलाही लगावला. आता, त्यावरुन, पार्थ पवार यांनी मिटकरींना चांगलेच सुनावले आहे. त्यामुळे पक्षातल्या पक्षात मतमतांतर दिसून येत असल्याने चर्चेला उधाण आले आहे.