रोहित अ‍ॅण्ड नाटक कंपनी

26 Nov 2024 21:34:48
rohit pawar election drama

 
सगळी निवडणूक एकीकडे आणि रोहित पवारांची ड्रामेबाजी भलतीकडे. सत्तेत बसण्याचे स्वप्न भंग झाल्यामुळे शरद पवारांचे नातू संयमितपणा सोडून मनाला वाटेल तसे वागत आहेत. त्यांच्या वागण्यावर कुणाचे नियंत्रण नाही आणि असूही नये. मात्र, कुठूनतरी आलेल्या फशीव माहितीवर लागलीच ‘ट्विट’ किंवा ‘फेसबुक पोस्ट’ टाकून मोकळे व्हायचे, हा कित्ता गिरवणे त्यांनी अद्याप सोडलेले नाही. अवघ्या 1 हजार, 243 मतांनी रोहित पवार कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडून आले आहेत. भाजपच्या प्रा. राम शिंदे यांच्याविरोधात त्यांना रडतखडत विजय मिळवता आला. मात्र, इतका निसटता विजय झाल्यानंतर त्यावर चिंतन करण्याऐवजी रोहित पवार कार्यकर्त्यांकडून आलेल्या ईव्हीएमविरोधी पोस्ट समाजमाध्यमांवर डकवत आहेत. ‘गुजराती ईव्हीएमच्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली का,’ असे विचारत त्यांनी नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांना मिळालेली मते जवळपास सारखीच कशी, असा खुळचट प्रश्न विचारला आहे. हा प्रश्न नक्कीच विचार करायला भाग पाडतो, आयोग नेमके काय लपविण्याचा प्रयत्न करत आहे? की लोकशाहीला उद्ध्वस्त करण्याचा विडा आयोगाने उचलला आहे? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे राज्यातील सामान्य जनतेला हवी आहेत, अशी मागणीही रोहित पवारांनी केली. आता नाशिक जिल्ह्यातील मतदारसंघाचा विचार केला, तर एकाही ठिकाणी सारखी मते कोणत्याही उमेदवाराला पडलेली नाहीत. शिवसेनेच्या सुहास कांदे यांना 1 लाख, 38 हजार आणि दादा भुसे यांना 1 लाख, 58 हजार, 284 मते पडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माणिकराव कोकाटे 1 लाख, 38 हजार, 565, नरहरी झिरवाळ 1 लाख, 38 हजार, 622, छगन भुजबळ 1 लाख, 35 हजार, 033, हिरामण खोसकर 1 लाख, 17 हजार, 575, नितीन पवार 1 लाख, 19 हजार, 191, दिलीप बनकर 1 लाख, 20 हजार, 253 मते पडली. यातील एकाही ठिकाणी सारखी मते नाहीत, हे शाळकरी मुलगाही सांगेल. विधानसभेत मतदारसंघ लोकसभेच्या तुलनेत लहान असतो. मात्र, रोहित पवार यांना हे समजून घ्यायचे नाही. ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे रोहित पवार स्वतः ईव्हीएमच्या माध्यमातून विजयी झाले आहेत, हे ते फार लवकर विसरले.

नानांचा लाजिरवाणा विजय


बड्या बड्या बाता मारणार्‍या आणि निकालापूर्वीच मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणार्‍या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पराभव होता होता राहिला. मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही असणार्‍या पटोलेंचे निकाल लागल्यानंतर विधानभवनात पाऊल टाकायचेही वांदे होतात की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, अखेरीस नाना पटोले अवघ्या 208 मतांनी विजयी झाले. अगदी काठावर झालेला हा विजय काँग्रेससहित महाविकास आघाडीची महाराष्ट्रात काय स्थिती आहे, हे स्पष्ट करतो. पटोले यांना भाजपच्या अविनाश ब्राह्मणकर यांनी कडवी झुंज दिली. मागील 25 वर्षांपासूनचे त्यांचे या मतदारसंघावर वर्चस्व असले, तरी ते यंदा मोडीत निघता निघता राहिले. पटोले यांचा हा विजय म्हणण्याऐवजी ‘लाजिरवाणा विजय’ म्हणावा लागेल. कारण, काँग्रेस प्रदेशाध्यक्षालाच विजयासाठी इतकी झुंज द्यावी लागत असेल, तर राज्यातील अन्य उमेदवारांविषयी न बोललेलेच बरे! बरं, काठावर विजय मिळाल्यानंतर त्यांना हायकमांडने दिल्लीला बोलवले. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेण्यासाठी गेले असताना त्यांना गेटवर स्वतःचे नाव सांगावे लागले. म्हणजेच, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाला महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याचा प्रदेशाध्यक्ष भेटण्यासाठी येत आहे, इतकी साधी माहितीही नसावी. यावरूनच काँग्रेसचा सावळा गोंधळ सुरू असतो, याची प्रचिती येते. नानांसहित बाळासाहेब थोरात यांनाही पराभव पाहावा लागला. तिवसात दादागिरी रूजवणार्‍या यशोमती ठाकूर यांनाही जनतेने घरी बसवले. एकूणच नाना पटोले मात्र पराभव होण्यापासून अगदी थोडक्यात बचावले. लोकसभेतील यशानंतर नाना हुरळून गेले. साकोली मतदारसंघात तर भेट देणेही दुर्मिळ झाले. फक्त गोड बोलायचे आणि खांद्यावर हात ठेवत फोटो काढायचा, या स्टाईलने विजय मिळवता येतो, हा त्यांचा भ्रमही एव्हाना दूर झाला असेल. काँग्रेसच्या पराभवाचे चिंतन करण्याऐवजी सर्वप्रथम नानांनी आधी स्वतःच्या पराभवावर चिंतन करायला हवे. शेतकर्‍यांचे प्रश्न, बेरोजगारी, विकासकामांचा अभाव अशा अनेक प्रश्नांभोवती निवडणूक लढली गेली. त्यातून साकोलीकरांनी नानांना आता शेवटचा इशाराच दिला आहे जणू.... नाना सावध व्हा, अन्यथा आता झालेला लाजिरवाणा विजय पुढील निवडणुकीत लाजिरवाणा पराभव म्हणून ओळखला जाईल.



Powered By Sangraha 9.0