नागपूर : महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर अविश्वास दाखवून मतदारांचा अपमान केला जात आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. बुधवार, २७ नोव्हेंबर रोजी कोराडी(नागपूर) येथील जनसंपर्क कार्यालयात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "महायुती सरकार उत्तम काम करू शकते हा विश्वास असल्याने महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेने मते दिली. महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर अविश्वास दाखवून मतदारांचा अपमान केला जात आहे. लोकसभेच्या पराभवाचे आम्ही आत्मचिंतन केले, त्यातून शिकलो, पुढे गेलो आणि जिंकलो. जनतेने डबल इंजिन सरकारला मते दिली आहेत. जनतेने मविआचा करेक्ट कार्यक्रम केला आणि ४४० व्होल्टचा करंटही दिला," असा टोला त्यांनी लगावला.
हे वाचलंत का? - मोदी-शाहांचा निर्णय मला मान्य : एकनाथ शिंदे
ते पुढे म्हणाले की, "नांदेडच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला, त्याठिकाणी ईव्हीएम चांगली होती का? महाराष्ट्रातील मतदारांनी महायुती सरकारच्या योजनांना मत दिले आहे. आमचे सरकार उत्तम काम करू शकते, असा जनतेचा विश्वास आहे, म्हणूनच हा जनादेश मिळाला आहे. लोकसभेत मविआचे खासदार निवडून आले, तेव्हा ईव्हीएम चांगली होती. सध्या महाविकास आघाडीवाल्यांना झोप लागत नाही. त्यांना जेव्हा झोप लागायला लागेल तेव्हा ते शांत होतील. त्यामुळे महाविकास आघाडीच्या लोकांनी तोंडाच्या वाफा काढण्यापेक्षा आपली मते का कमी झाली याचे चिंतन करावे."
लवकरच महायुतीचा मुख्यमंत्री शपथ घेणार!
भाजपच्या प्रत्येकाला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते. महायुतीतील मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांची त्यांचे नेते मुख्यमंत्री व्हावेत, अशी ईच्छा आहे. यावर तिन्ही पक्षाचे नेते बसून निर्णय घेतील. केंद्रीय नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयावर भाजपाचा कार्यकर्ता कधीच नाराज होत नाही. त्यांचा निर्णय अंतिम असतो. पक्षाचे नेते योग्य निर्णय घेतात. लवकरच महायुतीचा मुख्यमंत्री शपथ घेणार आहे. उद्धव ठाकरेंनी जेव्हा भाजपासोबत बेईमानी केली, तेव्हा त्यांना सरकार बनवण्यासाठी दीड महिना लागला होता," असाही टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला आहे.