‘धारकरी पॅटर्न’मुळे मविआचे दिग्गज घायाळ!

27 Nov 2024 15:31:10
Bhide Guruji

मुंबई : महाराष्ट्राच्या राजसत्तेच्या चाव्या महायुतीच्या ताब्यात देताना, नागरिकांनी भरभरून मतदान केले. त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातील मतदानही विक्रमी झाले. निवडणूक म्हटली की, अनेक डावपेचांची जशी चर्चा असते, तशीच ती काही पॅटर्न्सचीदेखील असते. राज्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीतदेखील असेच अनेक ‘पॅटर्न’ पहायला मिळाले. त्यांपैकीच एक नवीन पॅटर्न म्हणजे ‘धारकरी पॅटर्न’ ( Dharkari pattern ) होय. या पॅटर्नने अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाची चव चाखली आहे, तर काही पडणार्‍या हिंदूनिष्ठांच्या जागा निवडून दिल्याची चर्चा आहे.

‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थे’च्या अनेक धारकर्‍यांचा ‘धारकरी पॅटर्न’ सध्या चर्चेत आहे. या पॅटर्नमुळे पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांसारख्या दिग्गजांना या विधानसभेच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागाला आहे. भिडे गुरुजींच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य करणार्‍या नेत्यांविषयीची नाराजी अनेक धारकर्‍यांनी मतपेटीतून व्यक्त केली आहे. त्याचा फटका बसल्याने या दिग्गजांचा पराभव झाल्याचे म्हणता येईल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी भिडे गुरुजी यांच्यावर अपमानास्पद टीका केली होतीच, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधिमंडळ सभागृहात भिडे गुरुजी यांना तत्काळ अटक करण्याची मागणी करताना, “भिडे गुरुजींना गुरुजी का म्हटले जाते?” असा अवहेलनात्मक प्रश्नदेखील उपस्थित केला होता.

त्यात यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला आणि मविआच्या नेत्यांना मतदान करण्याचे मुस्लिमांचे फतवेही निघाले होते. त्यामुळेच, नाराज झालेल्या धारकरीवर्गाने हिंदूहित लक्षात घेऊन मतदान केले. परिणामी, कोल्हापूर, सांगली, सातारा या प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांत विजय मिळवण्यासाठी धारकरीवर्गाने मोठ्या प्रमाणात बैठका, सभा यांचे नियोजन केले होते. ‘दुर्गादौड’ असो किंवा किल्ले मोहिमा असो, यांच्या माध्यमातून गावागावांतील अनेक तरुण ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ संघटनेशी जोडले गेले आहेत. त्यामुळे संभाजी भिडे गुरुजींच्या मागे तरुणांची मोठी फौज उभी असून त्यांनी देव, देश आणि धर्म यांच्यासाठी ठरवून मतदान केल्याने मविआचे पानिपत झाल्याचे चित्र राज्यात आहे.देव, देश आणि धर्मासाठी मतदान करा!

राज्यात हिरवे फतवे काढणार्‍यांना डोके वर काढू देऊ नका,” असा आदेश या निवडणुकीसाठी गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजींनी दिला होता. आमच्याच मतांच्या आधारे सत्तेत बसून सत्ता डोक्यात गेल्याने, गुरुजींविषयी अपमानास्पद शब्दांचा वापर करणारे काही नेते लक्षात होतेच. त्यामुळे आम्ही सत्य जनतेसमोर ठेवले. गुरुजींचे कार्य सर्वांना माहीत आहे. ते वेगळे सांगण्याची गरज पडली नाहीच, फक्त देव, देश आणि धर्म यांसाठी मतदान करण्याची विनंती आम्ही धारकर्‍यांनी जनतेला केली. जनतेने स्वतःचे, स्वधर्माचे आणि देशाचे यश लक्षात घेऊन योग्य ते मतदान केले. त्याचा निकाल आपल्यासमोर आहेच.

विनायक बालगुडे, मुंबई प्रमुख, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान


Powered By Sangraha 9.0