चंदगड तिलारीत सापडले ब्लॅक पॅंथरचे पिल्लू, तर दोडामार्गात प्रौढ ब्लॅक पॅंथरचे दर्शन

26 Nov 2024 12:14:36
melanistic leopard



मुंबई (विशेष प्रतिनिधी) :
चंदगड तालुक्यातील तिलारी नगर वसाहतीमधील बंद असलेल्या खोलीत सोमवार दि. २५ ब्लॅक पॅंथर (melanistic leopard) म्हणजेच काळ्या बिबट्याचे पिल्लू आढळून आले. प्रसंगी गावकऱ्यांनी हा परिसर लागलीच मोकळा केल्याने मादी ब्लॅक पॅंथर (melanistic leopard) येऊन पिल्लाला घेऊन गेली. दरम्यान दोडामार्गातही प्रौढ ब्लॅक पॅंथरचे दर्शन घडले आहे. (melanistic leopard)
 
 
तिलारी नगर वसाहतीमध्ये अनेक बंद पडलेल्या खोल्या आहेत. यामधील एका बंद पडलेल्या खोलीमध्ये गावकऱ्यांना सोमवारी सकाळी ब्लॅक पॅंथरचे पिल्लू आढळून आले. हे पिल्लू नवजात होते. गावकऱ्यांनी लागलीच हा परिसर मोकळा केला आणि यासंबंधीची माहिती वन विभागाला कळवली. वन विभाग आणि गावकऱ्यांनी त्याठिकाणी पुन्हा भेट दिल्यावर पिल्लू सापडले नाही. त्यामुळे मधल्या काळात मादीने या पिल्लाला दुसऱ्या ठिकाणी हलवल्याची शक्यता आहे. सोमवारी सायंकाळी गावकऱ्यांना मादीचे देखील दर्शन घडले. दरम्यान दोडामार्गातील कुंभवडे परिसरातही प्रौढ ब्लॅक पॅंथरचे दर्शन घडले आहे. दर्शन देसाई यांना प्रवासादरम्यान ब्लॅक पॅंथर आढळून आला.
 
 

ब्लॅक पॅंथर हा बिबट्या असून शरीराचे रंग ठरवणारे 'मेलानीन' रंगद्रव्य वाढल्यामुळे बिबट्याच्या शरीरावरीलाळे ठिपके (राॅझेट पॅटर्न) पूर्णतः शरीरभर काळे किंवा अधिक काळे होतात. उलटपक्षी 'मेलानीन' कमी झाल्यामुळे 'ल्युकिझम' (Leucism) म्हणजेच पांढरा बिबट्या ही दिसू शकतो. जरी काळा रंग जास्त प्रमाणात असला तरी ठिपके बऱ्याच वेळेला दिसतात. ही एक अनुवांशिक अवस्था आहे. हा कोणत्याही प्रकारचा रोग नाही. 'ब्लॅक पँथर' या नावाचा विचार केला तर ती एक संयुक्तिक संकल्पना म्हणता येईल. यात भारत आणि आफ्रिकेत मिळणारा काळा बिबट्या, साऊथ अमेरिकेतले काळे जग्वार यांचा समावेश होतो. यांच लॅटिन भाषेतील कुळ 'पॅंथेरा' असल्यामुळे ही व्याख्या रूढ झाली असावी. मात्र, प्रत्यक्षात ही वेगळी प्रजाती नसून काळया रंगाचे प्रमाण जास्त असणारा बिबट्या किंवा जग्वार हाच 'ब्लॅक पँथर' नावाने ओळखला जातो. भारतात फक्त बिबट्याच आढळत असल्याने आपल्याकडचा काळया रंगाचा बिबट्या म्हणजेच 'ब्लॅक पँथर' होय.
Powered By Sangraha 9.0