रायगड जिल्हा उबाठा, शेकापमुक्त

26 Nov 2024 16:29:30
Raigad

मुंबईसह लगतच्या रायगड जिल्ह्यात एकेकाळी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना यांचे वर्चस्व होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईप्रमाणेच रायगडातील ( Raigad ) शिवसेनेकडे लक्ष होते. ए. आर. अंतुले यांच्या रुपाने काँग्रेसला रायगड जिल्ह्यातील मुख्यमंत्री लाभले. तर, शेकापही राज्यात सक्षम विरोधी पक्ष म्हणून नावाजला होता. मात्र, दशकभरापूर्वीच काँग्रेसचे अस्तित्व संपले असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शेकाप आणि उबाठा यांना एकही जागा जिंकता आलेली नाही. त्यामुळे शेकाप, उबाठा यांच्या जनाधारालाही रायगडातून ओहोटी लागल्याचे स्पष्ट दिसते.

मुंबई : राज्याच्या राजकारणात एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा दबदबा होता. तसाच मुंबईत मराठी माणसाचा कैवारी म्हणून शिवसेनेचा आवाज होता. मुंबईलगतच्या रायगड जिल्ह्यात या दोन्ही पक्षांचे प्रस्थ होते. रायगडातील काँग्रेसचे ए. आर. अंतुले हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, तर शिवसेनेचे मनोहर जोशी हेदेखील मुळचे रायगडातील आहेत. शेकापचे अ‍ॅड. दत्ता पाटील यांच्या रुपाने विधानसभेत विरोधी पक्षाचा बुलंद आवाज होता. राज्यात रायगड हा एकेकाळी काँग्रेस आणि शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता.

मागील दशकात काँग्रेस संपुष्टात आली, तर शेकापला जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी किंवा शिवसेनेची साथ घ्यावी लागत होती. तसेच, शेकापचे जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यातून विस्तव जात नव्हते. तटकरे यांना शेकापने केलेल्या आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागला होता. तसेच, २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत पराभव होऊन शिवसेनेचे अनंत गिते विजयी झाले होते. त्यानंतर शेकापचा लोकसभेतील उमेदवारीसाठीही दावा राहिला नाही. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर सुनील तटकरेंच्या रुपाने चांगले नेतृत्व मिळाले. त्यांना कर्जतच्या सुरेश लाड यांनी साथ दिली. तटकरेंनी काँग्रेस आणि शेकापला संपवण्याचे काम केले.

शेकापला २०१९ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत राज्यात केवळ एकच जागा जिंकता आली होती. तर, रायगडात भोपळाही फोडता आला नाही. तसेच, शिवसेनेत उभी फूट पडल्याने महाडचे आ. भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. काही माहिन्यांपूर्वी विधान परिषदेच्या निवडणुकीत शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांना मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. त्यामुळे विधान परिषदेतही शेकापचा आमदार राहिला नाही. त्यामुळे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शेकापने उबाठाला मदत केली नाही.

निवडणुकीपूर्वी शेकापला अलिबागमध्ये मदत करण्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. प्रत्यक्षात मात्र शेकापने रायगडात पनवेलमधून बाळाराम पाटील, उरणमधून प्रीतम म्हात्रे, पेणमधून अतुल म्हात्रे यांना उमेदवारी दिली. तसेच, कर्जतमध्येदेखील महाविकास आघाडीविरोधात भूमिका घेतल्याने शेकाप सोबत आहे की नाही, असा संभ्रम निर्माण झाला. याबाबत उद्धव ठाकरे यांनी कर्जत येथील सभेतून जयंत पाटील यांना जाबही विचारला.

२०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत अखंड शिवसेनेचे तीन आमदार निवडून आले. मात्र, २०२२ मध्ये पक्षफुटीत त्यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली. तेव्हाच रायगडात शिवसेना उबाठाला घरघर लागली. २०२४ सालच्या निवडणुकीत भाजपचे पनवेलमधून प्रशांत ठाकूर, उरणमधून महेश बालदी आणि पेणमधून रवींद्र पाटील निवडून आले आहेत. तर, शिवसेनेचे महाडमधून भरत गोगावले, अलिबागमधून महेंद्र दळवी आणि कर्जतमधून महेंद्र थोरवे निवडून आले आहेत. तसेच, श्रीवर्धनमधून सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांनी मैदान मारले आहे. मात्र, महाविकास आघाडीत असलेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचे अस्तित्व दिसले नाही. तर उबाठाने एकाकी लढत देण्याचा जो प्रयत्न केला, तो केविलवाणा दिसला. दरम्यान, विधानसभा निकालावरून तरी काही दशकांपूर्वी अस्तित्व संपलेल्या काँग्रेसप्रमाणे शेकाप, उबाठालाही घरघर लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

Powered By Sangraha 9.0