राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कायम ‘विमल’: डॉ. मोहनजी भागवत

ज्येष्ठ स्वयंसेवक बिमलजी केडिया यांच्या ‘अमृतमहोत्सवी वर्षा’निमित्त अभीष्टचिंतन सोहळा

    26-Nov-2024
Total Views |
Mohanji Bhagwat

मुंबई : “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा शुद्ध, पवित्र आहे. त्यात कधी ‘मळ’ येऊ शकत नाही, त्यामुळे तो ‘विमल’ आहे. संघ स्वयंसेवक कसा असावा, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे बिमलजी केडिया. वयाची ६५ वर्षे त्यांनी निःस्वार्थ भावनेने संघसेवा केली. बिमलजी हे साधनेचा वस्तुपाठ आहेत,” असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत ( Dr. Mohanji Bhagwat ) यांनी सोमवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी केले.

मुंबई महानगरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक बिमलजी केडिया यांच्या अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतनाचा कार्यक्रम सोमवारी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत विलेपार्ले येथे संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. ‘केशवसृष्टी’च्यावतीने आयोजित या कार्यक्रमाला बिमलजी केडिया यांच्या पत्नी उषा केडिया, महानगर संघचालक सुरेश भगेरिया, ‘केशवसृष्टी’चे अध्यक्ष डॉ. सतीश मोढ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. ‘विवेक’च्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘अप्प दीपो भव’ आणि बिमल केडिया लिखित ‘संघ जीवन की पाठशाला’ या ग्रंथांचे प्रकाशन सरसंघचालकांच्या हस्ते करण्यात आले. दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने प्रकाशित करण्यात आलेली ‘अमृतमयी बिमल’ ही विशेष पुरवणी यावेळी उपस्थितांना भेट स्वरुपात देण्यात आली.

आपल्या मार्गदर्शनपर संबोधनात सरसंघचालक म्हणाले की, “संघ भाषणावर नव्हे, तर जीवनावर उभा आहे. ज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे, ‘ये हृदयींचे ते हृदयीं घातलें....’ हीच संघाची कार्यपद्धती आहे. जगभरातून मला लोक प्रश्न विचारतात, संघ असे काय प्रशिक्षण देतो की, सामान्य स्वयंसेवकही असामान्य काम करून जातो? त्यावर एकच उत्तर आहे, आम्ही जन्मभूमी भारतमातेसाठी काम करतो. तीच आमची प्रेरणा आहे. त्यामुळे संघकार्यात आम्हाला कोणतेच कष्ट होत नाहीत. ही एक साधना आहे. या साधनेचे चार सोपान आहेत. पहिला दृढ संकल्प. प्रत्येक स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आल्यानंतर एक-दोन वर्षांत याची खूणगाठ बांधतो. भारतमातेने आम्हाला दिलेले तिला परत करतोय, या कृतार्थ भावनेने तो काम करतो,” असे सरसंघचालक म्हणाले.

“सद्गुणवर्धन आणि दोषनिरसन हा शिरस्ता स्वयंसेवक पाळतात. त्यात उत्कटता आणि सातत्य असते. निःस्वार्थ भावनेने, सर्वांच्या कल्याणाकरिता ही साधना अखंड सुरू असते. बिमलजी केडिया यांनी आपल्या ६५ वर्षांच्या संघसेवेत हा शिरस्ता कायम पाळला. संघ हा शुद्ध, पवित्र आहे. त्यात कधी मळ येऊ शकत नाही, त्यामुळे तो ‘विमल’ आहे. मीदेखील स्वतःला संघायोग्य ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतो,” असेही सरसंघचालक डॉ. भागवत म्हणाले.

संघ स्वयंसेवक कसा असावा?

“कंदिलाच्या काचेला रंग दिला की, आतील दिव्याचा प्रकाश त्याच रंगाचा दिसतो. काच मळलेली असेल, तर ती ज्योत अंधुक दिसते. पण काच स्वच्छ, सुंदर, निर्मळ असेल, तर जशी ज्योत आहे, तशीच ती दिसेल. संघ स्वयंसेवकसुद्धा स्वतःची जीवनज्योत अशी बनवतो की, तो जसा निर्मळ आहे, तसाच प्रकट होतो. बिमलजीसुद्धा असेच आहेत. त्यांचे जीवन त्यांच्या नावाप्रमाणेच ‘विमल’ आहे. संघसेवा करताना, त्यांनी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. कारण सेवा कधी सहजतेने होत नाही. बिमलजींच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन, अनेक स्वयंसेवक घडले आणि असे बिमलजी राष्ट्रीय स्वयंसेवक दररोज तयार करीत आहे,” असेही डॉ. मोहनजी भागवत यांनी सांगितले.

संघ हा निराकार : बिमलजी केडिया

सत्कारमूर्ती बिमलजी केडिया म्हणाले की, “संघ हा निराकार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून त्याचे कार्य लोकांसमोर आणावे लागते. आज मी ते माध्यम आहे, त्याव्यतिरिक्त माझ्यात विशेष काही नाही. ब्रह्मदेशात माझा जन्म झाला. १९६२ मध्ये संघप्रवेश तेथेच झाला. अडीच वर्षे तेथे मी बाल गटनायक राहिलो. तेथे संघसेवेचा जो पाया मजबूत झाला, त्यामुळेच ही इमारत भक्कम झाली. १९६६ मध्ये मी विलेपार्लेकर झालो. गेल्या ५८ वर्षांपासून मी मुंबईच्या सांस्कृतिक राजधानीत वास्तव्यास आहे.” बिमलजींनी या कार्यक्रमात एक आठवण सांगितली. ते म्हणाले, “योगायोग असा आहे, ज्या दीनानाथ नाट्यगृहात हा कार्यक्रम होतो आहे, त्या जागी पूर्वी मैदान होते. तेथे संघशाखा भरायची आणि १९७० साली मी त्या शाखेचा कार्यवाह होतो. १९३८ साली डॉक्टरांनी गुरुजींना सांगून ही शाखा सुरू केली होती. आजही मी त्या शाखेचा स्वयंसेवक आहे.” बिमलजी केडिया यांनी संघनिष्ठा कशी असते, याचे मूर्तिमंत उदाहरणच प्रकट केले.