मृत्यूचे रहस्य

27 Nov 2024 21:09:45
mrutyuche rahasya


विज्ञान म्हटले की त्यात लपवालपवी किंवा असत्यकथन चालत नाही. शरीरोद्गमन एक उच्च विज्ञान असल्यामुळे योग्य तर्‍हेने प्रयोग करणार्‍या साधकाला एकसारखेच अनुभव येतील. उदाहरण द्यायचे झाल्यास, पृथ्वीवरील कोणत्याही भागात विशिष्ट परिस्थितीत प्राणवायूवर उदजनाचा संस्कार केल्यास त्यापासून पाणीच तयार होईल. अन्य पदार्थ तयार झाल्यास प्रयोगातच चूक आहे, हे स्पष्ट आहे. तद्वत् शरीरोद्गमन आणि पुनः शरीरप्रवेशाचे योग्य प्रयोग म्हणजेच साधना केल्यास सर्व साधकांना सारखेच अनुभव येतील. प्रत्येकाचे अनुभव भिन्न राहतात, असे म्हणणार्‍यांना अनुभवच नसणार! शरीरोद्गमनावेळी म्हणजे आपले जडशरीर सोडून उर्वरित तीन सूक्ष्म देह, मन, बुद्धी आणि जीवात्मा घेऊन साधक ज्यावेळी मृत्यूच्या घटनेचे अनुभव घेतो, त्यावेळेस कसे वाटते, याचा विस्ताराने पडताळा पाहू.

उद्गमन करताना प्रथम श्वास बंद होऊन गळा घोटल्याप्रमाणे वाटते. रुध्रिाभिसरण बंद होऊन हृदयही बंद पडते. सर्व शरीरातील नाड्या व शिरा स्वस्थ म्हणजे क्रियारहित बनतात. सर्व पेशीतील नित्य कार्य (ाशींरलेश्रळीा) सुद्धा बंद असते. पडलेले शरीर शव बनते. कारण, जीवात्म्याची उद्गमनयात्रा आता सुरू व्हायची असते. जीवात्मा शरीर सोडताना प्राप्त शरीर पूर्णपणे प्राकृतिक आणि सम करीत असतो. असल्या शरीराला वैज्ञानिक परिभाषेत ‘शव’ असे म्हणतात. जीवात्मारहित शरीर शव, तर जीवात्मासहित शरीर ‘शिव म्हटले जाते. हे शवशरीर वरुन मृत वाटले तरी जीवात्म्याचा त्यात पुनः प्रवेश झाल्यावर ते पूर्ववत् चैतन्यमय होत असते. वृक्षाचे शुष्क वाटणारे बीज पुन्हा सजीव होऊन त्याद्वारे वृक्ष प्राप्त होतो व त्या वृक्षाचे जीवन साकारते, तद्वत् अशा शवाचे आहे. असे शव संस्कार केल्यास या कल्पापर्यंत राहू शकते. या अवस्थेला ‘कल्प अवस्था’ म्हणतात. शरीराची ही कल्पावस्था आहे.
शवासनाचा सुरुवातीचा अभ्यास थोडा कष्टदायक असतो. कारण, जन्मजन्मांतरापासून शरीरात सोकावलेला जीवात्मा शरीरातून बाहेर पडताना शरीर सोडण्यास तयार नसतो. सततच्या संस्कारांमुळे जीवाला तशीच सवय पडून जाते आणि तद्विरुद्ध वागताना जीवाला कष्ट पडतात. साधी चहाचीच सवयसंस्कार पाहा ना! चहा सोडण्याचा प्रयत्न केल्यास चहा पिणार्‍याला विलक्षण त्रास होतो, मग हे तर प्रत्यक्ष शरीरच सोडणे आहे. म्हणूनच जीवात्म्याला शरीर सोडताना अतिशय वेदना होतात. उभ्या आयुष्यातील इस्टेट सोडताना होतात तशा! नाड्यानाड्यांतून जणू काही लोखंडाचे तीक्ष्ण आकोडे चरकन् ओढावे तसे वाटते. नाड्यानाड्यांतील प्राणात रमणारा जीव निघू पाहात नाही.

याचे समांतर उदाहरण म्हणजे सिमेंट काँक्रीटच्या कामाचे देता येईल. सिमेंट, रेती व लोहशलाकांचे प्रमाणबद्ध संलग्नीकरण करून ते बांधकाम काही आठवडे पाण्याच्या मायेने सतत सिंचन केल्यास त्या क्राँक्रीट कामावर हत्ती उभा केला, तरी ते तुटत नाही, फुटत नाही, अशा वेळेस त्यातील शलाका फोडून तोडून काढल्या तरी निघत नाहीत, इतक्या त्या काँक्रीटशी एकजीव झालेल्या असतात. तद्वत जन्मजन्मांतरीचे एकजीवत्वाचे संस्कार घेऊन प्राप्त शरीरात नांदणार्‍या जीवात्म्याला त्याचे लाडके शरीर सोडताना किती त्रास होत असेल बरे?

