मुंबई : उद्धव ठाकरेंचा विजय म्हणजे वोट जिहाद, लव्ह जिहाद आणि लँड जिहादचा विजय आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. बुधवार, २७ नोव्हेंबर रोजी मुलुंड येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेत त्यांनी उबाठा गट वोट जिहादमुळे वाचल्याचा आरोप केला आहे.
किरीट सोमय्या म्हणाले की, "लोकसभेप्रमाणे विधानसभेतही मौलाना सज्जाद नोमानी आणि वोट जिहादमुळे उबाठा सेनेची इज्जत वाचवली. वोट जिहाद नसते आणि सज्जाद नोमानी ठाकरेंच्या समर्थनार्थ प्रचारात उतरले नसते तर त्यांची उरलीसुरली इज्जत संपली असती. उद्धव ठाकरेंना मुंबईत १० जागांवर मिळालेला विजय हा वोट जिहादमुळेच मिळाला आहे," असे ते म्हणाले.
"लोकसभा आणि विधानसभेला बुथप्रमाणे मिळालेल्या मतांचे आम्ही विश्लेषण केले. माहिम कापड बाजारातील ४ हजार ५४० मुस्लिम मते उबाठा सेनेला मिळाली. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला केवळ ४५९ मते मिळाली. वर्सोवा विधानसभेतही हीच परिस्थिती पाहायला मिळाली. याठिकाणी उबाठा सेना केवळ सोळाशे मतांनी विजयी झाली. येथील २३ बुथमध्ये उबाठा सेनेला ९ हजार ४४८ मते मिळाले तर भाजपच्या भारती लव्हेकर यांना केवळ २३२ मते मिळाली. जोगेश्वरीमध्ये अनंत नर १५४१ मतांनी विजयी झाले. इथल्या १७ बुथवर उबाठा सेनेला वोट जिहादचे ७ हजार ७ मते मिळाली तर महायूतीला केवळ ६१४ मते मिळाली. भायखळा विधानसभेत अग्निपाडा, नागापाडा इथल्या ४६ बुथवर उबाठाला २० हजार ५ मते मिळाली तर शिवसेनेला केवळ ५६१ मते मिळाली. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय वरुण सरदेसाईंचीसुद्धा हीच परिस्थिती आहे. त्यांच्यासमोर झिशान सिद्दीकी हे मुस्लीम उमेदवार असूनही १० हजार ५७६ मते उबाठाला मिळाली. २०१९ मध्ये याच विधानसभा आणि लोकसभेत उद्धव ठाकरेंना १०० मतेसुद्धा मिळाली नव्हती. त्यामुळे हा विजय उद्धव ठाकरेंचा नसून मौलाना सज्जाद नोमानीचा आहे," असा गंभीर आरोप सोमय्यांनी केला.