पुणे : विश्व साहित्य संस्कृती चळवळ व अक्षरयात्री प्रतिष्ठान यांनी उभे केलेले काम अत्यंत प्रेरणादायी असून त्यांनी सुरू केलेल्या या संमेलनातून जागतिक प्रेमाची आणि मानवतेची बांधणी होईल तसेच जगातील अनेक देशातील साहित्य व संस्कृती यांचा मिलाफ होऊन जागतिक मैत्रीचा प्रसार सर्वदूर पोहोचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या २६ व्या अक्षरयात्री भारत-श्रीलंका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना इरोशनी गलहेना यांनी केले. अक्षरयात्री प्रतिष्ठान तर्फे २६ वे ’भारत-श्रीलंका विश्व साहित्य संमेलन’ गुरुवारी २१ नोव्हेंबर रोजी पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात बोलताना इरोशनी गलहेना पुढे म्हणाले “आयोजक माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे आणि कवयित्री डॉ. स्वाती शिंदे-पवार यांच्यामुळे दोन देशातील साहित्यिकांच्या विचारांचे आदान-प्रदान आज होत आहे. सबुद्धी प्रतिष्ठान, श्रीलंका सरकार, अनेक विद्यापीठांचे विभागप्रमुख यांच्यासह आम्ही केलेली ही भारताची सांस्कृतिक पाहणी फारच आनंददायी आहे.”
पुण्यात पार पडलेल्या या संमेलनाचे अध्यक्षपद श्रीलंकेतील सबुद्धी संघटनेच्या सरचिटणीस इरोशनी गलहेना यांनी भूषविले तर सदस्या आरुमुगम निरोमी या संमेलनाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले. या संमेलनाला श्रीलंकेतील ११ आणि भारतातील २१ कवी उपस्थित होते.