कोल्हापूरकरांनी घेतला छत्रपतींच्या अपमानाचा बदला

27 Nov 2024 19:04:55


kolhapur



मुंबई, दि.२७ : विशेष प्रतिनिधी 
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील १० मतदारसंघात महायुतीने धमाकेदार विजय मिळवला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झालीय तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाची अवस्थादेखील काही वेगळी नाही. करवीर निवासिनी अंबाबाई जिथे वास्तव्य करते अशा कोल्हापूरच्या छत्रपतींच्या सुनेचा अपमान कोल्हापूरवासियांच्या चांगलाच जिव्हारी लागला आणि थेट मतपेटीतूनच अद्दल घडवत मतदारांनी महाविकास आघडीला कोल्हापुरातून हद्दपार केलं.
जागावाटपात सुरु झालं नाराजी नाट्य

कोल्हापूर जिल्हा विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासूनच चर्चेत असणारा जिल्हा होता. काँग्रेसच्या आणि महाविकास आघडीच्या पराभवाची सुरुवात खरंतर काँग्रेसच्या जागावाटपाच्या नाराजी नाट्याच्यावेळीच झाली होती. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांची उमेदवारी कापून काँग्रेसने राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती. परंतु काँग्रेस पक्षातील वरिष्ठांनी लाटकर यांची उमेदवारी रद्द करून मधुरीमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. इथेच काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरु झाले.

मधुरिमा राजे छत्रपती कोण ?

मधुरिमाराजे या कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते असलेल्या दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या आहेत. त्या सध्याचे कोल्हापूरचे खासदार आणि शाहू छत्रपती यांच्या सून, तर मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी आहेत.

छत्रपतींच्या सुनेचा अपमान

मधुरिमा राजे यांना एबी फॉर्म देऊन त्यांचा उमेदवारी अर्जही भरला गेला. दरम्यानच्या काळात राजेश लाटकर प्रचंड नाराज होते. त्यांनी काँग्रेस पक्षावर उमेदवारीवरून आरोप केले. लाटकर हे पक्षातील महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. त्यांची नाराजी पक्षाला परवडणार नाही, असे सांगून मधुरीमाराजे यांनी अर्ज माघार घेण्याचा निर्णय घेतला, असे खासदार शाहू छत्रपती यांनी माध्यमांना सांगितलंही. मात्र हा अर्ज मागे घेताच सतेज पाटील यांनी “मला कशाला तोंडघशी पाडलं? दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना. मग मी पण दाखवली असती माझी ताकद', असे म्हणत खासदार शाहू छत्रपती आणि मधुरिमा राजे यांना दम भरला. इतकेच नाहीतर माध्यमांसमोर शाहू छत्रपतींच्या घराण्याला अपमास्पद वागणूक देत सतेज पाटील जिल्हाधिकारी कार्यालयातून निघालेले तमाम कोल्हापुरवासीय आणि महाराष्ट्राने पहिले. कोल्हापूरवासियांना छत्रपतींचा आणि त्यांच्या सुनेचा अपमान जिव्हारी लागला याचाच परिणाम मतदारांनी काँग्रेसला नाकारले आणि महायुतीला कौल दिला.

बाळासाहेबांच्या निष्ठावान मतदारांनी उद्धव ठाकरेंना नाकारले

ज्यावेळी राज्यात लोकसभा-विधानसभा निवडणूक लागतात, त्यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातूनच करत होते. ६ मे १९८६ला कोल्हापुरात शिवसेनेची स्थापना झाली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांनी कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घेतलं. त्याच दिवशी कोल्हापूरमधल्या बिंदू चौक इथं बाळासाहेब ठाकरे यांची पहिली सभा झाल्याचे संदर्भ आहेत. हीच प्रथा कायम राखत दिवाळी पार पडताच उद्धव ठाकरे यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेत कोल्हापुरात प्रचाराचा नारळ फोडला. मात्र आदमापुरात झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी केपी पाटील यांच्या विजयाची जबाबदारी जाहीरपणे काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या खांद्यावर टाकली आणि आपल्या उमेदवाराला काँग्रेसच्या हवाली केले. राधानगरी मधून शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश अबिटकर आणि उद्धव ठाकरे गटाचे केपी पाटील यांच्यात लढत होती. 'गद्दाराला पराभूत करा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. यावेळी मतदारांनी आपला कौल शिंदेसेनेच्या उमेदवार प्रकाश आबिटकर यांच्या पारड्यात देत आपण बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत कायम आहोत हा विश्वास व्यक्त केला.
महायुतीची विजयी हॅट्रिक तर मविआचा सुपडा साफ

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपने दोन जागांवर विजय मिळवलाय. तर कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक विजयी झाले. इचलकरंजीमधून राहुल आवाडे जिंकले आहेत. शिवसेना शिंदे गटाने सुद्धा जिल्ह्यातील तिन्ही जागा पटकावल्यात. राधानगरीमधून प्रकाश आबिटकर, करवीरमधून चंद्रदीप नरके आणि कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर यांचा यात समावेश. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला कागलची जागा राखण्यामध्ये यश मिळालंय. या ठिकाणी हसन मुश्रीफांनी सलग सहाव्यांदा विजय मिळवलाय. इतकंच नाहीतर जनसुराज शक्ती पक्षानेही दमदार कामगिरी करत दोन जागा पटकावल्यात. शाहूवाडीमधून विनय कोरे तर हातकणंगले मतदारसंघातून अशोकराव माने विजयी झालेत. शिरोळमध्ये सुद्धा शिवसेना पुरस्कृत शाहू आघाडीचे राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा विजय झाला.
Powered By Sangraha 9.0