डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशन

26 Nov 2024 21:06:53
dr babasaheb ambedkar medicos association
 
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशन’ या संस्थेचे कार्य 1978 सालापासूनच सुरू झाले. डॉक्टर, रुग्ण आणि वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी अशा विविध स्तरांवर असोसिएशन कार्यरत आहे. समाजातील सर्व स्तरांवर आरोग्य सेवा पोहोचावी तसेच, तज्ज्ञ डॉक्टरांचा एकत्रित समूह तयार व्हावा, यासाठीचे असोसिएशनचे उल्लेखनीय कार्य आहे. असोसिएशनच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख...

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशन’ची स्थापना वैद्यकीय व्यावसायिकांचे कल्याण करण्यासाठी आणि समाजातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी करण्यात आली. तसेच, रुग्णांच्या आरोग्य हक्कासाठी कार्य करावे, यासाठीही असोसिएशन कार्य करते. असोसिएशनचे अध्यक्ष आहेत डॉ. नागसेन रामराजे. त्यांनी दि. 4, 5, 6 डिसेंबर 1978 रोजीपासून आपली पहिली मोहीम शिवाजी पार्क, दादर आणि जे. जे. रुग्णालय मुंबई येथे सुरू केली. या तीन दिवसांच्या मोहिमेने संस्थेच्या प्रयत्नांची सुरुवात झाली. त्या दिवसापासून संस्थेचा कार्याचा विस्तार झाला. अगदी मुंबई ते नागपूरपर्यंत संस्था कार्यरत आहे. 2019 मध्ये डॉ. सुमेध अधागळे यांच्या पुढाकाराने डेंटल कॉलेज GDC, मुंबईमध्ये आतापर्यंत दहा डॉक्टरांनी असोसिएशनसोबत काम केले आहे.
असोसिएशनची सध्याची कार्यसमिती संबंधित महाविद्यालये आणि रुग्णालयाच्या अध्यक्षांच्या अधिपत्याखाली काम करते
यश गंगासागर-जे. जे. रुग्णालय मुंबई.
सम्यक एच - शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालय
आदर्श ताजने - सायन हॉस्पिटल
डॉ. वैभव अंभोरे - टीएनएमसी आणि बीवायएल नायर हॉस्पिटल
ईटेरिप्पी - पोदार हॉस्पिटल
डॉ. अजित - तांबे हॉस्पिटल

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशन’चे उद्दिष्ट खालीलप्रमाणे-


1. वैद्यकीय शिक्षणाला प्रोत्साहन देणे :
रुग्ण जास्त आणि वैद्यकीय शिक्षण घेऊन आरोग्य सेवा देणारे डॉक्टर कमी, असे दृश्य आज आहे. त्यामुळे समाजातील युवकांचे वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढावे, यासाठी जागृत करणे हे कामही असोसिएशन करते.

2. समान आरोग्य सेवेसाठी करणे :
आरोग्य सेवेतील असमानता दूर करण्यासाठी असोसिएशन काम करते. अज्ञानामुळे, माहितीच्या अभावामुळे आणि मुख्यतः आर्थिक गरिबीमुळे समाजातील मोठा गट आरोग्य सेवेच्या मूलभूत सुविधेपासून वंचित राहत आहे. कोणत्याही कारणाने आरोग्य सेवेच्या सुविधेपासून वंचित राहिलेल्या, तसेच समाजप्रवाहातून दूर असलेल्या त्यामुळे आरोग्य सेवेस मुकलेल्या समाजाला आरोगय सुविधा प्रदान करणे.

3. वैद्यकीय व्यावसायिकांना समर्थन देणे :
डॉक्टरांचे नेटवर्किंग तयार करणे, त्यातून रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी हे डॉक्टर परस्पर सहयोग करतील. मानवतावादी दृष्टिकोनासोबतच व्यावसायिक विकासाच्या संधी एकमेकांसाठी उपलब्ध करतील, असे वातावरण निर्माण करण्यासाठीही असोसिएशन काम करते. एखाद्या रुग्णाची हानी झाली, तर अनेकवेळा असे दिसते की डॉक्टरांची चूक नसतानाही त्या डॉक्टरांना नाहक आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जाते. अशावेळी योग्य न्यायिक भूमिका घेऊन संघटना डॉक्टरांच्या पाठीशी उभी राहते.

