दुचाकी परवान्यासाठी आरटीओच्या सिम्युलेटर मशीनवर सरावाची संधी

26 Nov 2024 19:05:12
RTO

ठाणे : दुचाकी चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या आरटीओच्या ( RTO ) परीक्षेत अनेकजण गर्भगळीत होतात. या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या चालकांसाठी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी सिम्युलेटर कक्ष निर्माण करण्यात आला असून शिकाऊ दुचाकीस्वार या सिम्युलेटरवर सराव करीत आहेत. युनायटेड वे मुंबई आणि एव्हियन्स यांच्या माध्यमातून गेल्या सव्वा वर्षात १३७५ दुचाकीस्वारांनी सिम्युलेटर मशीनवर दुचाकी चालवण्याचे प्रशिक्षण घेतलं आहे.

ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे रस्ता दुचाकी सिम्युलेटर कक्ष ऑगस्ट २०२३ मध्ये सुरू करण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षात येणाऱ्या दुचाकीस्वाराला सिम्युलेटर मशीनची योग्य ती माहिती दिली जात आहे. सिम्युलेटरमुळे दुचाकी चालवताना आपले दोष काय आहेत हे समजण्यासाठी मदत मिळते. दुचाकी स्वाराने वाहतुक नियमानुसार गाडी चालविणे अपेक्षित आहे. रस्त्यावरील सिग्नल, खुणा, वेग मर्यादा, आदी सर्व गोष्टींचा अभ्यास करून टेस्ट ड्राईव्हची परीक्षा देणे उत्तम असते. मात्र परीक्षेत वाहन चालविताना चुका घडतात आणि चालकाला अनुत्तीर्ण केले जाते. मात्र हे टाळण्यासाठी सिम्युलेटर मशीन महत्वाचा दुवा ठरत असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली.

सिम्युलेटर मशीनवर सर्व मांडणी दुचाकीसारखी आहे. केवळ संगणकीय स्क्रीन बघून वाहन चालवायचे आहे. यात एक्सलेटर, गियर, आदी सर्व असून स्क्रीनवर दिसणारे रस्ते, चौक, सिग्नल, नागमोडी वळण, खड्डे, पाऊस, शाळा, रुग्णालय, धुके आदी सर्व दाखविले आहे. शहर/महामार्ग, कमी जास्त गर्दी, विविध प्रकारचे हवामान, विविध प्रकाशयोजना, पाऊस, धुके, इ. प्रकारची परिस्थिती संगणकात निर्माण करता येते. ज्याद्वारे विविध परिस्थितीत वाहन चालविण्याचा सराव अथवा चाचणी घेता येते. शेवटी संगणकीय चाचणीचा निकाल देखील स्क्रीनवर दिसतो.

रोहित काटकर (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी)

सिम्युलेटर मशीनवर दुचाकी चालविण्याचा अनुभूती मिळते. या सिम्युलेटर सिग्नल, रस्ते, नागमोडी वळण, पाऊस, गतिरोधक आदी सर्वांचा समावेष करण्यात आला आहे.यामुळे चालकांना दुचाकी चालविताना दोष समजणार आहेत.

Powered By Sangraha 9.0