मराठीत बोलल्याने नाकारले रेल्वेचे तिकीट, .... हिंदीतच बोला, परप्रांतीय कर्मचाऱ्याची मुजोरी!

    26-Nov-2024
Total Views |

nahur
 
मुंबई : (Marathi Language)एकीकडे केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येतो तर दुसरीकडे आपल्याच मराठीबहुल महाराष्ट्रात मराठीची वारंवार गळचेपी होताना दिसते. ज्या महाराष्ट्रात अन् मुंबईत मराठी भाषा रुजली, वाढली त्याच ठिकाणी मराठी भाषेच्या अपमानाच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशातच मुंबईत पुन्हा एकदा मराठी भाषेविरोधातील संतापजनक घटना समोर आली.
 
या घटनेत मुंबईतील एका रेल्वेच्या तिकीट खिडकीवरील परप्रांतीय कर्मचाऱ्याने मराठी बोलल्यामुळे एका प्रवाशाला तिकीट नाकारल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. इतकेच नव्हे, तर मराठी भाषेचा अपमान केल्यानंतर त्याने माफी मागणार नाही, अशी संतापजनक भूमिका घेतली. मुंबईतील नाहूर रेल्वे स्टेशनवर हा सगळा प्रकार घडला असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात एका परप्रांतीय रेल्वे कर्मचाऱ्याचा मुजोरपणा पाहून नेटकऱ्याकडून संताप व्यक्त केला जात आहे.
 
नेमकं काय घडलं नाहूर रेल्वे स्थानकावर ?
 
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशी अमोल माने हे नाहूर स्थानकात लोकलचे तिकिट काढण्यास गेले असता तिथल्या कर्मचाऱ्याशी मराठीत बोलू लागले. मात्र त्या कर्मचाऱ्याने हिंदीत बोला, असे अमोल माने यांना सांगितले. मात्र मी मराठीतच बोलणार, असा आग्रह माने यांनी केला असता त्या कर्मचाऱ्याने उद्धट बोलण्यास सुरुवात केली. दरम्यान, याचा व्हिडिओ माने यांनी मोबाईलमध्ये काढण्यास सुरुवात केली. दरम्यान या सर्व प्रकरणाचा एक व्हिडिओ मराठी एकीकरण समितीने त्याच्या फेसबुकवर पोस्ट करत समोर आणला आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा मराठी भाषेचा अवमान होणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर त्यांनी या कर्मचाऱ्याची रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रार ही केली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही आता मराठी एकीकरण समितीकडून करण्यात आली आहे.
 
दरम्यान, याआधीही नालासोपारा स्थानकावर तिकीट तपासनीसाने मराठी जोडप्याची अडवणूक केल्याचा प्रकार घडला होता. मराठी बोलण्याचा आग्रह धरणाऱ्या त्या तपासनीसाला व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर निलंबित करण्यात आले होते.