खाटीक समाजाने शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी वांद्रे येथील गजेंद्र घोडके कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
गजेंद्र घोडके हे ‘अखिल भारतीय खाटीक समाज, मुंबई’चे ते अध्यक्ष. तसेच ते दत्त जयंती उत्सवाचे जनरल सेके्रटरी आहेत. खाटीक समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला सुरक्षा, स्थैर्य मिळावे, व्यवसायातील असंख्य अडचणींचा अडसर दूर व्हावा, तसेच प्रत्यक्ष खाटीक काम करणारा समाजबांधव आणि प्रत्यक्ष खाटीक काम न करणारा पण, इतर उद्योगधंद्यांत नोकरीमध्ये रमलेला समाजबांधव यांच्यातील दूरी व्हावी, समाज एकत्रित व्हावा, यासाठी ते काम करतात. समाज संघटनेच्या मार्फत त्यांनी केवळ मराठी हिंदू खाटीकच नव्हे, तर मुंबईत राहणारे शेकडो राजस्थानी हिंदू खाटीक कुटुंब, कन्नड हिंदू खाटीक कुटुंब, तेलुगू हिंदू खाटीक कुटुंब आणि उत्तर भारतीय हिंदू खाटीक कुटुंबाशी संपर्क स्थापित केला. खरे तर मूळ खाटीकच असलेला मात्र विविध प्रांतांतून मुंबईत आलेला हा समाज एकमेकांशी पूर्ण अनोळखी होता. आज गजेंद्र यांनी संघटनेच्या माध्यमातून या सगळ्या हिंदू खाटीक समाजाला एकत्रित केले आहे. समाज संघटन करता यावे म्हणून त्यांनी काही दशकांपूर्वी नोकरीही सोडली. घरकुटुंब सांभाळता येईल इतके काम दिवसांतले काही तास ते करू लागले. त्यामुळे समाजकार्यासाठी वेळ देणे त्यांना सोपे गेले.
घोडके कुटुंब मूळचे वाईचे. पण, कामानिमित्त बबनराव घोडके मुंबईला आले. पुढे पोर्ट ट्रस्टमध्ये कामाला लागले. बबनराव आणि अहिल्याबाई यांना चार अपत्य. त्यापैकी एक गजेंद्र. गजेंद्र लहाणपणी त्यांच्या वडिलांसोबत नातेवाईकांकडे जात. तसेच घोडके कुटुंबीयांचे धारावीमध्ये मटणाचे दुकान होते. त्या दुकानातही गजेंद्र बाबांसोबत जात. तेव्हा गजेंद्र यांच्या लक्षात आले की, खाटीक समाज सरकारमान्य परवाना घेऊन दुकान टाकतो. मात्र, या दुकानात तुरळक ग्राहक येत. याउलट कोणतीही परवानगी न घेता, पशूंची वैद्यकीय तपासणी न करता उघड्यावरच पशूंची कत्तल करणार्यांच्या दुकानात लोकांच्या रांगा लागलेल्या असत. लोकांना वाटे की, उघड्यावर पशूंची कत्तल करणारे ताजे मटण विकतात, तर हिंदू खाटीक कत्तलखान्यातून जे पशूचे मांस आणतात, ते ताजे नसते. त्यामुळे ग्राहकांअभावी अत्यंत सुरक्षित मांसाची विक्री करणारे घोडके कुटुंबीयांचे मटणाचे दुकान त्यांना बंद करावे लागले, नव्हे महाराष्ट्रभर हिंदू खाटीकांची दुकाने बंद पडू लागली.
