नाशिकच्या ‘ममदापूर संवर्धन राखीव क्षेत्रा’त गवताळ अधिवासाच्या निर्माणाचे लक्षणीय काम करणारे वनरक्षक गोपाळ हरगांवकर यांच्याविषयी...
गवती कुरणांचा विकास, असे म्हटल्यावर वन विभागात पहिले नाव येते ते म्हणजे वनरक्षक गोपाळ राजाराम हरगांवकर. गेल्या 12 वर्षांपासून वन विभागात कार्यरत असणार्या या वनरक्षकाने वनसंपत्तीच्या अवैध वाहतुकीवर रोख, वन्यजीव बचाव, वन्यजीव शिकारीवर रोख आणि गवती कुरणांचा विकास या परिघात लक्षणीय काम केले आहे. विशेष करुन ’ममदापूर संवर्धन राखीव क्षेत्रा’तील गवताळ अधिवासाच्या निर्मितीच्या कामात त्यांनी आपली छाप सोडली आहे.
गोपाळ यांचा जन्म दि. 15 फेब्रुवारी 1991 रोजी निफाड तालुक्यातील लासलगाव येथे झाला. घरची परिस्थिती तशी बेताची होती. मोलमजुरीवरच हरगांवकर कुटुंबीयांचे गाडे हाकले जात होते. गोपाळ यांना लहानपणापासून क्रीडाक्षेत्राची आवड होती. धावण्यामध्ये त्यांना विशेष रस होता. त्यामुळे वेगवेगळ्या मॅरेथॉनमध्ये ते सहभागी होत असत. कला शाखेतून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. धावण्याची आवडच त्यांना वन विभागाच्या भरतीमध्ये फायदेशीर ठरली. 2011 सालच्या वन विभागाच्या भरती प्रक्रियेत ते सहभागी झाले. एक तास आणि 40 मिनिटांमध्ये 25 किमी अंतर धावल्याने त्यांची नेमणूक पक्की झाली. दि. 23 डिसेंबर 2012 रोजी ते वन विभागात ‘वनरक्षक’ या पदावर रुजू झाले. त्यांची पहिली नियुक्ती नाशिक पश्चिम वन विभागाच्या बार्हे वनपरिक्षेत्रामध्ये झाली आणि पुढील सात ते आठ वर्षे त्यांनी या क्षेत्रात धडाडीची कामगिरी केली.
गोपाळ यांनी 2012 ते 2018 या काळात बार्हे आणि ठाणगाव या दोन नियतक्षेत्रांमध्ये ‘वनरक्षक’ म्हणून काम केले. हा संपूर्ण प्रदेश गुजरातच्या सीमावर्ती भागाला लागून आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात खैर आणि सागाची अवैध तस्करी होत असे. महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असलेल्या राक्षसभुवन नाका येथे वनरक्षक राक्षसभुवन नाका म्हणून कार्यरत असताना त्यांनी दिवसरात्र गस्त केली. मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतुकीस आळा घालण्याचे काम केले. राक्षसभुवन हे गाव सीमावर्ती भागात असल्यामुळे त्यावेळी तिथे कुठल्याही प्रकारचे नेटवर्क नसायचे. या परिस्थितीमध्ये वळोवेळी ठिकठिकाणी रात्री नाकाबंदी करून त्यांनी संरक्षणाचे काम केले. गुजरात या राज्यात जाऊन चोरटी तूट करुन अवैध वाहतूक नेमकी कोणत्या भागात होत आहे, हे शोधकार्य करून माहिती मिळवली.
