नवी दिल्ली : (Rahul Gandhi) सावरकरांचा विचार हिंसक असून त्यामुळेच संविधानात त्यांचा विचार नाही, अशी मुक्ताफळे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवार दि. २६ नोव्हेंबर रोजी उधळली आहेत.
काँग्रेस पक्षातर्फे नवी दिल्लीतील तालकटोर स्टेडियम येथे संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी सावरकरद्वेषाची मुक्ताफळे उधळली आहेत. भाषणात राहुल गांधी म्हणाले, भारतीय संविधानात सर्व राज्यातील महापुरुषांचे विचार आहेत. मात्र, संविधानात सावरकरांचा विचार नाही. कारण, भारतीय संविधानात कोठेही हिंसेचा प्रयोग सांगितलेला नाही. त्यामुळेच संविधानात त्यांचा विचार नसल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांच्या विधानावरून पराभवातूनही त्यांनी धडा घेतला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हरियाणानंतर महाराष्ट्रानेही त्यांचा द्वेषाचा विचार नाकारला आहे. मात्र, पुन्हा एकदा राहुल गांधींचा प्रवास त्याच द्वेषाच्या मार्गाने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आणि पंतप्रधानांचा अंदाज खरा ठरला
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपुरता राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा द्वेष बाजुला ठेवला आहे. आता निवडणूक झाली असून ते पुन्हा एकदा आपला सावरकरद्वेष सुरू करतील, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ नोव्हेंबर रोजी लगावला होता. पंतप्रधानांचा हा टोला राहुल गांधी यांनी अवघ्या तीन दिवसातच खरा करून दाखवला आहे.
राहुल गांधींच्या नागरिकत्वाविषयी अहवाल द्या
राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने गृह मंत्रालयाकडून स्टेटस रिपोर्ट मागवला आहे. एस. विघ्नेश शिशिर यांच्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने गृह मंत्रालयाकडून हा अहवाल मागवला आहे. सध्या प्रक्रिया सुरू आहे, ती पूर्ण न्यायालयाला माहिती दिली जाईल, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. या जनहित याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ डिसेंबर रोजी होणार आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे युनायटेड किंगडमचे नागरिकत्व असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.