२७ नोव्हेंबर, पुणे : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दरवर्षी महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी दिला जाणारा ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ या वर्षी प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना जाहीर झाला आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली २८ नोव्हेंबर रोजी फुले वाड्यात आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात नागराज मंजुळे यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. एक लाख रुपये, फुले पगडी, मानपत्र, शाल आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सामाजिक, राजकीय, साहित्य, पत्रकारिता यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते, पटकथा लेखक, कवी अशा अनेक भूमिका बजावणाऱ्या नागराज मंजुळे यांनी आपल्या कलाकृतींमधून समतेचा पुरस्कार केल्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.