ठाणगाव नियतक्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांनी नियमित गस्त करून नाकाबंदी करून अवैध वाहतुकीस आळा घालण्याचे काम केले. गुजरात या राज्यात जाऊन तेथील नाक्यांवरील कर्मचार्यांसोबत अवैध वाहतूक, चोरटी तूट याबाबत चर्चा करुन त्यावर उपाययोजना करुन अवैध वाहतुकीस आळा घालण्यासाठी लोकांशी संपर्क साधून गुप्तचरांचे जाळे तयार केले. ठाणगाव या गावात ‘संयुक्त वन व्यवस्थापन समिती’ अंतर्गत स्व्यंपाक गॅसवाटप करण्यात आले. श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्यात आले. तसेच, नियतक्षेत्रात ‘जलयुक्त शिवार योजने’ची कामे केली. त्यामुळे मौजे काहांडोळचोंड हे गाव सध्या टँकरमुक्त झालेले आहे. ही सर्व कामे झाल्यामुळे तेथील ग्रामस्थांना गावातच रोजगार उपलब्ध झाला. या दोन्ही नियतक्षेत्रात काम करताना गोपाळ यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने साग आणि खैराची अवैध वाहतूक करणार्या आठ ते नऊ गाड्या पकडल्या. त्या माध्यमातून साधारण 600 ते 700 नग म्हणजेच 40 ते 45 घनमीटर एवढा माल जप्त करुन शासनाला सुपुर्द केला. या कामाची पोचपावती 2018 साली गोपाळ यांना मिळाली. तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते त्यांना उत्कृष्ट कामागिरीबद्दल सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले.
2018 साली गोपाळ यांची बदली येवला वनपरिक्षेत्राअंतर्गत येणार्या ’ममदापूर संवर्धन राखीव’मधील राजापूर नियतक्षेत्रामध्ये झाली. तेव्हापासून गोपाळ ‘ममदापूर संवर्धन क्षेत्रा’च्या संरक्षणासाठी कार्यरत आहेत. राजापूर येथे कार्यरत झाल्यावर त्यांना वन्यजीव रक्षणासाठी संघर्ष करावा लागला. पाण्याच्या कमतरतेमुळे संवर्धन राखीव क्षेत्रातील काळवीट हे वनक्षेत्राबाहेर भटकायचे. अशा वेळी रस्ते अपघातामध्ये त्यांच्या मृत्यू व्हायचा. म्हणून गोपाळ यांनी गावकर्यांच्या मदतीने श्रमदानामधून वनक्षेत्रात पाणवठे तयार केले. अवैध वाळू आणि गारगोटी तस्करी व घोरपड, काळवीट अशा प्राण्यांच्या शिकारीवर रोख लावला. मांडूळ तस्करीचा तपास करताना 23 आरोपींना पकडले. त्यामधील काही आरोपी हे पोलीस, इंजिनिअर आणि शिक्षक होते. वन्यजीव बचावकार्यातून त्यांनी विहिरीत पडलेल्या साधारण 200 ते 300 काळवीटांचा बचाव करुन त्यांना जीवदान दिले आहे.
2021 सालापासून ते ममदापूर नियतक्षेत्रामध्ये काम करत आहे. गवती कुरण विकासासाठी आता गोपाळ हरगांवकर हे नाव ओळखले जाते. कारण, संवर्धन राखीव क्षेत्रात गवती कुरण विकासाचे लक्षणीय काम गोपाळ यांनी आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आणि सहकार्यांच्या मदतीने केले आहे. मातीपरीक्षण, रोपवाटिका निर्माण, गवत प्रजातींची निवड, गवत लागवड अशा प्रक्रिया पूर्ण करुन त्यांनी 150 ते 200 हेक्टर क्षेत्रावर गवती कुरणांचा विकास केला आहे. परिणामी, संवर्धन राखीव क्षेत्रात तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढवण्याबरोबरच लांडग्यासारख्या संकटग्रस्त शिकारी प्राण्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. यादरम्यानच्या काळात गोपाळ यांनी कृषी या विषयातूनही आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. ते गवती कुरण विकासासंदर्भात लोकांना मार्गदर्शनही करत आहेत. त्यांना पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून खूप शुभेच्छा!