‘मंजुम्मेल बॉईज’ची खरी नायिका ‘गुना गुहा’ : चिदंबरम

26 Nov 2024 17:20:31
Chidambaram

पणजी : ५५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मल्ल्याळी चित्रपट ‘मंजुम्मेल बॉईज’ ( Manjummel Boys ) हा ’इंडियन पॅनोरमा’ या विभागामध्ये प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटगृहामध्ये आणि ओटीटी वाहिनीवरही प्रेक्षकांना भरघोस प्रतिसाद मिळवणार्‍या या मल्ल्याळी चित्रपटाने जागतिक स्तरावरील मेकर्सकडूनही दाद मिळवली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन चिदंबरम यांनी केले असून “माझ्या चित्रपटाची खरी नायिका ही गुना गुहा होती,” असे त्यांनी सांगितले. तसेच, “या चित्रपटाच्या माध्यमातून मला जर त्या गुना या गुहेचा सुगंध प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आला असता, तर मी अधिक यशस्वी झालो असतो,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

‘मंजुम्मेल बॉईज’ या चित्रपटाची कथा केरळमधील कोचीजवळील मंजुम्मेल या गावातील ११ मित्रांसोबत घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. चिदंबरम म्हणाले की, “माझ्या मित्राकडून मला केरळमधील एका छोट्याशा गावातील ११ मित्रांची ही कथा समजली. त्यानंतर मी प्रत्येक मित्रासोबत एकांतात संवाद साधून नेमके त्या गुना गुहेत जवळ आणि आत काय झाले, याची माहिती गोळा केली. मात्र, ज्या व्यक्तीसोबत ही दुर्दैवी घटना घडली, त्या सुभाषसोबत संवाद साधणे फार कठीण होते. कारण, त्याच्या जीवनातून ४५ मिनिटे नाहीशी झाली आहेत. त्याच्या स्मृतीतून तो कोडाईकॅनलला मित्रांसोबत फिरायला गेला होता आणि गुहेत पाय घसरुन पडला. त्याच्याकडे केवळ गुहेत पडल्यावर त्याला झालेल्या प्रचंड वेदना, मिट्ट काळोख, थंडी आणि मृत शरीरांचा कुजलेला वास इतकीच गोष्ट आहे. त्यामुळे ‘मंजुम्मेल बॉईज’सोबत घडलेली सत्य घटना आणि मुळात ती गुहा सजीव करत प्रेक्षकांसमोर मांडणे, हे माझ्यासाठी आव्हान होते,” असे चिदंबरम यांनी सांंगितले.

Powered By Sangraha 9.0