थॉमसन मूडी या अमेरिकन लेखकाने काही वर्षांपूर्वी प्रत्यक्ष मेलेल्यांचे व नंतर पुनर्जीवित झालेल्यांचे बरेच अनुभव आपल्या ‘लाईफ आफ्टर लाईफ’ नावाच्या पुस्तकात लिहिले आहेत. त्यात त्यांनी अशा तर्‍हेने प्राकृतिक मरण येणार्‍यांना जडशरीर सोडताना इतर सामान्य अनुभवांसह आणखी एक विचित्र अनुभव आलेला सांगितला आहे आणि तो म्हणजे, आपण एका काळ्याकुट्ट खोल दरीतून तरंगत जात आहोत, असा मरणार्‍या व्यक्तीला अनुभव येतो. शरीर जीवंत असताना योगसाधना करून शरीरोद्गमन करणार्‍या साधकाला असा काळ्या दरीचा प्रवास अनुभवास येत नाही. कारण, तो साधक तसा प्राकृतिकदृष्ट्या मरत नसतो. काळ्या दरीचा अनुभव प्राकृतिक मरणात येत असतो. लेखकाने याबाबत स्वतःचा अनुभव पुढे लिहिला आहे. हे सर्व अनुभव आहेत. कल्पना नव्हेत.

मरणार्‍या प्रत्येक व्यक्तीला असाच प्राणघेऊ अनुभव येत असावा. म्हणून त्या जन्मजन्मांतरीच्या अनेक मृत्यू संस्कारांना धरून मरताना प्रत्येक जीवाला भयंकर वेदना होत असतील. मरणाला प्रत्येक जीव भितो, मग ती मुंगी असो की माणूस असो. पुनर्जन्माचा हा एक भक्कम पुरावा आहे. सतत साधनाभ्यासामुळे मग यातना कमी होऊन शवासन करताना साधकाला उलट एकप्रकारची मनःशांती आणि असीम आनंद होतो. शरीरातील सर्व नाड्यांतून प्राणशक्ती सरकन वर सरकते. रुधिराभिसरण बंद होते, श्वास बंद पडतो, जडशरीर व जडजगताचे विस्मरण होते. नंतर आपण विमानाप्रमाणे शरीराबाहेर निघत आहोत, असा अनुभव येतो. काही साधकांना त्यावेळी सायरनसारखा किंवा एखादी स्केलपट्टी दोरीला बांधून ती वेगाने फिरविली असता जसा घुँई घुँई आवाज येतो, तसा काहीसा आवाज येतो. त्या अवस्थेतील दिव्य डोळ्यांसमोर एक विलक्षण तेजस्वी आणि गतिमान चक्र दिसते.

पण, हा अनुभव सर्वांनाच येईल, असे नाही. ज्यांना येईल त्या साधकांना शरीरोद्गमन करताना हे चक्र अपसव्य म्हणजे उलट गतीने (अपींळ लश्रेलज्ञुळीश) फिरताना दिसून येईल. शरीरात प्रवेश करताना हेच चक्र सुलट गतीने म्हणजे सव्य गतीने (लश्रेलज्ञुळीश) फिरताना दिसेल. थोडक्यात मृत्यूसमयी म्हणजे जड-सूक्ष्मशरीर विघटन होताना दिव्यचक्र अपसव्य गतीने, तर शरीरप्रवेश वा जन्म घेताना ते चक्र सव्य गतीने फिरताना दिसेल. या वैश्विक चक्रगतीचा अनुभव घेऊनच आपल्या ऋषीमुनींनी वैदिक परंपरेत काही संस्कार सांगितले आहेत. ते म्हणजे, परमेश्वराला मंदिरात गेल्यावर प्रदक्षिणा करावी. दक्षिण म्हणजे उजवी बाजू व वाम म्हणजे डावी बाजू. मंदिरात भक्ताने मनात इच्छा ठेवून परमेश्वराच्या सव्य म्हणजे उजव्या बाजूनेच फिरावे, तर श्राद्धसमयी पितरांना पिंडदान करताना अपसव्य म्हणजे डाव्या बाजूनेच फिरावे. असे का करावे? याबद्दल पुढे विवरण येईल.
 
लिंगशरीर अवस्था
 
यानंतर साधकाला असा विचित्र अनुभव येतो की, साप ज्याप्रमाणे आपली कात टाकतो, तद्वत् साधक जीवात्मा आपला जडदेह खाली टाकून त्या शवाच्या वर दोन-तीन फुटांवर त्याच आकाराच्या सूक्ष्म दिव्य शरीराने तरंगत असतो. म्हणूनच या दिव्य अवस्थेचा अनुभव घेऊन संत तुकारामांनी आपल्या सरळ अभंगवाणीत त्याचे वर्णन केले आहे. तुकाराम महाराज महान योगसाधक होते. ते म्हणतात, ‘आपुले मरण। पाहिले म्यां डोळा। तो हा सोहळा। अनुपम॥’ अभ्यासाने या लिंगदेहाला इच्छामात्रे करून कोठेही नेता येते. इच्छा केल्याबरोबर ते लिंगशरीर तत्क्षण इच्छित स्थळी जाऊन तेथील इच्छित अनुभव घेऊन परत आपल्या जडदेहात प्रविष्ट होत असते. (क्रमशः)
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)


योगिराज हरकरे
9702937357
Powered By Sangraha 9.0