महाविकास आघाडी जिल्ह्यातून नामशेष

26 Nov 2024 17:48:25
MVA

नाशिक : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ( MVA ) मिळालेला अल्पसा आनंद अवघ्या सहा महिन्यांतच महायुतीने हिरावून घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत मविआच्या विजयी भ्रमाचा भोपळा फोडत जिल्ह्यात महायुतीने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांपैकी १४ जागांवर महायुतीने दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीला जिल्ह्यात नावालाही शिल्लक ठेवले नाही. यात भाजपला पाच, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सात, शिवसेनेला (शिंदे) दोन जागी विजय मिळाला. तर एमआयएमच्या मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी अपक्ष उमेदवार आसिफ रशीद शेख यांच्यावर अगदी निसटता विजय मिळवला. दरम्यान, उद्धव ठाकरे, शरद पवारांनी ठिकठिकाणी सभा घेऊनही त्याचा किंचितसा परिणामही मतदारांवर झाला नाही. विधानसभा निवडणुकांच्या निकालांमुळे खर्‍या अर्थाने नाशिक जिल्हा आता काँग्रेस, शरद पवार गट आणि उबाठा गटापासून मुक्त झाला आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजप-महायुतीने त्यापासून धडा घेत सूत्रबद्ध पद्धतीने निवडणूक लढविली. विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी जिल्ह्यात मविआ वरचढ असेल, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न प्रामुख्याने उबाठा आणि शरद पवार गटाकडून करण्यात आला. अनेक ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरविण्यात आले, मात्र त्याला खोडून काढण्यात भाजप-महायुती यशस्वी ठरली.शहरातील नाशिक मध्य मतदारसंघात देवयानी फरांदे यांनी १७ हजार, ८५६ मतांनी उबाठा गटाच्या वसंत गीते यांचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीत नाशिक मध्यने मविआच्या बाजूने कौल दिला होता. मात्र, विधानसभेत फरांदे यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी कायम ठेवत विजयश्री खेचून आणली. नाशिक पश्चिममध्येही भाजपच्या सीमा हिरे यांनी ६८ हजार, १७७ मतांच्या फरकाने उबाठाचे सलिम कुत्ता फेम उमेदवार सुधाकर बडगुजर यांचा पराभव केला. हिरेंनी परिवर्तन आघाडीचे उमेदवार आणि माजी महापौर दशरथ पाटील यांचाही धुव्वा उडवला. याठिकाणी मनसेचे उमेदवार दिनकर पाटील तिसर्‍या स्थानी राहिले. नाशिक पूर्वेतही भाजपचे कमळ फुलले. चांदवड मतदारसंघातही भाजपचे डॉ. राहुल आहेर यांनी ४८ हजार, ९६१ मतांच्या फरकाने विजयश्री मिळवली. याठिकाणी प्रहार जनशक्तीचे नवखे उमेदवार गणेश निंबाळकर दुसर्‍या स्थानी राहिले. तिसर्‍या स्थानी डॉ. राहुल आहेर यांचे बंधू केदा आहेर, तर चौथ्या स्थानी चक्क काँग्रेसचे शिरीषकुमार कोतवाल राहिले. त्यांना केवळ २३ हजार, ३३५ मते मिळाली.

नांदगाव मतदारसंघातही सुहास कांदे यांनी अपक्ष समीर भुजबळ यांचा ९० हजार मतांनी पराभव केला. तिसर्‍या स्थानी अपक्ष डॉ. रोहन बोरसे, तर चौथ्या स्थानी उबाठाचे गणेश धात्रक राहिले. त्यांना अवघी २१ हजार, ८५९ मते पडली. मालेगाव बाह्य मतदारसंघात पालकमंत्री दादा भुसे यांनी एक लाख, ६ हजार, ६०६ मतांनी विजय मिळवला. याठिकाणी अपक्ष असलेले बंडू बच्छाव दुसर्‍या स्थानी, तर उबाठाचे अद्वय हिरे तिसर्‍या स्थानी फेकले गेले. त्यांना अवघी ३९ हजार, ८३४ मते मिळाली. भुसेंनी १५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त केले. जिल्ह्यातील मालेगाव मध्य मतदारसंघात अपक्ष उमेदवार आसिफ शेख यांनी एमआयएमच्या मुफ्ती इस्माईल यांना कडवी झुंज दिली. मात्र, इस्माईल हे अवघ्या १६२ मतांनी विजयी झाले. याठिकाणी अखिलेश यादवांच्या सपाचा उमेदवार तिसर्‍या स्थानी, तर काँग्रेसचे काँग्रेसचे एजाज बेग अवघ्या ७ हजार, ५२७ मतासंह चौथ्या स्थानी राहिले.
त्याचप्रमाणे, जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार)सर्वाधिक सात जागा जिंकल्या आहेत. यात इगतुपरी, सिन्नर, कळवण, देवळाली, निफाड, दिंडोरी आणि येवला या जागांचा समावेश आहे. येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या पराभवासाठी खुद्द शरद पवार, मनोज जरांगे पाटील यांनी जोर लावूनही काहीही फायदा झाला नाही. भुजबळांनी शरद पवार गटाच्या माणिकराव शिंदे यांना २६ हजार मतांनी मात दिली. काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) दाखल झालेले हिरामण खोसकर यांनीही ८६ हजार, ५०७ मतांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी इगतपुरीत बाळासाहेब थोरातांचे विश्वासू लकी जाधव यांचा पराभव केला. जाधव यांना अवघी ३० हजार, ७०६ मते मिळवता आली. खोसकर यांनी मतदारसंघातील काँग्रेसचे १५ वर्षांपासूनचे वर्चस्व संपुष्टात आणले.

