मुंबई : (Mumbai Police) २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलीस दलातील अधिकारी व जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. पोलीस दलातर्फे आयोजित १६ व्या हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त या हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहीद जवानांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह मुंबई पोलीस मुख्यालयातील पोलीस स्मारक येथे जाऊन पुष्पचक्र वाहिले.
भावपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात पोलीस बँड पथकाने ‘सलामी शस्त्र’ तसेच 'बिगुलर्स लास्ट पोस्ट' वाजविले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी तसेच गणवेशधारी पोलीस अधिकारी व जवानांनी हुतात्म्यांना सलामी देत अभिवादन केले.त्यानंतर राज्यपालांनी हुतात्मा पोलीस कुटुंबातील सदस्यांची तसेच उपस्थित आजी व माजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली.
मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, वरिष्ठ अधिकारी डॉ. इकबाल सिंह चहल, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी देखील हुतात्म्यांना अभिवादन केले.