हिंदूशक्ती युगे युगे...

27 Nov 2024 21:53:18
bangladesh hindu harrasement


शेख हसीना यांचे सरकार कट्टरतावाद्यांनी उलथवल्यापासून ते आजतागायत बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचे सत्र थांबण्याची चिन्हे नाहीत. बांगलादेशातील काळजीवाहू सरकारचे प्रमुख असलेल्या मोहम्मद युनूस यांची याविषयीची हतबलता आणि निष्क्रियता ही यासाठी सर्वस्वी कारणीभूत. बांगलादेशातील ‘सनातन जागरण मंचा’चे प्रवक्ता आणि ‘इस्कॉन’चे चिन्मय कृष्ण दास प्रभु यांना मंगळवारी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यानंतर बांगलादेशमधील हिंदू मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून, त्यांनी युनूस सरकारच्या हिंदूविरोधी धोरणांना विरोध दर्शविला आहे.

‘प्रभू प्रणोम’ असे अत्यंत आदबीने आणि चेहर्‍यावर स्मित करत हिंदू बांधवांना प्रेमाने अभिवादन करणारे चिन्मय कृष्ण दास. बांगलादेशातील हिंदूंमध्ये चिन्मय हे त्यांच्या कीर्तनांसाठी आणि अध्यात्मिक उपदेशांसाठी सुप्रसिद्ध. चितगांवच्या ‘पुंडरिक धाम’चेही ते प्रमुख. पण, बांगलादेशात हिंदूंच्या न्याय्य-हक्कांसाठी आणि हिंदूहितासाठी आंदोलन केले म्हणून त्यांच्यावर चक्क देशद्रोहाचा ठपका ठेवण्यात आला. एवढेच नव्हे, तर सरकारविरोधी आंदोलनात चिन्मय कृष्ण दास यांनी भगवा ध्वज फडकावला, हादेखील तेथील कट्टरतावाद्यांच्या हातातले बाहुले असलेल्या सरकारच्या दृष्टीने राजद्रोह! यावरून बांगलादेशातील वातावरण हिंदूंसाठी किती असुरक्षित आणि धोकादायक आहे, याचीच प्रचिती यावी.

ऑगस्ट महिन्यात शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर बांगलादेशात झालेल्या हिंदूंवरील अनन्वित अत्याचाराची तर गणतीच नाही. हिंदूंची घरे, दुकाने, शेती अशी दिसेल ती मालमत्ता आगीच्या तोंडी देऊन, हिंदूंचे रक्तही सांडण्यात आले. हिंदू आयाबहिणींच्या अब्रूवरही या इस्लामी कट्टरतावाद्यांची वक्रदृष्टी पडली. परिणामी, कित्येक हिंदूंना त्यातल्या त्यात सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची वेळ आली. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यापेक्षा युनूस सरकारने ‘जमात-ए-इस्लामी’सारख्या कट्टरतावादी संघटनांना वेळोवेळी पाठीशी घातले. एवढेच नाही, तर हिंदूंवरील अत्याचार हा केवळ प्रपोगंडा असल्याचे धक्कादायक मत काही दिवसांपूर्वीच युनूस यांनी व्यक्त केले होते. यावरून त्यांचा या सगळ्या प्रकरणांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा हिंदूद्वेषाने किती कलूषित आहे, याचीच कल्पना यावी.

म्हणूनच चितगांवमध्ये हजारो हिंदूंना घेऊन आंदोलनाचे नेतृत्व करणार्‍या चिन्मय कृष्ण दास यांच्यावर युनूस सरकारने कारवाईचा बडगा उगारला. त्यांना ढाका विमानतळावर उतरताच अटक करण्यात आली. त्यांच्यावर बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला. तसेच न्यायालयाने त्यांचा जामीनही तातडीने नाकारला. त्यामुळे सध्या चिन्मय कृष्ण दास तुरुंगात असून, त्यांच्या समर्थनार्थ हिंदू बांधव ठिकठिकाणी रस्त्यावर उतरले आहेत. पण, शांतपणे आंदोलन करणार्‍या हिंदूंवरही बांगलादेशातील पोलिसांनी दडपशाही चालवली असून, लाठीचार्ज केल्याच्या घटना मागील दोन दिवसांत घडल्या आहेत.

चिन्मय कृष्ण दास यांनी त्यांना अटक करतेवेळी बांगलादेशातील हिंदू बांधवांना एकतेचा संदेशही दिला. एकप्रकारे ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक हैं तो सेफ हैं’ असेच चिन्मय कृष्ण दास यांनी अप्रत्यक्षरित्या सूचविले. तेथील विदारक, जीवावर बेतणारी परिस्थिती लक्षात घेता, या दोन्ही घोेषणा बांगलादेशी हिंदूंच्या दृष्टीनेही जीवनमंत्र ठराव्या. या एकूणच प्रकरणानंतर मोदी सरकारनेही बांगलादेशकडे गंभीर चिंता व्यक्त करीत, हिंदूंसह अल्पसंख्याकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचा सल्ला दिला आहे. पण, त्याकडे गांभीर्याने पाहण्याचे आश्वासन देण्याऐेवजी युनूस सरकारने हा बांगलादेशचा अंतर्गत मुद्दा असल्याचे सांगत भारतालाच उलटे सुनावण्याचा उफराटेपणा दाखविला आहे.

दुर्दैव हेच की, बांगलादेशमधील हिंदू आध्यात्मिक गुरूच्या अटकेविषयी भारतातील पुरोगामी जमातही चिडीचूप आहे. गाझा आणि अन्य मुस्लीम राष्ट्रांतील मानवाधिकारांवर ‘सेव्ह गाझा’ वगैरे म्हणून व्यक्त होण्याची चढाओढ लावणारे हे पुरोगामी, माध्यमांतील पत्रकार या प्रकरणी मात्र अपेक्षेप्रमाणे मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे मानवाधिकारांच्या नावाखाली अन्याय-अत्याचारांवर व्यक्त होण्याचा हा सोयीस्करपणा सर्वस्वी निंदनीय. त्यामुळे भारत सरकारसह जगभरातील हिंदूंनीही आता चिन्मय कृष्ण प्रभु यांच्या सुटकेसाठी बांगलादेश सरकारवर दबाव वाढवून ‘हिंदूशक्ती युगे युगे’चा परिचय करून देणे, हे परम कर्तव्यच!




Powered By Sangraha 9.0