भारताचा गौरवशाली निर्णय ‘आर्टिकल ३७०’ हे चित्रपटाच्या माध्यमातून मांडणं महत्त्वाचं होतं : आदित्य जांभळे

27 Nov 2024 11:51:02
Article 370

पणजी : जम्मू-काश्मीरमधून हटवण्यात आलेल्या ‘कलम ३७०’चा ( Article 370 ) स्वातंत्र्यानंतरचा ७५ वर्षांचा इतिहास आदित्य धर निर्मित आणि आदित्य जांभळे दिग्दर्शित ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. नुकताच हा चित्रपट गोवा येथील ५५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य जांभळे यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने संवाद साधला.

‘आर्टिकल ३७०’ हाच चित्रपटाचा विषय निवडावा, असं का वाटलं? आणि संपूर्ण चित्रपटाचा प्रवास कसा घडला?

दि. ५ ऑगस्ट २०१९ रोजी राजकीय इतिहासातील अतिशय महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय आपल्या भारत देशाने घेतला होता. त्यामुळे देशाप्रति असलेल्या माझ्या भावना आणि जगभरातील राजकारणाच्या दृष्टिकोनातून घेतलेला ‘कलम ३७०’ हटवण्याचा निर्णय कसा घेतला? पंतप्रधान, गृहमंत्री, सीआरपीएफ यांनी असंख्य बाबींचे दिलेले बलिदान म्हणजे ‘कलम ३७०’ आहे. आणि मुळात ज्यावेळी हा विषय चित्रपटातून मांडण्याचा मी दिग्दर्शक आणि लेखक म्हणून निर्णय घेतला होता, त्यावेळी आमच्यावर भविष्यात होणार्‍या टीका आणि त्यांचा सामना करण्याची पूर्वतयारी करूनच आम्ही मैदानात उतरलो होतो. ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेवरूनच हा ‘प्रपोगंडा’ चित्रपट आहे, अशा प्रतिक्रिया आम्हाला येतील हे माहीत होते. मात्र, आम्ही मेकर्स म्हणून व्यावसायिकदृष्ट्या विचार करून चित्रपट प्रदर्शित केला होता. शिवाय, दिग्दर्शक म्हणून मला प्रसंगी न्यायालयाची पायरीदेखील चढावी लागेल, हे मला ठाऊक होते. पण केवळ देशाचा गौरवशाली निर्णय लोकांना समजणे फार गरजेचे होते आणि चित्रपटापेक्षा दुसरे माध्यम असू शकत नाही, म्हणूनच ‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपटाचा मी विषय घेतला आणि पुराव्यासहित तो मांडण्याचा प्रयत्न केला.

‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाचे लिखाण आणि दिग्दर्शन करण्यासाठी संशोधन कसं केलं?

‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाची कथा प्रेक्षकांसमोर मांडण्यापूर्वी कागदावर अगदी सखोल माहिती गोळा करून त्याची एक पक्की माहिती जवळ असणे, फार गरजेचे होते. आणि त्यासाठी घटनेत दिलेले आदेश किंवा त्यातील प्रक्रिया याचे सर्व लिखित पुरावे आम्ही गोळा केले होते. अधिकृत सर्व कागदपत्रे आम्ही गोळा केली होती. आणि त्यामुळे चित्रपटाची कथा लिहिण्यास आधार मिळाला. शिवाय, ज्यावेळी ‘आर्टिकल ३७०’सारखा संवेदनशील विषय हाताळण्याची वेळ येते आणि त्यात देशाचे राजकीय स्तरावर प्रतिनिधित्व करणार्‍या दिग्गजांची पात्रे दाखवायची असतात. त्यावेळी प्रत्येक कलाकार आणि दिग्दर्शकावरही ती फार मोठी जबाबदारी असते. या चित्रपटात आम्हाला पंतप्रधान, गृहमंत्री यांची पात्रे साकारून त्यांच्या राजकीय भूमिका मांडायच्या होत्या. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भूमिका साकारणारे अभिनेते किरण करमरकर यांना केवळ एकच सल्ला दिला होता की, तुम्ही तुमचे संवाद कलाकार म्हणून नाही, तर गृहमंत्री म्हणून सादर केले, तर प्रेक्षकांना तो अभिनय न वाटता, वास्तव वाटेल. त्यामुळे कथेसोबत प्रत्येक पात्र साकारण्यासाठीही संशोधन केले होते. शिवाय, मी अभियांत्रिकी विभागाचा विद्यार्थी असल्यामुळे संशोधन हे माझ्या रक्तात असून ‘आर्टिकल ३७०’ हा विषय हाताळण्यापूर्वी संशोधनासाठी मी अधिक काळ घालवला होता.

‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी काश्मीरमधील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया होत्या?

‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपट मुंबई, दिल्ली आणि प्रामुख्याने काश्मीरमध्ये चित्रित केला गेला. मुळात सध्या काश्मीरमध्ये आर्थिक उलाढाल वाढू लागली आहे आणि त्यामुळे तेथील नागरिक उत्साहाने आलेल्या पर्यटकांचे स्वागत करताना दिसतात. त्यामुळे जेव्हा आम्ही काश्मीरमध्ये चित्रीकरण करत होतो, तेव्हा कुठलीही अडचण न येता, आमचे चित्रीकरण पूर्ण झाले. तसेच, आमच्या अधिक सुरक्षेसाठी सीआरपीएफचे जवान आमच्यासाठी तैनात करण्यात आले होते. त्यामुळे काश्मीरमध्ये आम्हाला जर अडचणी आल्या असतील, तर त्या हवामानामुळेच आल्या. बाकी काश्मीरमधील रहिवाशांमुळे कोणताही अडसर न येता अगदी सुरळीतपणे चित्रीकरण पूर्ण झाले आणि इथे मला विशेष नमूद करावेसे वाटते की, ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाच्या निमित्ताने काश्मीरमधील बालकलाकारांशी माझी विशेष गट्टी जमली आहे.

‘आर्टिकल ३७०’ पाहिल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया काय आल्या होत्या?

‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपट देशभरातील प्रत्येक राजकीय नेत्यांनी आवर्जून पाहिला होता आणि मला त्याच्या वैयक्तिकरित्या आणि सोशल मीडियावर प्रतिक्रियादेखील दिल्या होत्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संपूर्ण चित्रपटाच्या टीमचे विशेष आभार मानले होते. परंतु, ज्यावेळी सोशल मीडियावर राजकीय नेत्यांनी चित्रपटाबद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या; त्यावरूनही ठराविक राजकीय पक्षासाठी आम्ही चित्रपट केला, अशी सडकून टीका आमच्यावर करण्यात आली होती. मात्र, ‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपट आपल्या भारत देशाची ओळख आहे आणि ती जागतिक स्तरापर्यंत पोहोचलीच पाहिजे, हाच आमचा अट्टहास होता आणि आहे.

Powered By Sangraha 9.0