4. तळागाळातील विद्यार्थ्यांना मदत करा :
डॉक्टर व्हावे, या इच्छेने ग्रामीण भागातून किंवा तळागाळातून विद्यार्थी प्रयत्न करत असतात. त्या गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे, माहिती देणे यासाठीही असोसिएशन सहकार्य करते.

5. आर्थिक साहाय्य प्रदान करा :
वैद्यकीय शिक्षण घेत असताना गरजू, गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांना अनेकदा पाल्याचा शैक्षणिक खर्च पेलवत नाही. अशा वेळी विद्यार्थ्यांचा कोंडमारा होतो. अशा विद्यार्थ्यांना असोसिएशन आर्थिक साहाय्य प्रदान करते.
 
संस्थेची ही कार्ये आणि उद्दिष्टे म्हणजे मानवी मूल्यांची जोपासना करत समाजातून एक आदर्श डॉक्टर घडवणे होय. समाजाला गरजेची आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, तळागाळातील उपेक्षित वंचित घटकांनाही आरोग्य सेवेचा लाभ देणे, आरोग्योपचार संदर्भातील मानके सुधारण्यासाठी तसेच रुग्णांना त्यांचे योग्य हक्क मिळण्यासाठी समर्पित वैद्यकीय व्यावसायिकांचे एकसंध नेटवर्क तयार करणे, हे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशन’चे ध्येय आहे. वैद्यकीय प्रवेशाची गुंतागुंत समजू शकत नसलेल्या आणि ज्यांना शहरी शैक्षणिक वातावरणाशी जुळवून घेणे कठीण जाते, अशा तळागाळातील विद्यार्थ्यांना मदत करण्यात ही संस्था महत्त्वाची भूमिका बजावते. मार्गदर्शन आणि संसाधने प्रदान करून असोसिएशन या विद्यार्थ्यांना त्यांच्या वैद्यकीय करियरमध्ये सहजतेने कार्य करण्यास मदत करते.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान नेत्यांचा वारसा पुढे चालू ठेवत, हे असोसिएशन सामाजिक न्याय, समानता आणि सक्षमीकरणाच्या तत्त्वांना मूर्त रूप देते. प्रत्येकाला दर्जेदार आरोग्यसेवा आणि शिक्षण मिळण्याची खात्री करून ही संस्था उपेक्षित समुदायांचे हक्क आणि संधी जिंकते. गेल्या काही वर्षांमध्ये असोसिएशनने विविध आरोग्य जागृती मोहिमा यशस्वीपणे सुरू केल्या आहेत, सेमिनार आणि कार्यशाळा आयोजित केल्या आहेत आणि आरोग्यसेवा सुधारणांवरील धोरणात्मक चर्चांमध्ये योगदान दिले आहे. असोसिएशनचा प्रभाव सामुदायिक आरोग्य उपक्रमांसाठी आरोग्यसेवा व्यावसायिकांना एकत्रित करणे, वैद्यकीय सेवांमध्ये प्रवेश सुधारणे आणि सतत शिक्षणाद्वारे वैद्यकीय व्यावसायिकांना सक्षम बनविण्याच्या क्षमतेवर दिसून येतो. आपल्या प्रयत्नांद्वारे असोसिएशन सर्व समाजघटकांसाठी त्यातही सुविधांपासून वंचित असलेल्या लोकांसाठी आरोग्यदायी भविष्य घडवण्यासाठी एक महत्त्वाची शक्ती बनली आहे. डॉक्टर हासुद्धा माणूस आहे आणि माणूस म्हणून त्याच्या मर्यादा आहेत. त्या मर्यादांचा आणि डॉक्टर म्हणून त्याच्या असलेल्या वैद्यकीय शक्तींचा समन्वय साधत समाजाची आरोग्यसेवा विकसित व्हावी, यासाठी कार्य करणारे हे असोसिएशन.

