मुंबई (विशेष प्रतिनिधी) - 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) रविवार दि. २४ नोव्हेंबर रोजी 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त केलेल्या पक्षीगणनेमध्ये ७२ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे (
BNHS SGNP Bird Count). सकाळच्या सत्रात केवळ काही तासांसाठी पार पडलेल्या पक्षीनिरीक्षणाद्वारे ७२ प्रजातींची नोंद होणे ही राष्ट्रीय उद्यानाची जैवविविधता अधोरेखित करते. (
BNHS SGNP Bird Count)
'बीएनएचएस'कडून 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त दीर्घकालीन पक्षीगणनेचे काम सुरू आहे. 'सिटीझन सायन्स' उपक्रमाच्या धर्तीवरील या प्रकल्पाअंतर्गत पक्षीनिरीक्षक आणि निसर्गप्रेमी नागरिक मिळून पक्षीगणनेचे काम करतात. या गणनेअंतर्गत राष्ट्रीय उद्यानात आढळणाऱ्या पक्ष्यांची अद्यावत यादी तयार करण्यात येत आहे. दर महिन्याला पक्षी गणनेचे काम केले जाते. या महिन्यात हा उपक्रम २४ नोव्हेंबर रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यामध्ये पार पडला. यामध्ये ४७ स्वयंसेवक पक्षीनिरीक्षकांनी सहभाग नोंदवला होता.
या गणनेअंतर्गत पक्ष्यांच्या एकूण ७२ प्रजातींची नोंद करण्यात आली. माशीमार (फ्लायकॅचर) पक्ष्यांच्या सहा प्रजाती, वटवट्या (वॅबलर) पक्ष्यांच्या पाच प्रजाती आणि हळद्याच्या (ओरिअल) व सुतार पक्ष्याच्या प्रत्येक तीन प्रजातींची नोंद करण्यात आली. तसेच फार क्वचितच दिसणाऱ्या रान धोबी या पक्ष्याची देखील नोंद करण्यात आली. या सारख्या उपक्रमामधून नोंदविण्यात येणारी पक्ष्यांची जैवविविधता ही पुढील संशोधनाला बळकटी देण्याबरोबरच लोक आणि निसर्ग यांच्यातील सखोल संबंध वाढवण्यासाठी मदत करत असल्याचे मत 'बीएनएचएस'चे संचालक किशोर रिठे यांनी मांडले आहे. यासारखे उपक्रम आपल्या नैसर्गिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी लोकांना प्रेरणा देतात. त्यामुळे लोकांनी या उपक्रमामध्ये सहभागी होऊन संवर्धनासाठी मदत करण्याचे आवाहन रिठे यांनी केले आहे