माहिती आणि लघुपटांना आर्थिक पाठबळ मिळाले तरच त्यांचे भवितव्य उज्ज्वल : उषा देशपांडे
26-Nov-2024
Total Views |
पणजी : ५५वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू असून यंदा ‘नॉन फिचर चित्रपट समिती’ने जगभरातील उत्तम चित्रपटांची निवड केली आहे. या चित्रपट समितीचे अध्यक्ष राष्ट्रीय पुरस्कार विजेते वाईल्ड लाईफ फिल्म मेकर सुबैय्या नल्लामुथू असून त्यांच्या अध्यक्षतेखाली निर्माते, दिग्दर्शक, लेखक असणार्या दहाजणांची टीम कार्यरत होती. त्यापैकी गेल्या 3० वर्षांपासून स्वतंत्र दिग्दर्शिका म्हणून कार्यरत असणार्या समितीच्या सदस्य उषा देशपांडे ( Usha Deshpande ) यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने संवाद साधला. यावेळी उषा यांनी सध्याच्या भारतीय फिचर चित्रपटसृष्टीच्या झगमगाटात नॉन फिचर चित्रपटांनाही महत्त्व मिळाले पाहिजे आणि माहिती व लघुपटांना योग्य आर्थिक पाठबळ मिळाले, तरच त्या टिकू शकतात, अशी सत्य परिस्थिती त्यांनी मांडली.
आजही माहितीपट आणि लघुपट पाहणारा प्रेक्षकवर्ग आणि तयार करणारा कलाकारांचा समूह अस्तित्वात आहे. मात्र, तरीही या दोन्ही चित्रपट माध्यमांच्या अडचणी मांडताना उषा म्हणाल्या की, “माहितीपट आणि लघुपट ही दोन्ही चित्रपट माध्यमे इतर माध्यमांपेक्षा जरा मागे पडली आहेत. सध्या भारतीय चित्रपटसृष्टीत भविष्यात आपण ओळखले जावे, यासाठी पहिली पायरी म्हणून बरेच दिग्दर्शक सुरुवातीला लघुपट दिग्दर्शित करतात. कारण, निर्मात्यांना आपली गुणवत्ता दाखवण्यासाठी स्वखर्चातून आपली कला दाखवण्याचा लघुपट हा एकमेव मार्ग त्यांच्याकडे असतो. कारण, लघुपटात दहा ते १२ मिनिटांमध्ये योग्य कथानक मांडण्यास दिग्दर्शकाला यश मिळाले, तरच भविष्यात त्यांना फिचर चित्रपटांचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळते. मात्र, चित्रपटविश्वात माहिती आणि लघुपटांकडेही फार गंभीरपणे पाहण्याची गरज असून अशा पद्धतीचे चित्रपट पाहणारा ठराविक प्रेक्षकवर्ग आजही असल्यामुळे सरकारने आणि कलाकारांनीही पाठबळ देत लघुपट आणि माहितीपटांना प्रोत्साहन देण्याची नितांत गरज आहे.”
यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी नॉन फिचर चित्रपटांची निवड कशी करण्यात आली, असे विचारले असता उषा देशपांडे म्हणाल्या की, “५५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी यंदा ‘नॉन फिचर चित्रपट समिती’च्या आम्ही सर्व सदस्यांनी २५० चित्रपट पाहिले. जगभरातून आलेल्या सर्वच चित्रपटांना योग्य न्याय मिळाला पाहिजे, हा एकमेव दृष्टिकोन आमच्या डोळ्यांसमोर असल्याकारणामुळे आमच्या टीमचे प्रमुख अध्यक्ष सुप्रसिद्ध वाईल्डलाईफ फोटोग्राफर सुबैय्या नल्लामुथ्थू यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दहा सदस्यांनी सर्व चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकाला आवडलेल्या चित्रपटांची यादी केली आणि मग त्यातून एकूण २० चित्रपटांची निवड करण्यात आली.
यावर्षी विविध विषयांवर आधारित नॉन फीचर चित्रपट पाहायला मिळाले. मात्र, प्रामुख्याने स्त्रीसशक्तिकरणावर भाष्य करणारे अधिक चित्रपट बर्याच दिग्दर्शक-कलाकारांनी हाताळालेले पहायला मिळाले. त्याव्यतिरिक्त तृतीयपंथी समाजाच्या अडचणीदेखील यावेळी कथानकांमधून मांडण्यात आल्या होत्या. सामाजिक भान आणि ठराविक समाजाबद्दल जनजागृती करणारे विषय फार संवेदनशीलपणे हाताळताना नवोदित दिग्दर्शक, निर्माते, कलाकार आणि तंत्रज्ञानांची पिढी दिसल्याकारणामुळे नॉन फीचर किंवा वास्तवदर्शी चित्रपटांचे भवितव्य आता योग्य हातात असल्याची जाणीवही झाली,” असे त्या म्हणाल्या.
पुढे उषा यांनी म्हटले की, “लघुपट आणि वास्तववादी चित्रपटनिवडीचे निकष हे दिग्दर्शकाने कथेची मांडणी कथेलाच अनुसरून केली आहे का, तसेच कथा आणि पात्र यांचा मेळ आहे का आणि दिग्दर्शकाला कथामांडणीचे गांभीर्य सांभाळता आले आहे का, या पैलूंवरही विचार करून २५० पैकी २० चित्रपटांची निवड करण्यात आली. कारण ज्यावेळी ५५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारख्या व्यासपीठावर चित्रपटांना निवड करून पुढे पाठवायचे असते, त्यावेळी पात्र कलाकृतींनाच जागतिक स्तरावर योग्य दर्जा मिळवून देण्याची प्राथमिक जबाबदारी आम्हा ‘नॉन फिचर चित्रपट समिती’च्या सदस्यांची म्हणजे सगळ्या दिग्दर्शक-निर्माते-कलाकार-लेखक यांची असते. त्यामुळे कथा, कथेनुसार त्याची मांडणी, त्यालाच अनुसरून तंत्रज्ञानाचा अचूक वापर आणि जोड आणि सोबतच अभिनय या सगळ्याची सांगड उत्तम जुळलेल्या कलाकृती महोत्सवात सादर करण्यात आल्या.”
मुंबईसह इतर शहरांमधील प्रगल्भ प्रेक्षकांपर्यंत कोणत्या पद्धतीचे चित्रपट सादर व्हावे, असे विचारले असता उषा देशपांडे म्हणाल्या की, “यावर्षी ‘इफ्फी’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्यासपीठावर इंडियन पॅनोरमामध्ये जागतिक स्तरावरील कलाकारांसमोर सादर करण्यात आलेले अर्थपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण निवडक चित्रपट केवळ गोव्यापुरतेच सीमित न ठेवता, मुंबई, पुणे आणि देशभरातील अन्य मोठ्या शहरांमधील चित्रपटगृहांमध्ये हे चित्रपट वारंवार दाखवले गेले, तरच नवा प्रेक्षकवर्ग तयार होण्यास मदत होईल आणि विविध विषय हाताळणार्या दिग्दर्शक, लेखक आणि चित्रपटाची संलग्न इतर कलाकार मंडळींना ओळखही मिळेल. कारण, नॉन फिचर चित्रपटांना फारसे महत्त्व अजूनही दिले जात नसल्यामुळे त्यांनाही एक संधी विशेष स्क्रिनिंगमुळे नक्की मिळेल, अशी आशा आणि अपेक्षा आहे.”