विधानसभेला उद्धव ठाकरे कुठे फसले?

26 Nov 2024 20:22:05

uddhav thackeray



मुंबई, दि.२६ :
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची ऐतिहासिक हार झाली. तर महायुती, भाजपाची त्सुनामी आली. या भगव्या लाटेत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला त्यामुळे आता महायुती दिमाखात सत्तेत परत येतेय. 'माझा पक्ष चोरला, माझ्या वडिलांचं नाव चोरलं आता जनताच आम्हाला न्याय देईल. निवडणुकांचं ठरवेल की खरी शिवसेना कोण?' असा आत्मविश्वास बाळगून विधानसभा निवडणुकांत भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवर तोंडसुख घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांना या निवडणुकांत केवळ २० जागांवर समाधान मानावे लागले.

विधानपरिषद नेत्यांनी हातात घेतलेली पक्ष संघटना

२०१९च्या निवडणुकांनंतर तयार झालेल्या महाविकास आघडीमुळे शिवसेनेतील नाराज आमदारांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून वेगळी भूमिका घेत ठाकरेंशी काडीमोड घेतला. यावेळी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारत आपणच खरी शिवसेना आहोत हे न्यायालय, निवडणूक आयोग आणि आता जनतेच्या दरबारातही सिद्ध केले. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी जोडलेला आणि जमिनीवर कार्यरत असणारे कार्यकर्ता ते नेता असा प्रवास असणारे तळागाळातील नेत्यांनी शिंदेंसोबत जाण पसंत केलं. अशावेळी विधानपरिषदेवर आमदार असणारे अनिल परब, अंबादास दानवे, सचिन अहिर अशा नेत्यांनी पक्षसंघटना हाती घेतली. या आमदारांनी आपल्या भागातील प्रचारावर आणि उमेदवारांवर भर दिलाच मात्र राज्यातील इतर पारंपरिक गड भेदणारे नेतृत्वच शिल्लक न राहिल्याने पक्षसंघटना बांधणी उत्तम असूनही ठाकरेंना पराभवाचा सामना करावा लागला.


वाचाळवीरांचा भोवलेला वाचाळपणा


रोज सकाळी माध्यमांसमोर येत बोलणारे शिवसेना उबाठा सेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे रोजच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. सातत्याने शिंदे आणि भाजपवर तोंडसुख घेत संजय राऊत यांनी माध्यमांसमोर अनेकदा शिवीगाळ केल्याचे देखील जनतेने पाहिले. यात दुसरे नाव उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचे देखील नाव आवर्जून घेतले जाते. याच सुषमा अंधारे यांनी काही वर्षांपूर्वी हिंदू देवी देवता यांचा अपमान केला, इतकेच नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही या सुषमा अंधारे यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जात टीका केलेली आहे. असा हिंद्त्वाविरोधी चेहरा ठाकरेंचा स्टार प्रचारक होता. हे पाहता तळागाळातील निष्ठावंत शिवसैनिक, बाळासाहेबांची शिवसेना आणि विचारसरणी मानणारा मतदार दुखावला ज्याचा फटका ठाकरेंना निवडणूक निकालात बसला.


उद्धव ठाकरेंचा अतिआत्मविश्वास आणि कार्यकर्त्यांमध्ये गाफीलता


लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या यशाचे श्रेय आपल्या नावावर खपवत आणि जनता आता आपल्याच पाठीशी असल्याचा उद्धव ठाकरे यांचा अतिआत्मविश्वास त्यांच्या प्रचारसभेतील प्रत्येकच भाषणातून दिसून आला. 'मी एकटा पडलो, माझा पक्ष चोराला, पक्षचिन्ह चोरलं, माझे वडीलही चोरले', असे म्हणत जनेतला भावनिक साद घालण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला. लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला तसाच विजय आता विधानसभेला आपल्याला मिळणार, विशिष्ट समुदायाची मतंही आता आपल्याच बाजूने आहेत, मराठा मतही आपल्याच बाजूने आहेत असा आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांमध्येही पसरविला. त्यामुळे गाफील कार्यकर्त्यांनीही प्रचाराऐवजी आलीच सत्ता येणार या अभिर्भावात होते.


निवडणूक प्रचारातील अर्थहीन मुद्दे

उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ हा बुलेट ट्रेन प्रकल्पाला विरोध, जलयुक्त शिवार योजनेला ब्रेक, मेट्रो ३ आणि इतर कारशेडच्या जागांमध्ये घोळ आणि प्रकल्पाना रोख लावण्याची वृत्ती जनतेने महाविकास आघाडीच्याकाळात अनुभवली. इतकेच नाहीतर हिंदूंविरोधाला खतपाणी घालत विशिष्ट समाजाचे लांगुलचालन, पालघरमध्ये साधूंचे मॉब लिंचिंग आणि उद्धव ठाकरेंचे मौनही या पराभवाचे कारण आहे. याउलट महायुतीच्या २ ते सव्वा दोन वर्षांच्या कार्यकाळातील विकास प्रकल्प, विकास योजना हे महायुतीच्या अजेंड्यावरील विषय होते. या विकास प्रकल्पांविरोधातील ठाकरेंचा रीऍक्टिव्ह अजेंडाच उद्धव ठाकरेंच्या अपयशाचे कारण ठरला.


ठाकरेंचा काँग्रेसवर असणारा अनावश्यक भरोसा


सोलापूर दक्षिण मतदारसंघात ऐनवेळी खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे या मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी दिलेले उमेदवार अमर पाटील यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले. हे तर केवळ एक उदाहरण आहे,असे चित्र अनेक मतदारसंघात आणि जिल्ह्यात दिसून आले. भाजप सोबत महायुतीत असताना शिवसेनेचे पक्षसंघटन अतिशय मजबूत बांधले गेले होते. त्यामुळे नंतरच्या काळातही शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवतानाही आपले गड अभेद्य ठेवले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने अनेक जागांवर शिवसेनेच्या या संघटनात्मक बांधणीच्या आधारावरच विजय मिळविला. मात्र, विधानसभा निवडणुकात मात्र मुख्यंमत्रीपदाच्या चुरसेमध्ये उद्धव ठाकरेंनी दिलेल्या उमेदवारांच्या प्रचारात काँग्रेसने तितकासा रस दाखविला नाही. याचाच फटका काँग्रेसच्या भरोश्यावर बसलेल्या उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना बसला.


Powered By Sangraha 9.0