मुंबई : एनडीए आणि महायूतीचे प्रमुख म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा निर्णय आम्हाला मान्य आहे, असे मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केले आहे. विधानसभा निवडणूकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार, अशी चर्चा सुरु असताना बुधवार, २७ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत शिंदेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
एकनाथ शिंदे म्हणाले की, "मी मोकळ्या मनाचा माणूस आहे, ताणून धरणारा नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला आणि सांगितलं की, सरकार बनवताना तुम्हाला माझ्यामुळे कुठली अडचण आहे हे मनात आणू नका. तुम्ही आम्हाला अडीच वर्षे संधी दिली. त्यामुळे आता तुम्ही तुमचा निर्णय घ्या. एनडीए आणि महायूतीचे प्रमुख म्हणून तुमचा निर्णय आमच्यासाठी अंतिम आहे. तसेच अमित शाह साहेबांना फोन करून मी माझ्या भावना सांगितल्या. महायूती मजबूत आहे आणि आपल्याला पुन्हा काम करायचे आहे. राज्याला विकासाकडे न्यायचे आहे," असे ते म्हणाले. तसेच उद्या महायूतीच्या तिन्ही नेत्यांची अमित शाहांसोबत बैठक असून योग्य तो निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, "विधानसभेचा विजय हा सर्वात मोठा विजय आहे. गेल्या अनेक वर्षांत न पाहिलेला हा विजय आहे. गेल्या अडीच वर्षात महायूतीने केलेली कामे आणि लोकांनी दाखवलेला हा विश्वास आहे. महाविकास आघाडीने थांबवलेली कामे आम्ही पुढे नाही. विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घातली. त्यामुळे हा जनतेचा विजय आहे. महायूतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या निवडणूकीत प्रचंड काम केले. मी कायम मुख्यमंत्री म्हणून नाही तर कॉमन मॅन म्हणून काम केले. मी एका शेतकरी कुटुंबातील आल्याने सर्वसामान्यांच्या वेदना पाहिलेल्या आहेत. सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना या वेदना कळणार नाही. त्यामुळे मला संधी मिळाल्यावर महायूती सरकारच्या माध्यमातून सर्व घटकांसाठी काम केले. या अडीच वर्षांच्या काळात आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे गेलो. आनंद दिघे साहेबांची शिकवण आमच्या पाठीशी होती आणि केंद्रातून पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांचे पूर्ण पाठबळ होते. त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देईल."
"अडीच वर्षाच्या काळात राज्याच्या प्रगतीचा वेग वाढण्याचे कारण हे राज्य आणि केंद्रात असलेले समविचारी सरकार हे कारण आहे. या कारकिर्दीत मी समाधानी आहे. आम्ही घेतलेले निर्णय ऐतिहासिक आहेत. कधीही कुठल्याही सरकारने एवढे मोठे निर्णय घेतले नव्हते. आम्ही राज्य पहिल्या नंबरवर नेण्याचे काम केले. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना राज्य पुढे होते. पण मागच्या अडीच वर्षात राज्य तिसऱ्या नंबरवर गेले. त्यानंतर आम्ही पुन्हा सहा महिन्यात राज्याला पुढे आणले. या निवडणूकीत केवळ आमच्या कामांमुळे मतांचा वर्षाव झाला," असेही ते म्हणाले.