कळवणमध्येही नितीन पवार यांनी माकपच्या गडाला दुसर्‍यांदा सुरुंग लावला. त्यांनी जे. पी. गावित यांचा ८ हजार, ४३२ मतांनी पराभव केला. दिंडोरीतही शरद पवार गटाच्या सुनीता चारोस्कर यांचा नरहरी झिरवाळ यांनी ४४ हजार, ५३२ मतांनी पराभव केला. विरोधकांनी ‘मलिदा गँग’ असे हिणवूनही झिरवाळांनी विजयातून विरोधकांना प्रत्युत्तर दिले. देवळालीतही मैत्रीपूर्ण लढतीत सरोज अहिरे यांनी घोलप कुटुंबाची सद्दी संपुष्टात आणली. याठिकाणी दुसर्‍या स्थानी शिंदे सेनेच्या राजश्री अहिरराव, तर तिसर्‍या स्थानी उबाठा गटाचे योगेश घोलप राहिले. सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे यांनी शरद पवार गटाच्या उदय सांगळे यांचा ४० हजार, ८८४ मतांनी पराभव केला. निफाडमध्ये दिलीप बनकर यांनी उबाठाच्या अनिल कदम यांचा २९ हजार, २३९ मतांनी पराभव केला.

एकूणच संपूर्ण जिल्ह्याचा विचार करता महाविकास आघाडीचा जिल्ह्यात सुपडा साफ झाला आहे. मविआला जिल्ह्यात एकाही ठिकाणी आपले खाते उघडता आले नाही. देवळालीत उबाठा गट तिसर्‍या स्थानी, तर नांदगावात चौथ्या स्थानी राहिला. मालेगाव बाह्यमध्ये उबाठा गट थेट तिसर्‍या स्थानी राहिला. चांदवड, मालेगाव मध्य मतदारसंघामध्ये काँग्रेस चौथ्या स्थानावर फेकली गेली. त्यामुळे नाशिक जिल्हा खर्‍या अर्थाने आता शरद पवार, उबाठा गटासहित काँग्रेसपासूनही मुक्त झाला आहे.

सुप्रिया सुळे, शरद पवारांची सभा फेल

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक पूर्वमध्ये राहुल ढिकले यांनी शरद पवार गटाच्या गणेश गीते यांचा तब्बल ८७ हजार, १८७ मतांनी पराभव केला. निवडणूक प्रचारादरम्यान, दोन्ही गटांमध्ये सातत्याने तणावाच्या घटना घडत होत्या. गीते यांनी भाजप उमेदवार ढिकलेंवर अनेक फेक नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला खरा, पण मतदारांनी ते सर्व हाणून पाडले. गणेश गीते यांच्यासाठी सुप्रिया सुळे, शरद पवार यांनी घेतलेल्या सभाही फेल गेल्या. सुप्रिया सुळे यांनी तर सभेपूर्वी अनेक ड्रामे करत पोलीस आयुक्तालयाची पायरीही चढली होती. परंतु, शरद पवार गटाला मतदारांनी मतपेटीतून सणसणित उत्तर दिले आहे.

भाजपच्या दिलीप बोरसेंकडून अनेक विक्रम मोडीत

बागलाण विधानसभा मतदारसंघात भाजपच्या दिलीप बोरसे यांनी विक्रमी विजय मिळवला. जिल्ह्यात त्यांना सर्वाधिक १ लाख, २९ हजार इतके मताधिक्य मिळाले. त्यांनी एकूण १ लाख, ५९ हजार, ६८४ मते मिळवत विरोधी सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त केले. याठिकाणी दुसर्‍या स्थानी शरद पवार गटाच्या दीपिका चव्हाण राहिल्या. सर्वाधिक मताधिक्य मिळवत तीनवेळा आमदार होण्याचा विक्रमही बोरसे यांनी आपल्या नावावर केला आहे. बागलाण मतदारसंघातून आमदार दुसर्‍यांदा जिंकत नसल्याची परंपराही बोरसेंनी या विजयाने मोडीत काढली.

Powered By Sangraha 9.0