अदानी समूहाच्या समभागांसह खासगी बँकेचा शेअर बाजारात बोलबाला!

27 Nov 2024 17:55:19
adani-group-shares-gained-momentum


नवी दिल्ली :   
  भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजी दिसून आली. सेन्सेक्स व निफ्टी या दोन्ही निर्देशांकांत सकारात्मक वाढ दिसून आली. सेन्सेक्स २३०.०२ अंकांच्या वाढीसह ८०,२३४.०८ च्या पातळीवर स्थिरावला तर निफ्टी ८०.४० अंकांनी वधारत २४,२७४.९० वर बंद झाला. जागतिक बाजारातील वाढीमुळे भारतीय शेअर बाजाराने पुन्हा वेग पकडल्याचे पाहायला मिळाले.


दरम्यान, शेअर बाजारात अदानी समूह आणि एचडीएफसी बँकेच्या समभागाच्या वाढीसह बाजार बंद झाला असून या दोन गोष्टींचा बोलबाला दिसून आला. यासह दोन्ही प्रमुख निर्देशांक वाढीसह बंद झाले. सद्यस्थितीस शेअर बाजार तीन आठवड्यांच्या उच्च पातळीवर आला आहे. विशेष म्हणजे दि. ०६ नोव्हेंबरला सेन्सेक्स ८०,३७८.१३ वर बंद झाला होता तर २७ नोव्हेंबरला ८०,२३४.०८ च्या पातळीवर स्थिरावला. उलटपक्षी, ऊर्जा, मीडिया, धातू आणि वित्तीय सेवा कंपन्यांच्या समभागात ०.५२ टक्के वधारले. तर फार्मा, रियल्टी आणि आयटी या कंपन्यांमध्ये मोठी घसरण झाली.

आज शेअर बाजारात प्रामुख्याने अदानी समूहाच्या शेअर्सचा बोलबाला पाहायला मिळाला. त्याचबरोबर, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स या कंपन्यांच्या समभागात वाढ दिसून आली. अदानी इंटरप्रायजेस, अदानी पोर्टस् यांचे समभाग अनुक्रमे ११.५६ व ५.९० टक्क्यांनी वधारले. तर दुसरीकडे, टायटनच्या समभागात ०.७७ टक्क्यांनी घसरण झाली. यासह सन फार्मा, एशियन पेंट्स, टीसीएस, एचसीएल टेक यांचे समभाग घसरणीत राहिले.

शेअर बाजार वाढीच्या मागची कारणे पाहिल्यास अदानी समूहाच्या बंपर वाढीमुळे शेअर बाजार सकारात्मक राहिला. याशिवाय सेन्सेक्समध्ये वजनदार असलेल्या एचडीएफसी बँकेच्या समभागांच्या वाढीमुळेही शेअर बाजारावर अधिक परिणाम दिसून आला. सद्यस्थिती बाजारातील अस्थिरतेत घट दर्शवित असून हे सुधारित गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास आणि अल्पावधीत अधिक स्थिर व्यावसायिक वातावरण प्रतिबिंबित करते आहे, असे बाजारतज्ज्ञांचे मत आहे.




Powered By Sangraha 9.0