मुंबई : भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी काढलेल्या ‘बहुजन समाज संवाद यात्रे’मुळे विधानसभा निवडणुकीत संविधानविरोधी ( Constitution ) ‘फेक नॅरेटिव्ह’चा धुव्वा उडाला. ही यात्रा महाराष्ट्रातील ७० पेक्षा जास्त विधानसभा क्षेत्रांत पोहोचली. त्यांच्या प्रत्येक सभेला अनुसूचित जातीतील तीन ते पाच हजारांहून अधिक लोकांची उपस्थिती होती.
विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर आमदार अमित गोरखे यांनी तत्काळ ‘बहुजन समाज संवाद यात्रा’ काढली. या यात्रेदरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील ३० जिल्हे आणि ७८ विधानसभा मतदारसंघ पिंजून काढले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काढलेली ही झंजावाती ‘बहुजन समाज संवाद यात्रा’ अतिशय प्रभावी ठरली. या यात्रेदरम्यान त्यांनी संविधानविरोधी ‘फेक नॅरेटिव्ह’वर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस कसे संविधानविरोधी आहे, हे अनुसूचित जातीतील बांधवांना समजावून सांगितले.
काँग्रेसने सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध केला. बाबासाहेबांना काँग्रेसने कधीच संसदेत खासदार म्हणून निवडून येऊ दिले नाही. इतकेच नव्हे, तर काँग्रेसने त्यांना भारतरत्न पदवीसुद्धा प्रदान केली नव्हती. भाजप सरकार सत्तेवर आल्यावर त्यांनी सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले. भारताच्या इतिहासात अनुसूचित जातीतील कायदामंत्री करण्याचे कार्य हे भाजपने केले आहे. किरेन रिजिजू यांच्या रुपात अनुसूचित जातीतील कायदामंत्री केंद्रीय मंत्रिमंडळात यशस्वी कार्य करीत आहेत, असे अमित गोरखे यांनी प्रत्येक सभेत पटवून दिले.
देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंनी केले कौतुक
काँग्रेसचे युवराज विदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करतात, तर कधी आरक्षणाची मर्यादा वाढवू म्हणतात. ते नेहमी संविधानविरोधी वक्तव्ये करीत आले आहेत. महाराष्ट्रात अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक असेल, लहुजी वस्ताद यांचे स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षाभूमीवर, चैत्यभूमीचे सुरू झालेले काम, भाजपच्या काळात झाले, असे अमित गोरखे यांनी सभेत सांगितले. त्यांच्या या झंजावाती दौर्यामुळे मातंग, बौद्ध, चर्मकार, वाल्मिकी तथा सर्व बहुजन समाजामध्ये नवचैतन्याचे वातावरण पसरलेले दिसून आले. त्यांच्या मुद्देसूद आक्रमक भाषणांमुळे विधानसभा निवडणुकीत संविधानविरोधी ‘फेक नॅरेटिव्ह’चा धुव्वा उडाला. त्यांच्या या कामगिरीमुळे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे कौतुक केले.