ठाणे जिल्ह्यात कोणाला मिळणार मंत्रिपदाचा ताज?

26 Nov 2024 14:45:18
Thane

कल्याण : नवीन महायुती सरकारमध्ये ठाणे ( Thane ) जिल्ह्यातून कोण मंत्री होणार, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. कोणाला कोणते खाते मिळणार, याबाबतही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये केवळ डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनाच मंत्रिपद देण्यात आले होते. पण आता रविंद्र चव्हाणांसह मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे, अंबरनाथचे बालाजी किणीकर आणि ठाण्यातील संजय केळकर यांची नावेही चर्चेत आहेत. किसन कथोरे यांना मंत्रिपद मिळावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात कितीजणांना मंत्रिपदाचा ताज मिळणार, हे पाहावे लागणार आहे.

भाजप महायुतीचे उमेदवार रविंद्र चव्हाण हे डोंबिवली मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आले आहेत. २००९, २०१४, २०१९ आणि २०१४ असे चारवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते २०१४पासून मंत्रिपद भूषवित आहेत. चव्हाण हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. मविआचे सरकार उलथून टाकून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन करण्यात चव्हाण यांनी मोलाची भूमिका बजावली होती. चव्हाण यांना आता कोणते मंत्रिपद मिळणार की, मुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच मंत्री चव्हाण यांना महसूलमंत्रिपद मिळू शकते, अशी चर्चा शहरात रंगली आहे.

किसन कथोरे हे पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मतदारसंघात काँक्रीटमन अशी त्यांची ओळख आहे. मतदारसंघाचा त्यांनी कायापालट केला आहे. मात्र, त्यांना अद्यापपर्यंत मंत्रिपद मिळू शकलेले नाही. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये तरी किसन कथोरे यांना मंत्रिपद मिळेल, अशी कार्यकत्यांची इच्छा होती. पण कार्यकत्यांच्या पदरी निराशा पडली. कथोरे यांना यावेळेसतरी मंत्रिपद मिळावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

बालाजी किणीकर हे शिवसेनेतून सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतरही बालाजी किणीकर यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, असे बोलले जात होते. मात्र, मंत्रिमंडळांचा विस्तार झालाच नाही. त्यामुळे मंत्रिपदाची किणीकर यांची संधी हुकली. त्यामुळे आता तरी त्यांना मंत्रिपद मिळावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

ठाण्यातून संजय केळकर हे तिसर्‍यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मंत्रिपदाच्या शर्यतीत त्यांच्या नावाचीही चर्चा आहे. ठाणे जिल्ह्यातील अनेक आमदारांची नावे मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. कार्यकर्त्यांची आपल्या नेत्याला मंत्रिपद मिळावे, अशी इच्छा आहे. पण आता नेमकी कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Powered By Sangraha 9.0