असोसिएशनतर्फे अनेक उपक्रम राबविले जातात. तसेच, असोसिएशनतर्फे दरवर्षी विविध कार्यक्रम घेण्यात येतात. जसे दि. 14 एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर जयंती, दि. 4 आणि दि. 5 डिसेंबर रोजी शिवाजी पार्क दादर येथे मोफत वैद्यकीय शिबीर, दि. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महाविद्यालय स्तरावर संविधान दिन नुकतेच असोसिएशनतर्फे संविधान दिन साजरा करण्यात आला. दि. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान लिहिण्याचे काम पूर्ण झाले. संविधान सभेच्या ड्राफ्टिंग कमिटीचे प्रमुख व भारताचे कायदामंत्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची पहिली लिखित प्रत संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सुपुर्द केली. भारताच्या इतिहासात या दिवसाला विशेष महत्त्व आहे. आपण या दिवसाला ‘संविधान दिवस’ असे म्हणतो. हे वर्ष संविधान निर्मितीच्या अमृत महोत्सवाचे वर्ष आहे. संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने असोसिएशनने ’सामाजिक समरसता मंच’ कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत गिरगाव चौपाटी ते राजभवन अशी प्रभातफेरी काढली. प्रभातफेरीच्या प्रारंभी डॉ. संगीता अंभोरे, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, निलेश गद्रे व नागेश धोडगे ‘सामाजिक समरसता मंच’ कार्यकर्ता यांनी संबोधित केले.

संविधानाबाबत जागृती निर्माण व्हावी, म्हणून विद्यार्थ्यांनी हातात तशा प्रकारचे फलक घेतले होते. यात्रेमध्ये संविधान चिरायू होवो, अशा घोषणा देण्यात आल्या. प्रभातफेरीदरम्यान दि. 26 नोव्हेंबर 2008 रोजीच्या हल्ल्याच्या हुतात्म्यांना गिरगाव येथील हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकावर मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. मुंबईतील शासकीय दंत महाविद्यालय, जे. जे. रुग्णालय, ग्रांट मेडिकल कॉलेज, नायर वैद्यकीय महाविद्यालय, पोदर आयुर्वेदिक कॉलेज या पाच वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. साधारण 280 विद्यार्थी व शिक्षक संविधान सन्मान प्रभातफेरीमध्ये सहभागी झाले. यात प्राध्यापक डॉ. प्रशांत दळवी, मनोज गायकवाड व कैलास सोनमनकर होते, तर विद्यार्थी प्रतिनिधी सम्यक हिवाळे, आदित्य गाडे, शुभम घोलप, अनिश चव्हाण, सुशांत वारे, राहुल चव्हाण इत्यादी उपस्थित होते. यात्रा राजभवनच्या प्रांगणात समाप्त झाली, महाराष्ट्राचे कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यात्रेत सहभाग घेतला आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन व राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

तर हा उपक्रम इतका स्पष्टपणे यासाठी लिहिला की, असोसिएशन भारतीयत्वाच्या महात्म्याला वंदन करते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, “मी प्रथमही भारतीय आहे आणि अखेरही भारतीयच आहे.” त्यांच्या या विचारांनुसार वैद्यकीय सेवेतले सर्व वैद्यकीय समूह हेसुद्धा डॉक्टर असले तरीसुद्धा त्यांच्यातील भारतीयत्व कायमच जागृत आहे आणि प्रखर आहे. दिवसेंदिवस असोसिएशनच्या कार्याची व्याप्ती वाढत आहे आणि संघटनही वाढत आहे. कारण, समाजातल्या सज्जनशक्तीला असोसिएशनच्या कार्याची महती पटली आहे. हे सगळे करताना असोसिएशनपुढे अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांना पार करत असोसिएशन समाजाच्या आरोग्यसेवेसाठी तत्पर आहे. तसेच, समाजाचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी कार्यरत असलेल्या डॉक्टरांच्या हितासाठीही असोसिएशन कार्यरत आहे.

डॉ. संगिता अंभोरे
9967539840
Powered By Sangraha 9.0