त्यातच ती घटना घडली. 1993 साल होते. वांद्य्राच्या बंदरवाडीत शंभर एक घर हिंदूची होती. त्या वाडीत 18-19 वर्षांचे गजेंद्र त्यांच्यासोबतच्या सात-आठ मुलांसोबत दत्त जयंतीचा उत्सव साजरा करणार होते. त्यासाठी ते परिसराचे सुशोभीकरण करत होते. इतक्यात समोरून 250 ते 300 मुस्लीम धावत येताना दिसले. ते पाहून गजेंद्र यांच्या गणेश मामांनी मुलांना सांगितले, “पोरांनो पळा इथून. काहीतरी घडणार आहे. ते हल्ला करण्याच्या तयारीत इथे धावत येत आहेत.” मामांचे म्हणणे ऐकत ती मुले तिथून पळाली. साधारण जैन मंदिराच्या इथपर्यंत येताच त्यांनी मागे वळून पाहिले, तर तो जमाव वांद्य्राच्या बंदरवाडीत घुसला. तिथे शंभर एक हिंदूंची घरे होती. त्यात खाटीक समाजाचीही घरे होती. निवडून निवडून त्या घरांवर हल्ले झाले. ही मुले अगतिकपणे हे सगळे पाहत होती. मात्र, गजेंद्र यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांना यायला अर्धा तास लागला.
पोलिसांचा फौजफाटा घेऊन गजेंद्र त्या वस्तीत गेले. हिंदूंची घरे कोणती हे शोधणे सोपे होते. कारण, त्यांच्याच घरांवर निर्घृणपणे हल्ला केला गेला होता. पोलिसांच्या मदतीने गजेंद्र यांनी हिंदूंना त्या वस्तीतून बाहेर काढले. त्या वस्तीतील हिंदूंसाठी आणि गजेंद्र यांच्यासाठीही सदर घटना आयुष्याला कलाटणी देणारी होती. आपल्याच देशात आपल्याच वस्तीत आपलेच घर नेसत्या वस्त्रानिशी सोडावे लागणे आणि पुढे स्वत:चे चांगले घर केवळ दंगलीच्या भीतीमुळे विकावे लागणे, हे सगळे भयंकर दु:खद होते. हा परिसर हिंदूंनी सोडल्यानंतर तिथे दत्त जयंती उत्सव कसा साजरा होणार? मात्र, गजेंद्र यांना त्यांच्या बाबांनी बबनराव यांनी आधीच सांगितले होते की, उत्सव साजरा करतोस तर मरेपर्यंत तो साजरा करायला हवा. यातच परिसरात मुसलमान खाटीकांची दुकाने आहेत आणि सगळा परिसर मुस्लीमबहुल आहे. मात्र, गजेंद्र यांनी हा उत्सव बंद होऊ दिला नाही. आजपर्यंत हा उत्सव दरवर्षी नव्या उत्साहात साजरा होतो.
असो. याच काळात गजेंद्र यांनी समाजसंघटनेचे लक्ष कायम केले. पुढे संजय घोलप, सुजित धनगर, गणेश घोडके वगैरे समाजबांधवांच्या साथीच्या मार्गदर्शनाने त्यांनी समाजाचे संघटन उभे केले. समाजासाठी आर्थिक महामंडळ निर्माण व्हावे, यासाठीही गजेंद्र यांनी संघटनेमार्फत पाठपुरावा केला. संघटनेच्या प्रयत्नाला यश आले आणि महायुतीच्या सरकारने खाटीक समाजासाठी आर्थिक महामंडळ निर्माण करण्याचे जाहीर केले. गजेंद्र म्हणतात, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.’ हा मंत्र समाजाने जगण्याची गरज आहे. समाजाने संघटित होत आपल्या हातून गेलेला व्यवसाय परत मिळवण्यासाठी संघर्ष करायचा आहे.तसेच ज्यांना हा व्यवसाय करायचा नाही त्या युवकांनी उच्चशिक्षण घेऊन विविध क्षेत्रात समाजाचे नाव उंचावायचे आहे. या सगळयासाठी मी समाजासोबत आहे आणि त्यासाठी आयुष्यभर तनमनधन अर्पण करणार आहे.” गजेंद्र घोडकेंसारख्या व्यक्ती समाजासाठी दीपस्तंभच असतात.
9594969638