पीक पेरणीसाठी शेतकर्‍यांची लगबग

रब्बी हंगामातील गहू, हरभरा पेरणीला वेग

    27-Nov-2024
Total Views |
Farmer

नाशिक : रब्बी हंगामातील पिकांच्या मशागतीला सध्या वेग आला असून, पेरणीपूर्व कामांची शेतकरी ( Farmer ) वर्गाकडून लगबग सुरु झाली आहे. हिवाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील सर्वच भागात गहू आणि हरभर्‍याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. विशेषकरुन थंडीच्या दिवसात पिकांच्या लागवडीसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने मशागतीला वेग आल्याचे दिसून येत आहे. त्यातच यंदा पावसाळा लांबल्याने रब्बी हंगामाला काहीसा उशीर होत आहे. त्यात गहू, हरभरा पिकांसाठी आवश्यक असणारी थंडी ही उशीरा सुरु झाली. त्यामुळे या पिकांचा हंगाम काहीसा लांबल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात येत आहे.

खरिपातील पिकांच्या काढणीनंतर रब्बी हंगामात करण्यात येणार्‍या पिकांच्या मशागतीला खर्‍या अर्थाने वेग येतो. साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत रब्बीच्या पेरण्या पूर्ण झालेल्या असतात. मात्र, परतीच्या पावसाने यंदाच्या ऋतुचक्रात काहीसा बदल झाल्याचे जाणवत आहे. त्यातच खरिपात पेरणी करण्यात आलेला भात, मका, सोयाबीन, भुईमुग या पिकांची काढणी लांबली आहे. त्याचबरोबरच टोमॅटोचे पिकही अजून शेतात तसेच उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे मशागतीला अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याचप्रमाणे शेतात पावसाचे पाणी साचल्याने शेतीचा वाफसा येण्यातही विलंब होत आहे. याचा विपरीत परिणाम होऊन गहू आणि हरभर्‍याच्या पेरणीला सध्या विलंब होत आहे. या सगळ्या अडचणींवर मात करुन शेतकरी वर्ग आता रब्बीच्या पेरणीसाठी सज्ज झाला आहे.

यंदा जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे काठोकाठ भरल्याने बळीराजाला शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत पेरण्या लांबणार असल्या तरीही मोठ्या प्रमाणावर गव्हाचे आणि हरभर्‍याचे क्षेत्रदेखील वाढणार असल्याची शक्यता आहे. गहू आणि हरभरा पिकाबरोबरच ज्वारी, बाजरी या पिकांच्याही पेरण्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता बळीराजाकडून वर्तविली जात आहे.

तुरळक पेरण्या पूर्ण

विविध अडचणींवर मात करुन जिल्ह्यातील काही ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्या आहे. तर काही ठिकाणी पिके जमिनीच्या वर आल्याचे दिसून येत आहे. तर उर्वरित पेरण्यादेखील येत्या दीड-ते दोन महिन्यांत पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

गव्हाची शेती बहरणार

यंदा प्रमाणापेक्षा अधिक पाऊस पडल्याने सुरुवातीपासूनच वातावरणात गारवा जाणवायला सुरुवात झाली. त्यात इतर वर्षाच्या तुलनेत यंदा थंडी जास्त राहणार असल्याचे हवामानतज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. गहू आणि हरभरा पिकाच्या जोमदार वाढीसाठी थंडी आवश्यक असते. जोरदार थंडीला सुरुवात झाल्याने गव्हाची शेती बहरणार आहे. वाढत्या थंडीमुळे यंदा गव्हाचे उत्पादनही वाढणार असल्याचे बोलले जात आहे.